मुंबई (प्रतिनिधी) - कोनगाव पोलिसांनी नाशिक-मुंबई बायपास रस्त्यावरुन मंगळवारी वाघाच्या कातडीची तस्करी उघडकीस आणली. या कारवाईमध्ये वडाळ्यात राहणाऱ्या चार तरुणांना अटक करण्यात आली आहे. यामधील एका तरुणाने आपल्याकडील महागड्या दुचाकीच्या दुरुस्तीसाठी या वडिलोपार्जित वाघाच्या कातडीची तस्करी केल्याचे समोर आले आहे.
नाशिक-मुंबई बायपास रोडवरील बासूरी हाॅटेल समोर, ठाकुरपाडा येथे चार तरुण वाघाच्या कातडीची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या तस्करीची माहिती पोलिसांनी वन विभागाला कळविल्यानंतर वनकर्मचारी आणि वाॅर रेस्क्यु फाऊंडेशनचे स्वयंसेवक सुहास पवार आणि योगेश कांबळे त्याठिकाणी पोहोचले. या परिसरात सापळा लावून कातडीची विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून वाघाचे कातडे आणि पंजा ताब्यात घेण्यात आला. आरोपींमध्ये प्रशांत सिंग ( वय -२१), चेतन गौडा (वय २३), आर्यन कदम (वय -२३) आणि अनिकेच कदम (वय - २४) यांचा समावेश असून ते वडाळ्यातील रहिवासी आहेत.
आर्यन कदम या आरोपीकडे वडीलोपार्जित हे वाघाचे कातडे होते. आपल्याकडील हार्ले डेव्हिडसन या लाखो रुपये किंमतीच्या दुचाकीच्या दुरुस्तीसाठी त्याने आपल्या घरातील वाघाचे कातडे विकण्याचा निर्णय घेतला. मात्र, वडिलोपार्जित वाघाचे कातडे बाळगण्यासाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र त्याच्या कुटुंबाकडे नसल्याची माहिती चौकशीतून समोर आली. त्यामुळे या आरोपींवर कारवाई करण्यात आली. दरम्यान पोलीस आणि वन विभागाकडून वाघाची ही कातडी खरी असून पंजा खोटा असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते ही कातडी खोटी आहे.