मुंबई : सध्या राज्यातील कोरोना परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे. वाढत्या रुग्णसंख्येचा भार रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टर, आरोग्यसेवक आणि रुग्णालयावर येत आहे. या संकटातही आरोग्य सेवक, डॉक्टर हे रात्रंदिवस रुग्णसेवा देत आहे. मात्र शिवसेनेच्या नगरसेविका संध्या दोशी यांनी भगवती रुग्णालयात डॉक्टरांशी वाद घालत गोंधळ निर्माण केला. या गोंधळामुळे १३ निवासी डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत. या राजीनाम्यांमुळे रुग्णसेवेत बाधा येत असून याला जबाबदार कोण ? तर महापालिकेचे रुग्णालय ही शिवसेनेची खाजगी मालमत्ता आहे का? असा सवाल आता भाजपने उपस्थित केला आहे.
शिवसेना नगरसेविका संध्या दोशी भगवती रुग्णालयात डॉक्टरांशी वाद घालत असताना आणि दमदाटी करत असतानाचा एक व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. यानंतर या रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांनी घडलेला प्रकार माध्यमांसमोर सांगितला. इतर रुग्णांना रुग्णसेवा देत असतानाही नगरसेविका संध्या दोशी यांनी आपल्याच नातेवाईकांवर पहिले उपचार करावे, असा आग्रह धरला आणि त्यानंतर त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केल्याचे तेथील उपचार देत असणाऱ्या निवासी डॉक्तरांनी सांगितले. हे डॉक्टर म्हणतात,"मॅडम तुम्ही म्हणालात ना की तुमच्यासारखे १० डॉक्टर मी इथे उभे करेन, तर ते तुम्ही करा. आम्ही सर्व राजीनामा देत आहोत. रोज कोणीतरी येऊन आमच्याशी वाद घालतो दमदाटी करतोय. आमच्यावर देखील जबाबदारी आहे. आयसीयूमध्ये गंभीर रुग्ण रोज दाखल होत आहेत इतकी गंभीर परिस्थिती आम्ही हाताळत आहोत, तुम्ही हे करू शकता का ?" असा सवालही या डॉक्टरांनी उपस्थित केला आहे.
घडलेल्या या प्रकरणावर आता भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे मुंबई प्रभारी आणि आमदार अतुल भातखळकर यांनी महापालिकेचे रुग्णालय ही शिवसेनेची खाजगी मालमत्ता आहे का? असा सवाल ट्विटद्वारे केला आहे. ते म्हणतात,"केवळ एका रुग्णासाठी शिवसेनेच्या नगरसेविका संध्या दोशी यांनी भगवती रुग्णालयात तमाशा केला. त्यामुळे रूग्णांसाठी अहोरात्र झटणाऱ्या १३ निवासी डॉक्टरांनी राजीनामा दिला. काम खोळंबळे अन्य रुग्णांना त्रास झाला. याला जबाबदार कोण?" असा सवाल भातखळकर यांनी केला आहे. भाजप नेते निलेश राणे यांनीही शिवसेनेवर निशाणा साधला आहे. तसेच निवासी डॉक्टरांची व्यथा मांडणारा व्हिडिओही त्यांनी शेअर केला आहे.