'ठाकरे सरकारने सूडाचा कळस गाठला आहे'

    21-Apr-2021
Total Views |

atul bhatkhalkar_1 &


मुंबई :
रेमडेसिव्हीरच्या पुरवठ्यावरुन राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार राजकारण रंगलं आहे. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन उत्पादक कंपन्यांकडून उपलब्ध करुन घेण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवत ही बदली करण्यात आली असल्याची चर्चा आहे. अभिमन्यू काळे यांच्याकडे असलेली आयुक्तपदाची जबाबदारी आता परिमल सिंह यांच्याकडे देण्यात आली आहे. तर काळे यांच्या बदली विरोधात भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केलीय. काळेंची बदली करुन ठाकरे सरकारनं सूडाचा कळस गाठल्याचा घणाघात भातखळकरांनी केला आहे.


यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. अभिमन्यू काळे यांच्या बदलीवरुन भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. ‘रेमडेसीवीरसाठी भाजपला पत्र देणाऱ्या FDA आयुक्त अभिमन्यू काळेंची बदली करून ठाकरे सरकारने सूडाचा कळस गाठला आहे. महाराष्ट्राचे हित गेले चुलीत, टक्केवारी शिवाय काहीच यशस्वी होऊ द्यायच नाहीत असा निश्चय ठाकरे सरकारने केला आहे”, असं ट्वीट भातखळकर यांनी केलंय.


परिमल सिंग नवे आयुक्त

विरोधी पक्षनेत्यांच्या आग्रहावरून तातडीने परवानगी दिलेली ब्रूक कंपनी व काही ज्येष्ठ मंत्र्यांनी सुचवलेली बीडीआर या दोन्ही कंपन्यांनी महाराष्ट्राला अद्याप एकही इंजेक्शन दिलेले नाही, अशी माहिती आहे. काळे यांच्या जागी परिमल सिंग यांनी रात्री उशिरा पदभार स्वीकारल्याचे समजते.