डोंबिवली : साप्ताहिक ‘विवेक’चे माजी कार्यकारी संपादक आबासाहेब तथा श्रीपाद वामन पटवारी यांचे मंगळवार, दि. २० एप्रिल रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्युसमयी ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी शुभदाताई, तीन पुत्र-सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
बालवयापासून संघ स्वयंसेवक असलेल्या आबासाहेबांना आणीबाणीच्या काळात दीर्घकाळ तुरूंगवासही घडला होता. जनसंघाच्या स्थापनेपासून त्यांचा राजकारणात सक्रिय सहभाग होता. डोंबिवली नगरपालिकेचे पहिले निर्वाचित नगराध्यक्ष होण्याचा बहुमान त्यांना लाभला.
या पदावर दीर्घकाळ त्यांनी काम केले. त्याचबरोबर डोंबिवली नागरी सहकारी बँक, डोंबिवली येथील गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली ग्रंथसंग्रहालय, सिस्टर निवेदिता शाळा तसेच के.व्ही. पेंढरकर महाविद्यालय, टिळकनगर विद्या मंदिर आदी डोंबिवली शहरातील अनेक संस्थात्मक कामांमध्ये त्यांचा दीर्घकाळ महत्त्वपूर्ण सहभाग होता.
गणेश मंदिर संस्थानचे अध्यक्ष या नात्याने गुढीपाडव्याला नववर्ष स्वागतयात्रा सुरू करण्यात त्यांचा पुढाकार होता. साप्ताहिक ‘विवेक’मध्येही 80च्या दशकापासून सक्रिय असलेल्या आबासाहेबांनी, विवेकला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी अनेक प्रयोग केले. ते यशस्वी करून दाखवले.
अलीकडे वृद्धापकाळामुळे विवेकमध्ये येणे कमी झाले होते, तरी विवेकच्या दसरा संमेलनाला ते आवर्जून उपस्थित असत. अतिशय पुढारलेले विचार, नव्या पिढीचे काम जाणून घेण्याबाबत सदैव उत्सुक आणि नव्या पिढीविषयी सदैव आशावादी ही त्यांची गुणवैशिष्ट्ये अनेकांसाठी कार्यप्रेरक ठरली होती. त्यांच्या निधनाने विवेक परिवारातील ज्येष्ठ सदस्य गेल्याची भावना आहे. ही हानी कधीही भरून येणारी नाही.