अनेक प्रयोगशील अक्षरसुलेखनकारांचं काम प्रत्यक्ष पाहण्याचा मला योग आला. भारतात आणि जगात अनेक सुप्रसिद्ध अक्षरसुलेखनकार आहेत. परंतु, फार थोड्या अक्षरसुलेखनकारांनी अक्षरांवर आशयगर्भ साधना केली. अक्षरांची उपासना केली. त्यापैकी एक म्हणजे हैदराबाद जवळील विजीनगरम या ठिकाणचे पुसापतीपरमेश्वर राजू होय!
अक्षरसौंदर्य’ अर्थातच अक्षरसुलेखनाद्वारेच दिसून येते. वाचनीयता हा अक्षरसौंदर्याचा मूळ-प्राथमिक घटक आहे. आपल्याकडे अगदी ‘प्री-केजी’ वा ‘प्री-स्कूल’पासून म्हणजे बाळाला हातात पेन्सिल धरायला जमायला लागलं की, ‘अ-आ-आई’ आणि ‘ग-गणेश’ अशा मुळाक्षरांच्या तसेच अक्षरलिपीच्या सरावास सुरुवात होते. अर्थात, मराठी वा देवनागरीबद्दल आस्था वा आदर असणार्यांसाठी त्यांच्या बाबतीत हे उदाहरण लागू आहे. तसं पाहिलं तर आज जन्माने भारतीय आणि इंग्रजीच्या ‘ए-बी-सी’ने अक्षर लेखनाला ‘प्री-स्कूल’पासून सुरुवात होताना पाहायची वेळ आपल्यावर आलीय. असो. ‘कालाय तस्सै नम:!’ विषयाला भलतीकडे न जाऊ देता आपण फक्त, अक्षरसुलेखन एवढ्यापुरतचं बोलू. कारण, आजच्या लेखाचा नायक आहे परमेश्वर! अक्षरसुलेखन कलेला पवित्र धार्मिक कथांचे संदर्भ घेऊन आणि समृद्ध भारतीय संस्कृतीचे कोंदण घेऊन समर्थांचे तसेच सिद्धहस्त किमयेने व्यक्त करणारा अक्षरसुलेखन परमेश्वर!
प्रसिद्धीला दुय्यम स्थान आणि कलापूर्ण सजग कल्पनाविलासाला प्रथम स्थान देऊन, जगप्रसिद्ध अक्षरसुलेखनकार परमेश्वर राजू यांनी अक्षरांना उपयोजित कलेचा अविभाज्य भाग म्हणून नव्याने ओळख निर्माण करून दिली. मला माहिती असलेले म्हणण्यापेक्षा मला ज्याचं काम नैसर्गिकपणे पाहायला मिळालं, त्यात ज्येष्ठ सुलेखनकार परमेश्वर राजू यांचं काम थक्क करणारं आहे. मध्यंतरी मी नाशिकचे अक्षरसुलेखनकार सुनील धोपावकर यांच्या अक्षरसुलेखन सौंदर्यावर याच ठिकाणी लिहिले होते, पुण्याचे अक्षरसुलेखनकार डॉ. मनोहर देसाई, सुभाष जमदाडे, नागपूरचे भापकर सर, आमचा तरुण अक्षरलेखनकार सारंग कुलकर्णी, डोंबिवलीचा अक्षर सुलेखनकार राम कस्तुरे ज्यांच्या अक्षरसौंदर्याची भुरळ तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना पडली होती. विद्वान आणि ज्ञानपिपासू अटजींना वेदाक्षरावर काम करणार्या पवित्र शुद्ध रंगांचा संस्कृती, प्रगल्भतेच्या कोंदणात सजविणार्या अक्षरलेखनकार राम कस्तुरेंचं अक्षरसाधनेचा सुगंध आला आणि त्यांच्या काही कविता, रामाच्या लेखणीत व्यक्त झाल्या.

अशा अनेक प्रयोगशील अक्षरसुलेखनकारांचं काम प्रत्यक्ष पाहण्याचा मला योग आला. भारतात आणि जगात अनेक सुप्रसिद्ध अक्षरसुलेखनकार आहेत. परंतु, फार थोड्या अक्षरसुलेखनकारांनी अक्षरांवर आशयगर्भ साधना केली. अक्षरांची उपासना केली. त्यापैकी एक म्हणजे हैदराबाद जवळील विजीनगरम (तळूळपरसरीरा) या ठिकाणचे पुसापती परमेश्वर राजू होय! आंध्र प्रदेश वा नुकतेच निर्माण झालेले तेलंगण राज्य येथील मातीत जरी राजू यांचा जन्म 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी झालेला असला, तरी त्यांच्यावर शैक्षणिक संस्कार हे महाराष्ट्राच्या मातीने केलेले आहेत. ‘शासकीय अभिकल्प महाविद्यालय’ अर्थात पूर्वीचे ‘शाकम’ औरंगाबाद येथून कलाशिक्षण पूर्ण करून त्यांनी कलासाधनेस उपजीविकेचं साधन म्हणून सुरुवात करण्यापूर्वी, केंद्रीय विद्यालय पंचमढी आणि सदर्न कमांड, पुणे येथे शालेय आणि विद्यालयीन शिक्षण झाले. ‘सदर्न कमांड’ या शब्दावरून ध्यानी येईलच की तीर्थरूप वडील हे भारतीय सैन्यदलात कर्नल पदाचे अधिकारी होते. म्हणजे ‘आर्मी बॅकग्राऊंड’ असणारा हा कलाकार प्रतिभेचा व्यक्ती, कौटुंबिक पार्श्वभूमी वेगळी असूनही या क्षेत्राकडे कसा काय वळला?
परमेश्वर राजू यांच्याकडे पाहिल्यावरच असे ध्यानी येईल की, ही व्यक्ती कुणीतरी साधक असेल, त्यांनी मराठी अक्षरसुलेखन कलेचे आद्यप्रवर्तक म्हणून ज्यांना मानलं जातं, त्या ज्येष्ठ अक्षरसुलेखनकार र. कृ.अर्थात रघुनाथ कृष्णाकांत जोशी यांच्या योगदानाने प्रेरित होऊन अक्षरसाधना सुरू केली. त्यांच्या बोलण्यातील विनयशीलता, वागण्यातील नम्रता आणि समाजापेक्षा कुणीतरी वेगळे आहोत, हे न प्रदर्शित करता सामान्यांहून सामान्य तसेच अकृत्रिम कलाकार म्हणून वागणं या वैशिष्ट्यामुळे त्यांनी त्यांच्या लेखनशैलीप्रति पारंपरिक खानदानीपण जपलं आहे. त्यांच्या कलाकृती ‘कॉर्पोरेट’ जगताच्या सर्वमान्य संग्राहकांपर्यंत जरी सन्मानाने पोहोचलेल्या असल्या तरी त्यांच्या वागण्या-बोलण्यातून ‘कॉर्पोरेट’-‘सेलिब्रेटीं’चा ‘लूक’ दिसत नाही. अकृत्रिम विनम्र मृदू भाषेतील अक्षरांप्रति आदरभाव व्यक्त करताना त्यांना ऐकणं ही एक पर्वणीच...!!
आपल्याकडे एक ‘ट्रेंड’ असतो पाहा, सामाजिक म्हणण्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या, फिल्मी जगतातील किंवा काहीना काही कारणांनी प्रसिद्धीच्या प्रतलावर वलयांकित असणार्या व्यक्तींबरोबर आपला फोटो-सेल्फी उतरवण्याचा एक उपचार सुरू आहे. परमेश्वर राजू यांची अक्षरसाधना पाहिल्यावर थक्क होऊन, स्तंभित होऊन आदरभावाने, परमेश्वर राजू यांच्याबरोबर आपला फोटो असावा, अशा भावनेने उद्योगपती, मंत्री, जवाहीर, फिल्मी जगतातील व्यक्ती सामाजिक व सांपत्तिकदृष्ट्या मोठ्या व्यक्ती, त्यांचे फोटो संग्रही ठेवतात.अक्षरांना विशिष्ट हेतूने सौंदर्याभिरुचीची सर्व लक्षणे लावून वाचनीयतेचा भंग होणार नाही, याची काळजी घेऊन आणि आशयगर्भता निकषांचं काटेकोरपणे पालन करून अशा दृष्टिकोनातून अक्षरांची लांबी रुंदी-उंचीची परिमाणे सांभाळून व्यक्त करणे, याकडे परमेश्वर राजू कटाक्षाने लक्ष देतात, हे कसं ध्यानात येतं? तर ते त्यांच्या लेखणीच्या लिहित्या भागाला ज्याला आपण ‘कटनिब’ म्हणतो, त्या ‘कटनिब’च्या जाडीच्या पटीत अक्षरांची आकरबद्ध नैसर्गिक वाटणारी रचना, सुस्पष्ट-सुवाच्य-लयदार अक्षरांचं सौंदर्य-अलंकरण आणि सजावट यांचा कलात्मक साज, या सार्यांनी युक्त त्यांच्या अक्षरधारेतून देखणेपण ओसंडत असतं. या सार्या अलंकारांनी युक्त परमेश्वर राजू यांनी भारतीय, धार्मिक, आध्यात्मिक, पौराणिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवर पूर्णपणे स्वतःच्या प्रतिभाशक्तीवर स्वत:च्या कल्पनाविलासावर अक्षरांच्या सौंदर्यीकरणावर अधिक लक्ष केंद्रित करून, प्रचंड काम करून साहित्यांना अभ्यासपूर्ण वाचन-यज्ञ पार करून काही अद्भुत वाटणार्या संग्राह्य पुस्तकांची निर्मिती केली आहे. ज्यांची दखल सार्या जगाने घेतली आहे.
नुसता ‘ओम्’ घेऊन त्या ओंकारातून अनेक आकार या माणसाने निर्माण केले आहेत. हजारो आकारांतून काही निवडक आकारांच्या शिस्तबद्ध तरीही स्वच्छंदी संकल्पनांचे ओंकार समजून देण्याचा प्रयत्न फार अफलातून आहे. ‘आयकॉनिक कॅलिग्राफी’तील हे पुस्तक म्हणजे अक्षरसौंदर्यातून ‘सत्यं शिवं सुंदरम्’ अशा भगवान शंकराच्या सर्वांग रूपाचं दर्शनच होय. मग आपणांस नंदी दिसतो, त्रिशूळ दिसतो, जटेतून प्रकटणारी गंगा दिसते, बाजूला असलेली पार्वती दिसते, जटास्थित चंद्रकोर दिसते आणि हे सारं ओंकारातून व्यक्त झालेलं अक्षरक्षः वर्णन करायला शब्दच कमी पडतात.त्यांचं आणखी एक पुस्तक आहे ‘दशावतारम्’ नावाचं. अक्षरांच्या वळणांद्वारे हे दशावतार पाहताना परमेश्वराच्या अक्षरलीलांनी लीलया अवतरित होताना पाहण्याचा आनंद स्मृतिप्रवण असतो, अशा एकेक अद्भुततेकडे नेणार्या पुस्तकांमध्ये ‘गुरू-बुक’, ‘श्रीमंदिर बुक’, ‘भूत-लिंगम बुक’, ‘रेडियंट फ्लो बुक’ ज्यात अनेक प्रकारच्या दीपज्योतींचे विस्मयकारी आकार परमेश्वराने दृश्यस्वरूपात आणलेले पाहायला मिळतात. ‘रामायण बुक’देखील असेच अफलातून आहे. वाचकाने वास्तविक वाचन या कृतीतून आकलन करण्याची वा ज्ञान, माहिती घेण्याची क्रिया घडते. मात्र, परमेश्वर राजू यांची ही पुस्तके वाचणारा वाचक त्यांच्या पुस्तकातील पाने वाचून नव्हे तर पाहून वाचत असतो, ज्ञान घेत असतो. मला वाटतं, ही स्थिती केवळ आणि केवळ आध्यात्मिक पातळीवर नेणारी क्रिया आहे. ‘शक्ती बुक’ (भाग-१ व २), ‘दी बिगिनींग पर्च’, ‘ट्री ऑफ सेलिब्रेशन’ अशा काही पुस्तकांनी तर जगभरातील नामवंत कॅलिग्राफर्सना आणि कलारसिकांना अद्भुतरीत्या थक्क केलेले आहे.
त्यांची अक्षरसुलेखने पाहताना दर्शक वाचत जातो, सौंदर्यानुभूतीचा उच्च पराकोटीचा कलाभिरूचीपूर्ण आनंद दर्शकाला मिळत जातो. सुलेखन कलाप्रकारात अक्षरे-वर्ण- व्यंजने यांची आकारिक चिन्हे ज्याला आपण ‘सिम्ब्लॉल्स’ म्हणतो, ही कलात्मक आविष्कार साधने म्हणून उपयोगात आणली जातात. म्हणून अक्षरसुलेखन कलेला ललीत कलाप्रकार म्हणून मान्यता आहे.परमेश्वर राजू यांच्यासारख्या संपन्न स्वयंभू सृजनकारांची या कलेसाठी गरज आहे; ती यासाठीच की, अनुकरणशीलतेपेक्षा सृजनात्मक काम जर या कलाप्रकारात भारतीय पातळीवर अधिक सूक्ष्मपणे झालं, तर ग्रीक, रोम, इटली, जर्मनी, जपान, चीन यांच्या रांगेत किंबहुना यांच्याही पुढे जाऊन आपले भारतीय अक्षरसुलेखनकार काम करू शकतील, असा विश्वास परमेश्वर राजू, ओडिशी अक्षरसुलेखनकार एस. के. मोहंती, सारंग कुलकर्णी यांच्यासारख्या अभिजात सुलेखनकारांच्या अक्षरसृजनाचा प्रवास पाहत राहावसा वाटतो. मराठी अक्षरसुलेखनाचे अध्वर्यु र. कृ. जोशी यांचे कार्य वादातीत आहे. वादाच्याही पलीकडे पोहोचलेले आहे. त्यांच्याच अक्षरसृजनाच्या मार्गाने जाणार्या काही अक्षरसुलेखनकारांपैकी असलेल्या पुसावती परमेश्वर राजू यांच्या प्रदीर्घ कलाक्षर साधनेस सुदृढ दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा...!
- प्रा.गजानन शेपाळ