कल्याण : कल्याण पश्चिम भागात असलेल्या महापालिकेच्या उंबर्डे घनकचरा प्रकल्पातील कचऱ्याला रविवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास आग लागली. ही आग विझवण्यासाठी अग्नीशमन दलाच्या गाडय़ा घटनास्थळी पोहचल्या होत्या. या आगीमुळे प्रकल्पाच्या मशीनचे व शेडचे नुकसान झाले आहे.
महापालिकेचा घनकचरा प्रकल्प उंबर्डे येथे आहे. हा प्रकल्प दोनशे मेट्रीक टन घनकचऱ्यावरील प्रक्रिया क्षमतेचा आहे. या प्रकल्पाच्या ठिकाणी गोळा करून आलेला कचरा वर्गीकरण करण्यासाठी एक भली मोठी शेड आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी मोठी मशीन आहे. याठिकाणी कचऱ्यावर विविध प्रकारे प्रक्रिया केली जाते. या प्रकल्पातील साठवून ठेवलेल्या कचऱ्याने मागच्या बाजूने पेट घेतला.
यासंदर्भात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, उंबर्डे येथील कचरा प्रकल्पाला आग लागली आहे. आग विझविण्यासाठी अग्नीशमन दलाच्या गाडय़ा त्याठिकाणी पोहोचल्या आहेत. आग कशामुळे लागली हे निश्चितपणे सांगता येणार नाही.
आगीच्या प्रत्यक्षदर्शी माहिती देणारे वंडार कारभारी यांनी सांगितले की, आगीमुळे प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले आहे. आग मोठी होती. कचरा साठवून ठेवल्याने आग लागली आहे. ही आग लवकर आटोक्यात येईल असे अग्नीशमन दलांकडून सांगण्यात आले आहे.