केंद्रीय मंत्री गोयल यांनी मुख्यमंत्र्यांना जबाबदारीची जाणीव करून दिली
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्रास आतापर्यंत ऑक्सिजनचा सर्वाधिक प्रमाणात पुरवठा झाला आहे. केंद्र सरकार राज्यांशी दररोज संपर्कात असून सर्वतोपरी मदतही करीत आहे. मात्र, तरीदेखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे करीत असलेली ‘नौटंकी’ दुर्देवी आहे, अशी टिका केंद्रीय रेल्वे आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी शनिवारी केली.
महाराष्ट्रास पुरेशा प्रमाणात ऑक्जिसनचा पुरवठा होत नसल्याचा दावा राज्य सरकारतर्फे केला जात आहे. मात्र, राज्य सरकारचा दावा फोल असल्याचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल सांगितले. ते म्हणाले, महाराष्ट्रास आतापर्यंत ऑक्सिजनचा सर्वाधिक पुरवठा करण्यात आला आहे. मात्र, तरीदेखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे करीत असलेली ‘नौटंकी’ अतिशय दुर्दैवी आहे. महाराष्ट्रास सध्या भ्रष्ट आणि पांगळ्या सरकारमुळे त्रास सहन करावा लागत आहे. राज्यातील जनता “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” याचे कसोशीने पालन करीत आहेत. मात्र, आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही “माझे राज्य, माझी जबाबदारी” याचे पालन करण्याची गरज आहे, असे गोयल यांनी यावेळी म्हटले.
केंद्र सरकार ऑक्सिजनच्या पुरवठ्याविषयी राज्यांसोबत नियमितपणे संपर्कात असल्याचेही गोयल यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, राज्यांना सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे. देशात सध्या ११० टक्के ऑक्सिजन उत्पादनाची क्षमता निर्माण करण्यात येत असून त्यामध्ये सर्व भागधारकांचा सहभाग आहे. त्याचप्रमाणे उपलब्ध औद्योगिक वापराच्या ऑक्जिनला वैद्यकीय वापराकडे वळविण्यात येत आहे. पंतप्रधानांनीदेखील नुकताच परिस्थितीचा आढावा घेतला असून केंद्र – राज्य सहकार्य करण्याची ही वेळ असल्याचे सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी क्षुल्लक खेळ थांबविणे आणि निर्लज्ज राजकारण थांबवून जबाबदारी स्विकारावी, असेही गोयल यांनी म्हटले आहे.