मुंबई : हरिद्वारमधील कुंभमेळ्यामध्ये कोरोनाचा विस्फोट पाहायला मिळत आहे. कुंभमेळ्यातून परत आलेले लोक प्रसादात कोरोना वाटतील. त्यामुळे कुंभमेळ्यातून येणाऱ्या लोकांना थेट विलगीकरणात पाठवण्यात येणार आहे, असे वादग्रस्त विधान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. जर राज्यात अशीच परिस्थिती राहिली तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, असेही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
यावेळी त्या म्हणाल्या, हरिद्वारमधील कुंभमेळ्यामध्ये कोरोनाचा विस्फोट झाल्याचे चित्र समोर आले आहे. कुंभमेळ्यात १० ते १४ एप्रिलदरम्यान १७०० हून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झालीय. जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा कोरोनाचा हॉटस्पॉट होण्याची भीती आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी मेळाव्यात पाच दिवसांत २,३६,७५१ जणांच्या कोविड चाचण्या केल्या, त्यापैकी १७०१ जणांच्या रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कुंभमेळ्यातून येणाऱ्या लोकांना थेट विलगीकरणात पाठवलं जाणार आहे. भावना-भक्ती या सगळ्या गोष्टी आहेत. पण तुम्ही जिवंत राहिलात तरच. काही गोंधळी लोक या लोकांना उकसवत आहेत, असा निशाणाही किशोरी पेडणेकर यांनी लगावला आहे.
पुढे त्या म्हणाल्या, मुंबईत परिस्थिती बिकट आहे. आता विनंती करुन झाली आहे. ऑक्सिजनचा तुटव़डा जाणवत आहे. त्यानंतर लगेच त्यांना कोव्हिड सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे, हे दृश्य मुंबईकरांनी कधीच पाहिले नाही. आता सर्व सुविधा कमी पडू लागल्या आहेत. मी हात जोडून विनंती करते, कृपया घराबाहेर पडू नका, असेही महापौरांनी सांगितले.मुंबईकरांनो तुमची काळजी घ्यायला आम्ही आहोत. मुंबईतील बेडची संख्या १९ हजारावरुन २५ हजार केली आहे. तर ६ मोठे जम्बो सेंटर उभारले आहेत. मुंबईत जर परिस्थिती अशीच राहिली तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. मुंबईत आता ऍम्ब्युलन्सचा आवाज वाढला आहे. तुम्हाला लॉकडाऊन हवाय का? असा सवाल किशोरी पेडणेकरांनी केला.