‘तिची’ जागतिक विक्रमाला गवसणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Apr-2021   
Total Views |

MahaMTB _1  H x
 
भारताला योगाची मोठी परंपरा असून त्याबाबत गेल्या काही वर्षांत मोठी जनजागृतीही झाली. आज आपण जाणून घेऊया योगक्षेत्रातच जागतिक विक्रमाची नोंद करणार्‍या सातवीतील श्रेया शिंदेबद्दल...
 
 
श्रेया महादेव शिंदे हिने सलग ४८ मिनीट ३८ सेंकदांत बर्फावर ९२ विविध प्रकारची योगासने करून जागतिक विक्रमाला गवसणी घातली. श्रेयाने केलेल्या या विक्रमाची नोंद ‘अखिल भारतीय योग महासंघ’ (एबीवायएम)च्या ‘योगा रेकॉर्ड बुक’मध्ये करण्यात आली आहे. या डोंबिवलीकर कन्येचे यश नक्कीच कौतुकास्पद आहे. श्रेयाने हे यश कसे मिळविले, त्यासाठी काय मेहनत घेतली हे आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया.
 
 
श्रेयाचा जन्म डोंबिवलीत झाला. श्रेया डोंबिवली पूर्वेतील पाडुरंगवाडी परिसरात राहते. ती मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता सातवीत शिकत आहे. उत्तम आरोग्याचा मूलमंत्र म्हणजे योग आहे. योगाचे महत्त्व पाश्चिमात्य देशांनीही जाणले आहे. त्यामुळेच भारतीय परंपरा लाभलेला योग पाश्चिमात्य देशांनीही स्वीकारला आहे. फिटनेससाठी आणि काहीतरी अ‍ॅक्टिव्हिटी श्रेयाने करावी, या उद्देशाने तिच्या पालकांनी तिचे नाव योग वर्गामध्यो नोंदवले. चिमुरड्या श्रेयाने सहा-सात वर्षांची असतानाच योगाचे धडे गिरविण्यास सुरुवात केली. श्रेयाची मोठी बहीणदेखील योग शिकण्यासाठी जात होती. श्रेया व तिची बहीण श्रुती या दोघीही एकत्र योग शिकतील, या उद्देशाने श्रेयाची आई वंदना यांनी तिला योग प्रशिक्षणासाठी पाठविले होते. श्रेयाने बर्फावर योग केला ती मुख्य संकल्पना योगगुरू प्रवीण बांदकर यांची होती.
 
 
श्रेयाने योगगुरू प्रवीण बांदकर यांच्या मार्गदर्शनाखाली बर्फावर योग करण्याचे प्रशिक्षण घेतले. पण, त्यावेळी श्रेया वयाने खूपच लहान होती. त्यात बर्फावर योग करणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. श्रेयाने तरीही एका कार्यक्रमात दोन ते तीन मिनिटे बर्फावर योग केला होता. श्रेयाला नवनवीन गोष्टी शिकायला नेहमीच आवडतात. त्यामुळे श्रेयाने ‘कथ्थक’ आणि ‘अटलांटिक’चे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. या सगळ्यात योग मात्र मागे पडला. दोन वर्षांपूर्वी श्रेया पुन्हा योगाकडे वळली. तेव्हापासून नित्यनेमाने ती एक ते दीड तास योगाचे प्रशिक्षण घेते. श्रेयाची आईदेखील योगाचे प्रशिक्षण देते. श्रेया आई आणि श्रुती या दोघींच्या हाताखाली योगाचा सराव करीत होती.
 
 
एके दिवशी दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम पाहत असताना श्रेयाच्या आईच्या मनात विचार आला की, श्रेयाने योगामध्ये विक्रम करावा. श्रेयाची तेवढी योग्यताही आहे, हे श्रेयाची योगाची गुरू आणि आई असलेल्या वंदना यांनी हेरले. त्यांनी आपल्या मनातील विचार श्रेयाकडे बोलून दाखविला. श्रेयानेही त्याला क्षणाचाही वेळ न दवडता होकार दिला. आता श्रेयाला आपले ध्येय गाठण्यासाठी अधिक सरावाची गरज होती. कोरोनामुळे बर्फावर सराव नको, असे वाटत होते. पण, उन्हाळा सुरू झाल्यावर आता काही हरकत नाही, असे वाटल्यावर श्रेयाने बर्फावर सराव सुरू केला. हा विक्रम करण्याच्या दोन महिने आधीपासून तिने हा सराव सुरू केला. श्रेया सोसायटीतच आठवड्यातून दोन दिवस बर्फाची लादी आणून योगाचा अर्धा तास सराव करीत होती. बर्फावर योग केल्याने रक्तवाहिन्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.
 
 
बर्फामुळे हा धोका असतो. त्यामुळे श्रेयाने दररोज केवळ अर्धा तासाच बर्फावर सराव केला. ‘अखिल भारतीय योग महासंघा’तर्फे श्रेयाला विक्रमाची नोंद करण्यासाठी ‘फेसबुक लाईव्ह’ पाठविण्यासाठी सांगितले होते. कोरोनामुळे परीक्षक प्रत्यक्ष येणार नव्हते. श्रेयाने सोसायटीतील उद्यानामध्ये हा ‘व्हिडिओ’ केला होता. श्रेयाचे योगाचे ‘लाईव्ह’ पाठविल्यावर त्यांनी फेसबुकद्वारे तिचा विक्रम झाल्याचे जाहीर केले. ‘अखिल भारतीय योग महासंघा’मध्ये आतापर्यंत कुणीही बर्फावर योग केला नव्हता. दरम्यान, ‘कलाम बुक’ आणि ‘वंडर बुक’मध्ये नोंद होईल असा विक्रम करायचा आहे, असा प्रस्ताव त्यांना पाठविला आहे. त्यापैकी ‘वंडर बुक’ने प्रस्ताव मान्य केला आहे.
 
 
बर्फावर योग करताना पकड मिळत नसते. वॉर्मअप करून शारीरिक तापमान योग्य झाल्यावर बर्फावर योग करणे सोपे जाते. त्यासाठी सराव कामी येतो. बर्फावर योग करताना लक्ष एकाग्र होण्याची गरज आहे. बर्फावर योग करताना घसरण्याची शक्यता असते. अंग थंड पडल्यामुळे जडपणा जाणवतो. त्यामुळे बर्फावर योग करणे तशी कठीण गोष्ट आहे. योग इतर अ‍ॅक्टिव्हिटीना मदत करणारा आहे. योग ही शारीरिकदृष्ट्या चांगली गोष्ट आहे, असे श्रेया सांगते. तर भविष्यात श्रेयाला डॉक्टर होण्याची इच्छा आहे. श्रेयाला ‘कथ्थक’चीही आवड आहे. मागच्या वर्षी कोरोनामुळे तिची नृत्याची परीक्षा होऊ शकली नव्हती. यंदाच्या वर्षी ती ‘कथ्थक’ची चौथी परीक्षा देणार आहे. श्रेयाच्या आई वंदना या खासगी योग वर्ग घेतात.
 
 
तर वडील हे खासगी कंपनीत काम करतात. श्रेयाला नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड आहे. त्यामुळे आता ती मल्लखांबचा सराव सुरू करणार आहे. श्रेयाला घरी बनविलेले पदार्थ खायला फार आवडतात. चित्रकलेचीही तिला आवड आहे. यापुढील काळात ‘गिनीज बुक’मध्ये विक्रमाची नोंद करण्याचा श्रेयाचा मानस आहे. लहान वयातच योगामध्ये विक्रमाची नोंद करणार्‍या श्रेयाचे ‘गिनीज बुका’तील नोंदीचे ध्येयही पूर्ण होईल. तिला भावी आयुष्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!
 
 
@@AUTHORINFO_V1@@