मलंगगडाचा प्रश्न पेटला !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Apr-2021   
Total Views |

malagnagad _1  


२७ एप्रिल रोजी जाऊन आरती करण्याचा मनसेचा निर्धार

कल्याण: कल्याण येथील मलंगगडावर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते आरती करीत असताना, काही जिहादी प्रवृत्तीच्या कट्टरपंथीयांनी त्यात व्यत्यय आणल्याचा खळबळजनक प्रकार नुकताच घडला. मात्र, या प्रश्नावरून आता राजकारण पेटण्यास सुरुवात झाली आहे. या घटनेनंतर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी मलंगगडावर जाऊन आरती करण्याचा निर्धार केला आहे. जाधव हे या तयारीत असताना त्यांना पोलिसांनी वाटेतच अडविले. त्यांना ताब्यात घेण्यात आले. मात्र, पोलिसांकडून अडवणूक झाली असली तरी येत्या २७ एप्रिल रोजी मलंगगडावर जाऊन आरती करणार असल्याची माहिती जाधव यांनी समाजमाध्यमांद्वारे दिली.

कल्याणच्या मलंगगडावर प्रतिपौर्णिमेला आरती होत असते. मलंगगडावर हिंदूदेखील मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात. मात्र, सध्या कोरोनाच्या संकटामुळे आखून दिलेल्या नियमानुसार सात जणांच्या उपस्थितीत हुताशनी पौर्णिमेनिमित्त आरती सुरू असताना काही कट्टरपंथीयांनी ती बंद पाडली. या घटनेनंतर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी मलंगगडावर जाऊन आरती करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी त्यांना काकडवाल गावाजवळ अडविले. तसेच त्यांना पोलिसांकडून माघारी जा, असे सांगण्यात आले. मात्र, जाधव हे मलंगगडाच्या पायथ्याशी तरी जाणारच, या मुद्द्यावर ठाम होते. त्यांच्यासोबत १०० ते १५० कार्यकर्ते होते. जाधव यांना नेवाळी पोलीस चौकीत नेण्यात आले. जाधव हे आज मलंगगडापर्यंत पोहोचू शकले नाही, तरी त्यांचा आरती करण्याचा निर्धार पक्का आहे. येत्या २७ एप्रिलला मलंगगडावर जाऊन आरती करणार आहेत. “हा विषय संवदेनशील असल्याने त्यासाठी नियोजन करून आजचा दिवस मलंगगडावर जाण्यासाठी ठरविला होता. त्यानुसार आज आम्ही जात असताना पोलिसांनी मलंगगडापर्यंत आम्हाला पोहोचू दिले नाही. पण, पुढच्या पौर्णिमेला आम्ही तिथे जाणार आहोत,” असे जाधव यांनी सांगितले आहे.


‘हिंदू मंच’ लढा उभारणार

हिंदुत्ववादी १८ संघटनांचा मिळून ‘हिंदू मंच’ आहे. या ‘हिंदू मंच’मध्ये भाजप, शिवसेना, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल अशा १८ संघटना आहेत. मलंगगड प्रकरणासंदर्भात ‘हिंदू मंच’ लढा उभारणार आहे. या प्रकरणी कडक कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका आहे. आम्ही मलंगगडावर जाणार की नाही, हे उद्या ठरेल
   - पराग तेली, विहिंप, जिल्हा धर्मप्रसारक प्रमुख, कल्याण

शिवसेनेचे मौन
 
‘हिंदुत्वाची वहिवाट, हीच मलंगमुक्तीची पहाट’ असा नारा देत दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांनी मलंगमुक्तीचे आंदोलन सुरू ठेवले होते. शिवसेना आजही हे आंदोलन करते. त्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे सहभागी होतात. मात्र, मलंगगडावरील समाधीला हिंदू देवस्थानाचा दर्जा देण्याबाबत शिवसेना प्रणित महाविकास आघाडी सरकार मूक गिळून आहे. त्यामुळे आरतीला विरोध झाल्यावर आंदोलन करणारी शिवसेना मौन बाळगून बसली आहे. सत्ता टिकविण्यासाठी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक पावित्रा घेतला जात नसल्याची टीका भाजपच्या गोटातून व्यक्त केली जात आहे.
@@AUTHORINFO_V1@@