समस्यामुक्तीचे अमृत :अमृता आंबेरकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Mar-2021   
Total Views |

mahila din _1  


आपल्याला आपल्या सभोवती अनेक महिला विविध क्षेत्रात काम करताना आणि आपले नाव उज्जवल करताना दिसतात. आज तर असे कोणतेही क्षेत्र नाही, ज्यात महिलांनी प्रवेश केला नाही वा महिला त्या क्षेत्रात कार्यरत नाहीत. असेच एक क्षेत्र म्हणजे ‘वास्तू कन्सल्टन्सी’ आणि ‘स्पिरिच्युअल’ किंवा ‘एनर्जी हिलिंग’चे. मुंबईतील बोरिवली परिसरात राहणार्‍या अमृता आंबेरकर गेल्या दहा वर्षांपासून वास्तुशास्त्र आणि संबंधित क्षेत्रात यशस्वीरीत्या कार्यरत आहेत. आज ‘जागतिक महिला दिना’निमित्ताने त्यांचा आजपर्यंतचा संघर्षमय प्रवास कसा होता, ते आपण जाणून घेऊया, त्यांच्याच शब्दांत...


वास्तुशास्त्रतज्ज्ञ आणि स्पिरीच्युअल हिलर प्रॅक्टिशनर म्हणून कार्यरत आहे. मी, मूळची सातार्‍याची भक्ती अशोक गोसावी. पण, लग्नानंतर मालवण आणि आता मुंबईतील बोरिवलीमध्ये स्थायिक आहे. मला अध्यात्माची आवड वडिलांकडूनच प्राप्त झाली. जीवनात संघर्ष आणि अडचणी निर्माण झाल्यावर व्यक्ती बर्‍याच गोष्टींचा आधार घेतो, कुणी पत्रिका पाहतो, हात दाखवतो, वास्तू उपाय वगैरे वगैरे... तसेच काहीसे माझ्या जीवनातही झाले. २०१० आणि त्या पूर्वी एका कंपनीत मी अकाऊंटंट म्हणून कार्यरत होते. पण, जीवनात अडचणी मात्र होत्याच, काही वास्तुशास्त्राचे वगैरे उपाय करता करता माझ्या मनात या मागच्या विज्ञानाचे गांभीर्य जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आणि १२ वर्षांपूर्वी मी स्वतःसाठी म्हणून वास्तुशास्त्राचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. शिकता शिकता आणि जीवनात घडणार्‍या सकारात्मक बदलामुळे मी माझ्या आवडीलाच ‘प्रोफेशन’मध्ये बदलायचे ठरवले. गेल्या ११ वर्षांपासून वास्तुविज्ञान आणि उपचार पद्धतींसह मी काम करीत आहे. आतापर्यंत जवळपास ५०० पेक्षा अधिक वास्तूंसाठी ‘कन्सल्टिंग’ केले आहे. आणखी फार मोठा पल्ला गाठायचा आहे, पण मी आतापर्यंत जे जे काम केले, त्या त्या प्रत्येक वेळी आपण आयुष्य जगताना किमान एखाद्या व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणले, तर त्यासारखे कोणतेही सुख नाही असे माझे ठाम मत तयार झाले. शिवाय बर्‍याच जणांना मदत केल्याचा आशीर्वादही मिळतो, ही माझ्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट!


खरेतर माझ्या करिअरची सुरुवात ‘टॅरो रीडिंग’पासून झाली आणि ‘टॅरोट’च्या मदतीने मला माझ्या जीवनाचा मार्ग मिळाला. मग वास्तुशास्त्रातील रुचीमुळे मी आजप्रमाणित वास्तू सल्लागार आहे. ‘पारंपरिक वास्तू’, ‘पिरॅमिड वास्तू’ आणि ‘आध्यात्मिक वास्तुशास्त्रा’मध्ये मी विशेषत्वाने काम करते. वास्तू उपायांमध्ये कोणत्याही वास्तूची तोडफोड न करता, मी कलर थेरपी, रत्नाध्यय, पिरॅमिड, क्रिस्टलस आणि अशा बर्‍याच गोष्टींचा समावेश करते. वास्तूमधील वास्तुतज्ज्ञ-मास्टर्सपासून वास्तूमध्ये ‘पीएचडी’पर्यंतचा पल्ला मी गाठला आहे. ‘उसुई रेकी’, ‘कुंडलिनी रेकी हिलर’,‘ऑरा क्लींजिंग’, ‘ताण व्यवस्थापन’,‘ चक्र उपचार आणि संतुलन’, ‘अंकशास्त्र’, ‘प्रार्थना थेरपी’, ‘क्रिस्टल’, ‘स्विचवर्ड’,‘एंजेल कार्ड रीडर’ आणि अशा बर्‍याच ‘मोडॉलिटीज’मध्ये मी कार्य करते. मात्र, आता मी जिथे पोहोचले आहे, तिथपर्यंत येण्याचा सुरुवातीचा काळ खूपच कठीण होता. समोर खूप आव्हाने होती. पण, त्याचबरोबर स्वतःवर विश्वास आणि परमेश्वरावर श्रद्धा होती. श्रद्धा आणि चिकाटी असली की, व्यक्ती स्वतःमधल्या क्षमतेचा आणि ऊर्जेचा सकारात्मक वापर करतो. जेव्हा हे सगळे शिकण्यास सुरुवात केली तेव्हा या युगातील लोकांना हे पटणारे नव्हते. नातेवाईक, मित्रपरिवार यांना बरेच प्रश्न पडत होते. असे होते का? हे खरे आहे का? वगैरे... पण, जेव्हा हळूहळू त्यांना काही प्रश्नांचे उपाय या माध्यमातून मिळाले, तेव्हा मला पुढे काही बोलण्याची गरजच पडली नाही.


वास्तुशास्त्राचा अभ्यास करत असताना पटकन नोकरी सोडणेदेखील शक्य नव्हते, कारण पैशांची चणचण होतीच, त्यात चार महिन्यांची चिमुकली पदरात होती. मग काय आठवडाभर नोकरी आणि रविवारी दिवसभर वास्तुशास्त्राचा वर्ग आणि अभ्यास. मुलीला वेळ देता येत नाही याचे खूप दु:ख होत होते. पण, त्यावेळेस जर मी त्या दु:खाकडे पाहत राहिले असते तर आज हे शक्य झाले नसते. आज माझी मुलगी अभिमानाने सांगू शकली नसती की, माझी आई उत्तम वास्तुतज्ज्ञ आणि हिलर आहे. ज्याप्रमाणे मानवी शरीर पाच घटकांवर आधारित आहे, त्याचप्रमाणे वास्तू-आपले घर हेदेखील पाच घटकांवर आधारित आहे. तथापि, हे बदल केल्यावर किंवा वास्तू उपाय केल्यावर जादूची कांडी फिरवल्यासारखे बदल होतात आणि सगळे आपल्या मनासारखे होते, असा समज असेल तर हे पूर्ण चूक आहे. वास्तुशास्त्र किंवा इतर गोष्टी या आपल्या जीवनात ‘टोनिकेशन’ काम करतात,‘मेडिकेशन’च नाही. म्हणजेच आपली मेहनत, फोकस, हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. हे समजले आणि आज मी माझ्या जीवनात समाधानी आहे. कारण जे आपल्याला मिळते ते आपल्यासाठी योग्यच असते, असा माझा विश्वास आहे. जर आता एखाद्याच्या जीवनात अडचणी, संघर्ष असतील, तर हा तुमचा ‘लर्निंग पिरियड’ आहे आणि जर यातून तुम्ही शिकलात आणि योग्य तो प्रयत्न केला तर तुम्ही नक्कीच यातून लवकरच बाहेर पडाल. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. जर तुम्ही हरलात तर समजा की जीवनाने तुम्हाला अजून एक संधी दिली आहे, ज्यात तुम्ही अजून चांगला ‘परफॉर्मन्स’ करू शकता आणि जिंकलात तर थांबू नका, पुढची पायरी चढायला सुरुवात करा आणि महत्त्वाचे म्हणजे, दोन्ही टप्प्यांत परमेश्वराचे आभार मानायला विसरू नका. वाईट विसरून चांगल्यावर लक्ष केंद्रित करा आणि बघा की, आयुष्य किती सुंदर आहे ते... असाच विचार पुढे ठेवून मी माझ्या आयुष्यात खूप काही शिकले आणि सकारात्मक बदल घडवले, नाहीतर तसे सगळेच कठीण होते. त्याचबरोबर कृतज्ञतादेखील खूप महत्त्वाची आहे. आपल्याकडे काही नाही यापेक्षा आपल्याकडे काय आहे, हे बघायला शिका आणि जे नाही ते अगदी सहजतेने कोणतीही तक्रार न करता परमेश्वराकडे आणि निसर्गाकडे मागा, नक्कीच तुम्हाला ती गोष्ट तुमच्या क्षमतेप्रमाणे मिळेल.



जीवनातली प्रत्येक गोष्ट जशी महत्त्वाची असते, तशीच जीवनात येणारी प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची आहे. कारण, प्रत्येकाने मला काहीतरी शिकवले आहे. कुठलेही यश एकाचे नसते, त्यात खूप जणांचा हात असतो, आज मी या माध्यमातून माझ्या जीवनात असणार्‍या प्रत्येक व्यक्तीचे मनापासून आभार मानू इच्छिते. या माध्यमातून मी माझ्या आईवडिलांचे विशेष आभार मानू इच्छिते. कारण, त्यांनी मला योग्य संस्कार तर दिलेच; पण माझ्या पडत्या काळात ते माझ्यासाठी ठामपणे उभे राहिले. माझ्या चार महिन्यांच्या मुलीची जबाबदारी घेतल्यामुळे मी अगदी बिनधास्तपणे माझ्या कामावर आणि शिक्षणावर लक्ष देऊ शकले. माझे जीवनसाथी अमेय आंबेरकर आणि माझी मुलगी आर्या यांची मला खूप साथ होती आणि आहे, जे माझे खूप महत्त्वाचे खांब आहेत. ज्यामुळे मी आज एक सक्षम महिला म्हणून कार्य करते आहे. ते दोघेही माझ्यासाठी सकारात्मक ऊर्जा आहेत. माझी मुलगी १३ वर्षांची असूनदेखील मला म्हणते, “आई, तू बिनधास्त जा, ‘आय विल हँडल एवरीथिंग.’ ” म्हणूनच आज मी प्रत्येक स्त्रीला सांगू इच्छिते की, आताच ती वेळ आहे जिथे आपण स्वतःसाठी उभे राहून सगळ्या गोष्टीत सक्षम व्हायचे आहे. कारण, आपण सक्षम झालो तर संपूर्ण घर सक्षम होणार आहे. त्यासाठी कोणत्याही वेळेची वाट पाहण्याची गरज नाही. अगदी वास्तुशास्त्र आणि यासारख्या बर्‍याच क्षेत्रात आपण सहजच करिअर करून स्वतःच्या पायावर उभे राहू शकतो. त्यासाठी प्रत्येक स्त्रीला मदत करण्यासाठी आणि मार्ग दाखवण्यासाठी मी तयार आहे. अगदी कमी पैशात तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहू शकता, केवळ एक पाऊल पुढे टाकण्याची गरज आहे. अजून एक साधा सोपा मार्ग मी प्रत्येक स्त्रीला देऊ इच्छिते तो म्हणजे, दिवसातले दोन तास खूप महत्त्वाचे असतात. एक म्हणजे, सकाळी उठल्यानंतरचा एक तास आणि रात्री झोपण्यापूर्वीचा एक तास या दोन्ही वेळी स्वतःला खूप आनंदी ठेवायचे आहे. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम आरशासमोर उभे राहा आणि स्वतःला ‘आय लव्ह यू’ असे म्हणायला सुरुवात करा; पाहा, आयुष्य किती सुंदर होईल ते...

- अमृता आंबेरकर
@@AUTHORINFO_V1@@