अहमदनगर: नगर शहराजवळ सूर्यनगर येथे राहणार्या महिलांना मंदिरात केल्या जाणार्या आरतीसंबंधी वादातून नोव्हेंबर २०२० मध्ये निर्घृण मारहाण झाली होती. गुरुवार, दि. ४ मार्च रोजी संध्याकाळी ‘पद्म पुरस्कारा’ने सन्मानित गिरीश प्रभुणेंनी त्या सर्व पीडितांची नगर येथे जाऊन भेट घेतली. यावेळी ‘विवेक विचार मंचा’चे चंद्रकांत जाधव देखील उपस्थित होते. दि. ६ नोव्हेंबर, २०२० रोजी नगर शहरातील सूर्यनगर भागात राहणार्या महिलांना भीषण मारहाण झाली होती.
वस्तीतील गणेश मंदिरात होणार्या आरतीवरून सुरू असलेल्या वादातून ही मारहाण झाल्याचे पीडित महिलांचे म्हणणे आहे. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी दोन्ही गटांवर गुन्हे दाखल केले होते. पीडित महिलांची तक्रार घेत असताना पोलिसांनी सहकार्य केले नाही, असा आरोप त्यांनी केला होता. तसेच पोलीस प्रशासनाने अत्यंत अवमानकारक शब्द वापरले, असा आरोप महिलांकडून झाला होता. दै. ‘मुंबई तरुण भारत’ने नगर येथे जाऊन याविषयी सविस्तर वार्तांकन केले. त्यानंतर ‘पद्मश्री’ गिरीश प्रभुणे यांनी नगर येथे जाऊन संबंधित महिलांची भेट घेतली. गिरीश प्रभुणे यांनी अनेक वर्षे भटके-विमुक्त समाजासाठी काम केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांचा ‘पद्म’ पुरस्काराने गौरव केला होता.