मुंबई : भांडुप येथील ड्रीम्स मॉलमध्ये लागलेल्या आगीनंतर येथील २१ कोरोनाबाधित बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. परंतु त्यांच्याशी संपर्क झाला असून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यातील अनेकांमध्ये लक्षणेच नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
ड्रीम्स मॉलमध्ये लागलेल्या आगीचे लोण तिसऱ्या मजल्यावर असलेल्या सनराईज कोविड रुग्णालयापर्यंत पसरले आणि धुरामुळे गुदमरुन ९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर दोघे कोरोनाची लागण होऊन आधीच दगावल्याचे रुग्णालयात प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे या दुर्घटनेत ९ रुग्ण दगावले, तर ६७ रुग्णांना वाचवण्यात मुंबई अग्निशमन दलाला यश आले. मात्र २१ रुग्ण बेपत्ता झाल्याचे समोर आले होते. त्यांचा दोन दिवसांनंतर शोध लागला असून त्या सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर यापैकी अनेकांमध्ये लक्षणेच नाही, तरीही त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, सनराईज रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांना मुंबई अग्निशमन दलाच्या दीडशेहून अधिक जवानांनी सुखरुप बाहेर काढले. या बचावकार्यात ते कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे या जवानांची योग्य ती काळजी घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.