नवी दिल्ली : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गृहसचिव अजय भल्ला यांची भेट घेतली आहे. यावेळी फडणवीस यांनी सर्व पुरावे तसेच कागदपत्रे गृहसचिवांना दिले आहेत. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी गृहसचिवांकडे आपण पुरावे जमा केले असून यासर्व प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली असल्याची माहिती दिली. यावेळी फडणवीस यांच्यासोबत खासदार मनोज कोटक, कपिल पाटील, खासदार संजयकाका पाटील आणि खासदार उन्मेष पाटीलही उपस्थित होते.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, माझ्याकडे असणारे सर्व पुरावे मी गृहसचिवांना दिले आहेत. गृहसचिवांनी हे सर्व कागदपत्रे पडताळून सरकार योग्य ते कारवाई करेल असे आश्वासन दिल्याचेही फडणवीस म्हणाले. माझं स्पष्ट मत आहे की २५ ऑगस्टपासून हा सर्व अहवाल राज्य सरकारकडे असताना तत्कालीन डीजींनी तात्काळ सीआयडी चौकशीचे आदेश दिलेले असताना तेव्हाच कारवाई का झाली नाही ? कोणाला वाचविण्याचा प्रयत्न सरकार करत होते. कोण उघडं पडेल ? असं सरकारला वाटत होतं हे आम्हाला कळालं पाहिजे. म्हणून मी आज हे सर्व पुरावे गृहसचिवांकडे जमा केले असल्याचे फडणवीस म्हणाले.