काय असणार 'एनआयए' आणि 'एटीएस'चे पुढचा पुढचा निर्णय ?
मुंबई: मनसुख हिरन हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात 'एटीएस'ला यश आल्याचे वृत्त समोर येत आहे. स्फोटकांनी भरलेल्या गाडी प्रकरणात मुख्य दुवा असलेल्या मनसुख हिरन यांचा मृतदेह ५ मार्च रोजी मुंब्रा खाडीत सापडला होता. मनसुख हिरन यांची हत्या केल्याप्रकरणी 'एटीएस'ने दोघांना अटक केली आहे. या प्रकरणाचा छडा लागल्याचा 'एटीएस'चा दावा आहे, तर 'एनआयए'ची चौकशी सुरूच आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
४ मार्चच्या रात्री मनसुख हिरन अचानक गायब झाले होते. त्या रात्री ते ८ वाजल्यापासून ८.३० पर्यंत व्हॉट्सअॅप कॉलवर अनोळखी व्यक्तीशी सतत बोलत होते. ही व्यक्ती कोण होती, याचा शोध 'एटीएस' घेणार होती. गुजरातमधील बुकी नरेश गोर याने दिलेल्या आठ बोगस सीमकार्डचा वापर मनसुख हत्येच्या कटात करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. यातील काही सिम कार्ड सचिन वाझे आणि विनायक शिंदे वापरत असल्याचे पुरावेदेखील मिळाले आहेत. एकूण ११ जणांनी मिळून मनसुख हिरन यांची हत्या केली असण्याची शक्यता असून हत्येच्या रात्री यातील तीन ते पाच जण प्रत्यक्ष मनसुख सोबत होते, असा दावा केला जात आहे. शिवाय विनायक शिंदेदेखील घटनास्थळी उपस्थित होता, अशी माहिती 'एटीएस'च्या हाती लागली आहे.
मनसुख हिरन यांची हत्या केल्याप्रकरणी नरेश रमणिकलाल गोर (वय ३१) आणि विनायक बाळासाहेब शिंदे (वय ५१) या दोघांना अटक केली आहे. अटक केलेला आरोपी नरेश गोर हा मुंबईत बुकी म्हणून बेकायदेशीर धंदा करत होता. त्यानेच सचिन वाझेंना सीमकार्ड पुरवले आहेत. दुसरा आरोपी विनायक शिंदे हा पोलीस दलातील बडतर्फ कर्मचारी आहे. लखन भैया बनावट चकमकीप्रकरणी शिंदे आरोपी होता. 'एटीएस'ने या दोघा आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.