राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात भातखळकरांची तक्रार

    22-Mar-2021
Total Views |
anil deshamukh and atul b



देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्याची मागणी

मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला मुंबईतून दर महिन्याला १०० कोटी रुपये खंडणी जमा करून देण्याचे आदेश दिले होते, अशी माहिती मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहीलेल्या पत्रात दिली आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडून अशाप्रकारे राज्याच्या गृहमंत्र्यांवर विरोधातच असा दावा करणे, हे अतिशय गंभीर प्रकरण असून, या प्रकरणी अनिल देशमुख यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करावा व परमवीर सिंग यांनी आपल्या पत्रात नमूद केलेल्या प्रत्येक व्यक्तीची सखोल चौकशी करावी अशी मागणी करत, मुंबई भाजपा प्रभारी अतुल भातखळकर यांनी समता नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी पुराव्यांसह इतके गंभीर आरोप करूनही दोन दिवसांपेक्षा जास्त कालावधीनंतरदेखील राज्य सरकार कडून कोणत्याही प्रकारची चौकशी सुरू करण्यात आलेली नाही. इतकेच नव्हे तर परमवीर सिंग यांनी लिहिलेल्या पत्राचा दुसऱ्या दिवशी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून करण्यात आलेल्या खुलासा पत्रात सुद्धा परमवीर सिंग यांच्या कोणत्याही आरोपांचे खंडन करण्यात आलेले नाही, त्यामुळे परमवीर सिंग यांच्याकडून करण्यात आलेल्या आरोपामध्ये तथ्य असण्याची दाट शक्यता आहे. तसेच, या प्रकरणात नावे असलेल्या अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक पालांडे, पोलीस उपायुक्त भुजबळ, सहाय्यक पोलीस आयुक्त पाटील यांची चौकशी केल्यास आणखी काही बाबी समोर येतील. तसेच यातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यामुळे या प्रकरणी अनिल देशमुखांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे, या संदर्भात राज्य सरकारकडून २४ तासांत गुन्हा दाखल न झाल्यास आपण उच्च न्यायालयात जाणार असल्याचा इशारा सुद्धा आ. अतुल भातखळकर यांनी दिला आहे.

तसेच या पत्रात समतानगर पोलिस स्थानकाच्या अंतर्गत येणाऱ्या बार, रेस्टॉरंट, पब यांच्याकडून किती खंडणी आतापर्यंत वसूल करण्यात आली आहे व ती कोणी वसुली केली, याची सुद्धा सखोल चौकशी करण्याची मागणी यावेळी आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.