२०५० पर्यंत राज्याच्या वार्षिक तापमानात २.५ सेल्सिअसपर्यंत वाढ

    21-Mar-2021
Total Views |

temperature _1  


शेतीवर परिणाम

 
मुंबई (प्रतिनिधी) - महाराष्ट्रात तापमानात होणारी वाढ आणि हवामानातील बदलामुळे भविष्यात अन्नधान्य उत्पादनावर गंभीर परिणाम होणार असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. प्रामुख्याने २०३३ सालानंतर राज्यातील हवामानात होणाऱ्या बदलांमुळे बहुतांश प्रदेशातील महत्वाचे पिकांच्या उत्पादनावर गंभीर परिणाम अपेक्षित आहेत. या संशोधनानुसार २०५० पर्यंत राज्याच्या वार्षिक सरासरी तापमानामध्ये ०.५ ते २.५ अंश सेल्सिअस वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
 
 
 
“जर्नल स्प्रिंगर नेचर” या संशोधनपत्रिकेत महाराष्ट्रातील वातावरणाचे भविष्य आणि त्याचा पिक उत्पादनावर होणाऱ्या परिणामांविषयीचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. राहुल तोडमल यांनी हे संशोधन केले आहे. त्यानुसार पुढील पाच दशकांमध्ये राज्यातील ८० टक्के जिल्ह्यांमध्ये वार्षिक सरासरी तपमान, वार्षिक किमान तापमान आणि वार्षिक कमाल तपमान यामध्ये लक्षणीय बदल होतील. प्रादेशिकदृष्ट्या विचार केल्यास कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये १ ते २.५ अंश सेल्सिअस तापमानाची लक्षणीय वाढ होणे अपेक्षित आहे.तापमान वाढीमुळे ज्वारी, बाजरी आणि कडधान्यासारख्या पारंपारिक पिकांबरोबरच ऊस, कांदा, मक्यासारख्या नगदी पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होणार आहे. प्रामुख्याने हिवाळ्यात होणारी सरासरी तापमानाची वाढ गव्हासारख्या पिकाच्या उत्पादकतेसाठी मारक ठरणार आहे.
 
 
 
मोसमी पर्जन्यामध्ये २०१५ ते २१०० या काळात भरीव वाढ होणे अपेक्षित आहे. ज्यामध्ये कोकण आणि विदर्भात २०५० पर्यंत पर्जन्यमानात सुमारे १८ ते २२ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. कोकणातील पर्जनमानात १५०-२१० एमएमपर्यंत आणि विदर्भ-पश्चिम घाट परिसरात ८२ ते २२५ एमएमपर्यंत वाढ होण्याची चिन्ह आहेत. प्राध्यापक तोडमल यांनी पुण्यातील आयआयटीएम, पुणे या संस्थेकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीचे संख्याशास्त्रीय विश्लेषण करून ही संशोधन केले आहे. आयआयटीएम, पुणे या संस्थेकडून २०१५ ते २१०० या सालादरम्याच्या प्रादेशिक हवामान अंदाज वर्तवणाऱ्या प्रतिकृती सांख्यिकी सामग्रीचे संख्याशास्त्रीय विश्लेषण त्यांनी केले आहे.