दादांनी सावरली सरकारची बाजू!

    17-Mar-2021
Total Views |
 

AJIT PAWAR_1  H





पुणे
: कुणाला मंत्रीमंडळात ठेवायचं कुणाला काढायचं हा त्या त्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. गुन्ह्यात सामील असलेल्या प्रत्येकावर, जो दोषी असेल त्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सचिन वाझे प्रकरणी प्रतिक्रिया देताना व्यक्त केले.


राज्यभरात गाजत असलेल्या सचिन वाझे प्रकरणावरुन राजकारण जोरात चालू आहे. विरोधी पक्षाची भूमिका बजावत असलेल्या भाजपने या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारवर रोज नवनवे आरोप लागत आहेत. याच प्रकरणावरून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरही भाजपकडून निशाणा साधला जात आहे. याच दरम्यान सोमवार, दि.१५ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक झाली.


शिवसेना आणि राष्ट्रवादीत अंतर्गत धूसफूस आहे का?, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याबाबत मंगळवारी माध्यमांसमोर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. मंत्रीपदी कुणाला मंत्रीमंडळात ठेवायचं कुणाला काढायचं हा त्या त्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. गुन्ह्यात सामील असलेल्या प्रत्येकावर, जो दोषी असेल त्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल असं यावेळी अजित पवार यांनी बोलून दाखवले.
 

अजित पवार म्हणाले, “सुरूवातीपासून महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्षांनी सांगितलेलं आहे, कुठल्याही गोष्टीच्या संदर्भात चौकशी झाली पाहिजे. चौकशी झाल्यानंतर जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचं महाविकासआघाडी सरकारचं काही करणार नाही हे मी राज्याचा उपमुख्यमंत्री या नात्याने स्पष्ट करू इच्छितो. ‘एनआयए’ व ’एटीएस’ या दोन्ही तपास यंत्रणा आता चौकशी करत आहेत. त्यामुळे ज्या काही घटना उघड होत आहेत, त्याप्रमाणे त्यासंदर्भातील कारवाई करण्यात येईल हे मी स्पष्टपणे सांगतो.“
 
“महाविकासआघाडीचं सरकार शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन मित्रपक्षांच्या सहकार्याने तयार झालेलं सरकार आहेे. यामध्ये महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था ही चांगलीच असली पाहिजे. कुणालाही पाठीशी घालण्याचं अजिबात काही कारण नाही. कोण कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता आहे याचा काहीही परिणाम या प्रकरणावर होणार नाही. आता काही दिवसांपूर्वी सभागृह सुरू असताना मला सभागृहात विरोधी पक्षाने एक गोष्ट लक्षात आणून दिली की, विरोधी पक्षनेत्याबद्दल सोशल मीडियावर काही चुकीच्या पद्धतीच्या बातम्या दिल्या गेल्या. त्यावेळी ताबडतोब आम्ही सभागृहात सांगितलं की सायंकाळ होण्यापूर्वी त्या संदर्भातील चौकशी केली जाईल आणि जो दोषी असेल त्याला अटक केली जाईल, त्यानंतर रात्रीपर्यंत संबंधितास अटक करण्यात आली. तशाच पद्धतीने आता या दोन्ही तपास यंत्रणा चौकशी करत आहेत, तपासामध्ये कसलाही राजकीय हस्तक्षेप होणार नाही, हीच सरकारची भूमिका आहे. जे दोषी असतील, ज्याच्यापर्यंत धागेदोरे जातील त्यांच्यावर कारवाई केली जाईल"" असे पवार म्हणाले.