रेखा जरे हत्याकांड ; मुख्य आरोपी बाळ बोठे हैदराबादेतून अटकेत

    13-Mar-2021
Total Views | 159

rekha jare_1  H
अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याला पोलिसांनी अखेर अटक केली. हैदराबादमध्ये बाळ बोठेला ताब्यात घेऊन पोलिस पथक नगरकडे रवाना झाले. त्याला मदत करणाऱ्या पाच जणांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.याप्रकरणात नाव आल्यापासूनच हा मुख्य आरोपी फरार होता. अहमदनगर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली.


रेखा जरे यांची ३० नोव्हेंबर रोजी नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव फाटा येथे दोघा मारेकर्‍यांनी गळा चिरून हत्या केली होती. रेखा जरे कुटुंबियांसह स्वतःच्या गाडीने सोमवारी संध्याकाळी पुण्याहून अहमदनगरकडे येत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत मुलगा आणि त्यांची आईही होती. कारची काच बाईकला लागल्याचं सांगत दोन दुचाकीस्वारांनी जरे मायलेकाशी वाद घातला आणि रेखा जरे यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करत त्यांची हत्या करण्यात आली.


अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात हा प्रकार घडला होता. हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने रेखा जरे यांच्यावर वार केले. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सुरुवातीला ‘रोड रेज’मधून झालेल्या वादातून रेखा जरे यांची हत्या झाल्याचे भासवण्यात आले होते. परंतु आरोपींनी सुपारी घेतल्याची कबुली दिल्याने हत्येचा कट उघड झाला. या घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या दोनच दिवसांत मारेकऱ्यांसह पाच आरोपींना जेरबंद केले. हत्येची सुपारी देणारा मुख्य सूत्रधार बोठे मात्र फरार होता. अखेर त्याला हैद्राबाद येथून अटक करण्यात पोलीस पथकाला यश आले आहे. दरम्यान न्यायालयाने बोठे याला फरार घोषित करत ९ एप्रिल पर्यंत हजर होण्याचे आदेश दिले होते.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121