ऐंशी पार पोप फ्रान्सिस, नव्वदीतले ग्रॅण्ड अयातुल्ला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

Pop Francis_1  
 
 
 
८४ वर्षांचे पोप ९० वर्षांच्या अयातुल्लांना भेटायला गेले ते उगीच नव्हे. आधुनिक वर्तमान ‘क्रूसेड’मध्ये ‘बिटवीन दी लाईन्स’ बरंच काही घडतं आहे.
 
 
 
दि. ६ मार्च रोजी कॅथलिक ख्रिश्चन जगताचे सर्वोच्च नेते पोप फ्रान्सिस हे इराकमध्ये गेले होते. नजफ या शहरात इमाम अली यांचा दर्गा असलेल्या भव्य मशिदीच्या प्रांगणात त्यांनी प्रवेश केला. जगभराच्या शिया पंथीय मुसलमानांच्या दृष्टीने या मशिदीचे महत्त्व मक्का आणि मदिनेच्या खालोखाल आहे. इमाम अली मशिदीच्या प्रांगणातच ग्रॅण्ड अयातुल्ला/अली अल् सिस्तानी यांचं अगदी साधं घर आहे. विद्वता, पद आणि वय या सर्वच बाबतीत आज अल् सिस्तानी शिया मुसलामानांमध्ये सर्वोच्च आहेत. त्यामुळे ते आपल्याला भेटायला येणाऱ्या लोकांचं आपल्या ठरावीक आसनावर बसूनच स्वागत करतात. पण, पोप फ्रान्सिस ही काही सामान्य व्यक्ती नव्हे. त्यामुळे प्रांगणातून आपल्या घराकडे चालत येणाऱ्या पोपना पाहताच अल् सिस्तानी आपल्या आसनावरून उठले आणि घराच्या दरवाजात उभे राहिले. मग दोघांनीही एकमेकांना अभिवादन करीत संवाद सुरू केला. दुभाषांच्या साहाय्याने ते एकमेकांशी ४० मिनिटे बोलत होते. दोघांच्या प्रवक्त्यांनी नंतर दिलेल्या महितीनुसार अयातुल्ला म्हणाले की, “इराकमधल्या ख्रिश्चनांचं संरक्षण केलं जात आहे, त्यांना अन्य नागरिकांइतकेच अधिकार असतील आणि त्यांनी शांततेने जीवन व्यतित करावं.” यावर पोप फ्रान्सिस त्यांना धन्यवाद देत म्हणाले की, “इराक देशाच्या इतिहासातील एक अत्यंत हिंसक अशा कालखंडात तुम्ही एका अतिशय दुर्बळ आणि छळ केल्या जाणाऱ्या समूहाच्या रक्षणासाठी आवाज उठवलात, याबद्दल मी तुमचा आभारी आहे.” आता ४० मिनिटांच्या संभाषणात एवढाच विषय झाला असेल, असं नव्हे; पण पत्रकारांना एवढंच असं दोन्ही बाजूंनी ठरवलेलं असावं.
 
 
 
११ सप्टेंबर, २००१ रोजी इस्लामी अतिरेक्यांनी ‘वर्ल्ड ट्रेंड सेंटर’चे मनोरे उद्ध्वस्त केले. त्यावर प्रतिक्रिया देताना अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉकर बुश हे अभावितपणे बोलून गेले की, जागतिक दहशतवादाच्या विरोधात अमेरिका आता ‘क्रूसेड’ सुरु करीत आहे. ‘क्रूसेड’ म्हणजे धर्मयुद्ध तेसुद्धा इस्लामच्या विरोधात धर्मयुद्ध. इ. स. १९९६ साली तत्कालीन पोप उर्बान याने युरोपातले राजे आणि सरदार यांना आवाहन केलं होतं की, “पॅलेस्टाईन भागातील आपली सगळी धर्मक्षेत्रं आणि मुसलमानांच्या ताब्यात आहेत. ती मुक्त करण्यासाठी युद्ध करा.” या आवाहनाला प्रतिसाद देऊन अनेक ख्रिश्चन राजे आणि सरदार आपापल्या सैन्यानिशी पॅलेस्टाईनमधल्या मुसलमानी सैन्याशी भिडले होते. त्या युद्धांना ‘क्रूसेड वॉर्स’ असं म्हटलं जातं. ही युद्धं पुढची २००-३०० वर्षे सतत चालू राहिली होती. त्यात दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या आणि दोघांनी मिळून ज्यू धर्मीयांच्या भरपूर कत्तली केलेल्या होत्या. ‘क्रूसेड’ या एका शब्दात एवढा मोठा रक्तबंबाळ इतिहास सामावलेला आहे.
 
 
 
हे लक्षात येताच बुश यांनी आपलं विधान मागे घेऊन फक्त ‘अमेरिकेचा जागतिक दहशतवादविरोधी लढा’ एवढंच नाव आपल्या उपक्रमाला दिलं. मग ७ ऑक्टोबर, २००१ या दिवशी प्रत्यक्ष युद्धाला तोंड लागलं. अमेरिकन आणि ब्रिटिश संयुक्त सेना अफगाणिस्तानात घुसल्या आणि त्यांची तालिबान सरकारची गठडी वळली. नंतर २१ मार्च, २००३ या दिवशी अमेरिकन सैन्य इराकवर आक्रमण करून गेलं. इराकी हुकूमशहा सद्दाम हुसैन याने अत्यंत संहारक अशी जैव रासायनिक शस्त्रास्त्रं बनवलेली आहेत. या युद्धात तो ती वापरणार आणि त्यामुळे जबरदस्त मनुष्यहानी होणार, असा अंदाज होता. पण, तसं काहीच घडलं नाही. अमेरिकन सेनेच्या झपाट्यासमोर इराकी सैन्य पाचोळ्यासारखं उडून गेलं. राजधानी बगदाद पडली. सद्दाम हुसैन कैद झाला. त्याच्या ‘बाथ’ पक्षाचं सरकार कोसळलं. बुश यांनी आपला ‘क्रूसेड’ हा शब्द मागे घेतला असला तरी प्रत्यक्षात हे ‘क्रूसेड’ धर्मयुद्ध आहे, हे जग समजून चुकलेलंच होतं. त्यामुळे अफगाणिस्तान आणि इराकचा झटपट निकाल लागल्यावर जग थोडंस चकितच झालं. विज्ञान आणि तंत्रज्ञानात पुढारलेल्या ख्रिश्चन अमेरिका-युरोपसमोर पेट्रोलच्या पैशाने गडगंज झालेल्या इस्लामने एवढ्या झटपट शरणागती पत्करली? पण, लवकरच जगाला कळून चुकलं की, इस्लामने शरणागती स्वीकारलेली नाही. ‘तालिबान’ आणि ‘अल कायदा’ मागे पडले. खुद्द ओसामा बिन लादेन या महाखलनायकाला अमेरिकेनेे अचूक गाठला आणि उडवला. आता ‘इसिस’ही नवी इस्लामी अतिरेकी संघटना निर्माण झाली आहे. ‘रक्तबिंदू’ नामक राक्षसाच्या रक्ताच्या एका थेंबातून म्हणे अनेक राक्षस निर्माण व्हायचे आणि माणसांना खात सुटायचे. तशी आता ‘इसिस’ अतिरेकी संघटना माणसं मारते आहे. ‘क्रूसेड’ युद्ध सुरूच आहे. यात अरबांच्या ‘सुन्नी’ पंथातला ‘वहाबी’ नामक उपपंथ अतिशय कडवेपणाने लढतो आहे. वहाबी सुन्नींना संपूर्ण जग इस्लाममय करून सोडायचं आहेच, शिवाय ते त्यांच्याच वर्चस्वाखाली राहिलं पाहिजे, असा त्यांचा हट्ट आहे.
 
 
इकडे ख्रिश्चनांनादेखील तेच घडवून आणायचं आहे. तुम्हाला जर आठवत असेल, तर १९९९ साली तत्कालीन पोप जॉन पॉल दुसरे हे भारतात आले होते. पुढच्या वर्षी म्हणजे २००० साली जग दुसऱ्या सहस्रकातून तिसऱ्या सहस्रकात किंवा विसाव्या शतकातून एकविसाव्या शतकात प्रवेश करणार, याची बरीच चर्चा जगभर सर्वत्र चालू होती. अशा वातावरणात दिल्लीतल्या नेहरु स्टेडियममध्ये झालेल्या सभेत पोपनी जाहीरपणे उद्गार काढले होते की, “पहिल्या सहस्रकाने युरोप खंडात (ख्रिश्चानिटीचा) ‘क्रॉस’ ठामपणे रोवला गेलेला पाहिला. दुसऱ्या सहस्रकाने तीच गोष्ट अमेरिका आणि आफ्रिका खंडाबाबत अनुभवली. आता तिसऱ्या सहस्रकात या महत्त्वाच्या आणि विशाल खंडात (म्हणजे आशियात) विश्वासाचे तसेच भरघोस पीक निघालेले (म्हणजे ख्रिश्चानिटीवर विश्वास असलेल्यांचे) अनुभवास येतो.” तात्पर्य, ‘तिसऱ्या सहस्रकात आशिया खंड बाटवून टाका रे, पाद्य्रांनो’ हा चर्चचा अगदी उघड उघड अजेंडा आहे. आता यातला महत्त्वाचा अडथळा म्हणजे, जगात साधारण ५१ देश आहेत की जे स्वत:ला इस्लामी देश म्हणवतात. त्यांपैकी बहुसंख्य हे आशिया खंडातच आहेत. या इस्लामी देशांमध्ये पुन्हा शिया-सुन्नी भेद आहेत. त्यात सुन्नी बहुसंख्य आहेत आणि ते कमालीचे कडवे आहेत. सुन्नीमध्ये पुन्हा ‘वहाबी’ हा जो उपपंथ आहे, तो तर कडवेेपणाचा अर्क आहे. ओसाबा बिन लादेन वहाबी होता. सौदी अरेबिया देश जो इस्लामचं जन्मस्थान आहे, त्याचं सत्ताधारी राजघराणं वहाबी आहे.
 
 
 
इटली हा एक स्वतंत्र आणि सार्वभौम देश आहे. रोम शहर ही त्याची राजधानी आहे. या शहरात ४९ हेक्टर एवढ्या क्षेत्रफळाच्या परिसरात ‘व्हॅटिकन’ हे जगातलं सर्वोच्च कॅथलिक धर्मपीठ आहे. त्याची अधिकृत लोकसंख्या आहे फक्त ८२५. परंतु, अधिकृतपणे ‘व्हॅटिकन’ हे एक वेगळं स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र आहे. पोप हा तेथील धर्मगुरुही आहे आणि राजाही आहे. वर्तमान पोप फ्रान्सिस हे मूळचे अर्जेंटिना देशाचे. २०१३ साली ते पोप पदावर आले. म्हणजे नवं ‘क्रूसेड’ किंवा अधिकृत भाषेत ‘दहशतवादविरोधी युद्ध’ सुरू होऊन चांगली १२ वर्षे उलटलेली होती. पोप फ्रान्सिस यांनी वेळ गमावला नाही. ‘शांतता’ आणि ‘सद्भाव’ या सुबक नावाखाली त्यांच्या हालचाली सुरू झाल्या २०१४ साली. ते प्रथम अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि क्यूबाचे अध्यक्ष राऊल कॅस्ट्रो यांना भेटले. क्यूबा हे एकेकाळचे कम्युनिस्ट राष्ट्र, पण त्याचे नागरिक पक्के कॅथलिक आहेत. पोपनी अमेरिका आणि क्यूबा यांना एकत्र आणलं, मग ते इस्रायलच्या भेटीवर गेले. तिथे त्यांनी तब्बल १३ जाहीर भाषणे दिली. मग २०१५ मध्ये त्यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची भेट घेतली. २०१६ साली ते इस्टर्न ऑर्थोडॉक्सचर्च यांच्यातले मतभेद संपवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. २०१९ मध्ये तर त्यांनी कमालच केली. त्यांनी संयुक्त अरब अमिरातीमधल्या अबूधाबी या राज्याला भेट दिली अन् अबूधाबीचे राजे किंवा अमीर मोहमद बिन झायेद अल् नहयान यांनी जातीने त्यांचे स्वागत केले. संयुक्त अरब अमिराती अरब आहेत, सुन्नी आहेत, पण वहाबी नाहीत. आता लक्षात आलं का की, पोप महाशयांची सुप्त पातळीवरची ‘क्रूसेड’ कशी पद्धतशीर चालू आहे ते?
 
 
ग्रॅण्ड अयातुल्ला अली अल् सिस्तानी हे मूळ इराणचे. इराण हा वंशाने अरब नव्हे आणि पंथानेही सुन्नी नव्हे, तर शिया प्रेषित मोहम्मदांचा जावई अली याच्यापासून शिया पंथीय लोक आपली परंपरा मानतात. या इमान अली यांचेच दोघे मुलगे हसन आणि हुसैन हे इस्लामी यादवी युद्धात ठार झाले होते. खुद्द इमान अली यांचाही प्रतिस्पर्धी गटाने खून केला. त्यांची मजार इराकमधल्या नजफ शहरात आहे. या माजारीवरच आज ‘हरम-अल्-इमाम-अली’ ही भव्य मशीद उभी आहे. जगभरचे शिया पंथीय मुसलमान मक्केतील काबा आणि मदिनेतील प्रेषित महंमदांची मजार यांच्या खालोखाल इमाम अलींच्या या मशिदाला पवित्र मानतात. त्यामुळे शिया पंथाचे आज सर्वोच्च धर्मगुरू असणारे ग्रॅण्ड अयातुल्ला अली अल् सिस्तानी हे मूळ इराणी असूनही इराकमधल्या इमाम अली मशिदीच्या परिसरातच राहतात. सद्दाम हुसैन हा सुन्नी होता. त्याने इराकमधल्या शियांचा भरपूर छळ केला. इमाम अली मशिदीच्या परिसरात सद्दामच्या राजवटीत आणि नंतरही अनेकदा घातपाती हल्ले झालेत. अनेक माणसं ठार झाली आहेत. इस्लाम मानणाऱ्या शियांची जर ही स्थिती तर बाकी अल्पसंख्याकांची काय कथा? २०१९ साली इराकमधल्या एका बिशपने सांगितलं की, इथे आता फक्त तीन लाख कॅथलिक उरलेत, म्हणजे इथला ख्रिश्चन संप्रदाय आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. अयातुल्ला सिस्तानींनी सतत या विरुद्ध आवाज उठवलेला आहे. सद्दामची सुन्नी राजवट संपवण्यासाठी आणि नवी अमेरिका आधारित शिया राजवट आणण्यात अयातुल्ला सिस्तानींची पडद्याआड आणि उघड खूपच महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ८४ वर्षांचे पोप ९० वर्षांच्या अयातुल्लांना भेटायला गेले ते उगीच नव्हे. आधुनिक वर्तमान ‘क्रूसेड’मध्ये ‘बिटवीन दी लाईन्स’ बरंच काही घडतं आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@