कर्मचार्‍यांचे मनोबल उंचावणारा उद्योजक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Mar-2021   
Total Views |


deshpande_1  H


नेतृत्व खमके असेल तर कुठल्याही संस्था-संघटनेचा उत्कर्ष हा निश्चितच. पण, या नेतृत्वाची खरी कसोटी लागते, ती संकटकाळात आणि त्यातही जर ते पूर्णपणे अपरिचित असलेले कोरोना महामारीसारखे भयावह संकट असेल, तर नेतृत्वाचा खरा कस लागतो. ‘आकाश इंडस्ट्रीज’चे संचालक मिलिंद सुरेश देशपांडे यांच्यासाठीही ‘कोविड’ महामारीचा काळ हा सर्वार्थाने परीक्षा पाहणाराच होता. परंतु, अपार इच्छाशक्ती आणि कर्मचार्‍यांची साथ यामुळे देशपांडे यांनी या संकटावरही नेटाने मात केली. अशा या कर्मचार्‍यांचे मनोबल वाढविणार्‍या उद्योजकाची ही गौरवगाथा...


कोरोना काळात कोरोनाचे नेमके स्वरूप काय आहे, याबाबत अनेकांना फारशी माहिती नव्हती. तसेच, या आजारावर कोणताही रामबाण असा औषधोपचारदेखील त्यावेळी उपलब्ध नव्हता. त्यामुळे कोरोनाबाबत समज आणि गैरसमज हे सर्वत्र फैलावत असल्याचे आपणांस कायमच दिसून आले. जगभरात जिथे अनेक रथी-महारथी यांची ही अवस्था होती, जिथे जगातील अनेक सरकारेदेखील कोरोनाचा नेमका अंदाज घेत होती. अशावेळी कंपनीत कार्य करणारा कामगार वर्गास या आजाराबाबत संपूर्ण शास्त्रीय माहिती असण्याचा काही प्रश्नच नव्हता. अशीच स्थिती नाशिक येथील सातपूर औद्योगिक वसाहतीतील आकाश इंडस्ट्रीमध्ये कार्यरत कामगार वर्गाची होती.कामगार वर्गाची ही मानसिकता ओळखून उद्योग-व्यवसाय सुरू करण्यापूर्वी या कर्मचारी वर्गाचे कोरोनाबाबत समुपदेशन होणे जास्त महत्त्वाचे आहे, हे कंपनीचे संचालक मिलिंद देशपांडे यांनी जाणले. १९९५ पासून देशपांडे या व्यवसायात कार्यरत आहेत. त्यामुळे उद्योग-व्यवसाय आणि कर्मचारी व्यवस्थापनाबाबत ते एक उद्योजक म्हणून नक्कीच जाणकार आहेत. मात्र, त्याहीपेक्षा एक माणूस म्हणून मानवी मूल्यांची जोपासना करणारे सद्गृहस्थ अशीच त्यांची ओळख आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

कोणतेही संकट आले तरी न डगमगता आपले कार्य कायम सुरू ठेवावे. व्यवसाय सुरू असताना अनेक अडचणी या येणारच! त्या अडचणी समजून घेऊन त्यात संधीचा धागा पकडून पुढे जावे. पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही, हे उद्योजकांनी कायम लक्षात ठेवावे.


कोरोनाचे वाढणारे भीषण स्वरूप आणि उपलब्ध असणारी कमी माहिती, यामुळे आपल्या कारखान्यातील कर्मचारी वर्गास त्याबाबत माहिती देण्याचे एक मोठे आव्हान या काळात देशपांडे यांच्या समोर उभे ठाकले होते. त्याचप्रमाणे देशपांडे यांचा व्यवसाय हा इतर काही कंपन्यांवर अवलंबून असल्याने व त्याच कंपन्या याकाळात बंद असल्याने त्यांना आर्थिक अडचण भेडसावत होती. एकूणच मागणीच्या अभावामुळे उत्पादनात आलेली घट हेदेखील एक मोठे आव्हान देशपांडे यांच्यासमोर याकाळात उभे ठाकले होते.या आव्हानांवर मात करण्यासाठी देशपांडे यांनी योग्य त्या निर्देशांचे पालन करत, कर्मचारी वर्गाची एक बैठक बोलावली. त्यांना कोरोना म्हणजे नेमके काय, त्याचे स्वरूप काय, लक्षणे कोणती, त्यापासून बचाव कसा करावा आदींबाबत माहिती देत कर्मचारी वर्गाचे समुपदेशन केले. तसेच, कारखान्यात ज्या ठिकाणी सतत हातांचा स्पर्श होतो, त्या ठिकाणी वावरताना कर्मचारी वर्गाने नेमकी कशी आणि कोणती काळजी घ्यावी, याबाबतदेखील देशपांडे यांनी यावेळी कर्मचारी वर्गास माहिती दिली.आर्थिक बाजू सक्षम करण्यासाठी विविध कंपन्यांना ‘आकाश इंडस्ट्रीज’मार्फत त्यांची शिल्लक देयके अदा करण्याबाबत विनंती करण्यात आली. त्याचप्रमाणे शासनाच्या विविध योजनांद्वारेदेखीलदेशपांडे यांना कर्ज मंजूर होण्यास मदत झाली. त्यामुळे आर्थिक गणिते सुधारण्यास देशपांडे यांना मदत झाली.



deshpande_1  H
कोरोना काळात सर्वत्रच उद्योग-व्यवसायाची गती मंदावली होती. अनेक ठिकाणी उद्योग-व्यवसाय बंद पडले होते. त्यामुळे आर्थिक अडचण व उत्पादनात घट, असे चित्र अनेक ठिकाणी पाहावयास मिळत होते. अशा वेळी ‘आकाश इंडस्ट्रीज’चे बाजारात असलेले स्पर्धक त्यांच्या विविध कंपन्यांना वितरण करण्यात कमी पडत होते. त्यावेळी त्या कंपन्यांनी ‘आकाश इंडस्ट्रीज’कडे आपल्या मालाच्या पूर्ततेसाठी मोर्चा वळविला. ‘आकाश इंडस्ट्रीज’ त्यांच्या या कसोटीवर उतरली. त्यामुळे आता देशपांडे यांच्या कंपनीला त्यांच्या स्पर्धक कंपन्यांच्या ऑर्डर मिळण्यासदेखील सुरुवात झाली. आव्हाने असतानादेखील देशपांडे यांनी मैदान सोडले नाही. स्वाभाविकत: त्याची परिणती उभी असलेली आव्हाने दूर होण्यास मदत झाली. त्यामुळे ‘आकाश इंडस्ट्रीज’च्या आर्थिक स्थितीत हळूहळू का होईना, सुधारणा होण्यास मदत झाली. कोणत्याही कारखान्याचा कणा हा तेथील कर्मचारी वर्ग असतो. त्यांच्या सहकार्याशिवाय कारखान्याचा विकास आणि सुरळीत दैनंदिन कामकाज हे केवळ अशक्य आहे, हे देशपांडे आवर्जून नमूद करतात. संकट काळात कामगार वर्गाची उत्तम साथ लाभल्याचे देशपांडे सांगतात. कारखान्यात कामाची आवश्यकता लक्षात घेऊन कोरोना संसर्ग होऊ नये, यासाठी त्या आवश्यकतेनुसार त्यांनी कामगार वर्गाला हजर राहण्यास सांगितले. तसेच, ज्या कर्मचार्‍यांना कोरोनाची लक्षणे जाणवत आहेत, त्यांनी तत्काळ कंपनीस माहिती द्यावी, असे आवाहन देशपांडे यांनी सर्व कर्मचारी वर्गास केले आणि त्याला कर्मचारी वर्गाने देखील तत्काळ मान्यता दिली. विशेष म्हणजे, या काळात आपल्या कर्मचारी व कामगार वर्गाची कोणतीही वेतन कपात देशपांडे यांनी केली नाही. तसेच, शासनाचे सर्व कर, कर्जाचे हप्ते यांची पूर्तता वेळेत पूर्ण केली. संकट हे जागतिक होते. त्यात आपले राष्ट्रदेखील मागे नव्हते. त्यामुळे राष्ट्रालादेखील आर्थिक बाजू सक्षम राखणे आवश्यक होते. अशावेळी राष्ट्रीय भावनेतून करभरणा वेळेत करणे हे आपले कर्तव्य आहे, याच भावनेतून देशपांडे यांनी आपले कर्तव्य बजावले.
या काळात केवळ आपल्या कर्मचारी वर्गालाच कोरोनाची माहिती देणे, हेच कार्य देशपांडे यांनी न करता, कोरोनाबाबत जनजागृतीसाठी विविध बॅनर तयार करत समाजाला सजग करण्याचे कार्य केले. तसेच, सामाजिक जाणिवेतून देशपांडे यांनी या काळात कोरोनावर मात करण्यासाठी त्या वेळी आयुष मंत्रालयाच्यावतीने प्रमाणित करण्यात आलेल्या ‘आर्सेनिक-30’गोळ्यांचेदेखील वाटप केले. कोरोना संकट हे मोठे होते. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने याकाळात घरात राहणे हेच संयुक्तिक आहे, असे मत देशपांडे यांच्या कुटुंबीयांचे होते. मात्र, मिलिंद देशपांडे यांनी आपल्या कुटुंबीयांना सामाजिक दायित्वाबाबत समजावून सांगितले. त्यामुळे देशपांडे यांना पुढील काळात आपली कंपनी व समाजात आपले कार्य पार पाडणे शक्य झाले. कोरोना काळात ‘लॉकडाऊन’ असल्याने प्रदूषणाच्या समस्या फारच कमी झाल्या होत्या; अन्यथा आपण नेहमीच खूप प्रदूषण निर्माण करतो. त्यामुळे कोरोनाने आपण नेमके प्रदूषण कसे कमी करू शकतो, याबाबत जगाला धडा दिल्याचे ते सांगतात. तेव्हा आगामी काळात पर्यावरण सुधारण्याचा मनोदयदेखील देशपांडे व्यक्त करतात. कामगार, कर्मचारी, समाज आणि कुटुंब अशा सर्वांनाच समुपदेशन आणि चर्चा या माध्यमातून कार्य करणारे देशपांडे यांचे कार्य नक्कीच अतुलनीय आहे.
@@AUTHORINFO_V1@@