सौ चूहे खाकर बिल्ली चली हज को!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Mar-2021   
Total Views |

Mamata_1  H x W
 
 
 
ममतादीदी म्हणतात त्याप्रमाणे त्या ब्राह्मण आहेत, हिंदू आहेत, मग मुसलमानांच्या दाढ्या का कुरवाळता? दाढ्या कुरवाळताना तुमचे हिंदूपण कुठे जाते? राज्य करताना तुम्ही मुस्लीम समुदायाला झुकते माप का देता? त्यांचा नागरिक म्हणून का विचार करीत नाही? मुसलमान म्हणूनच का विचार करता?
 
 
 
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नंदिग्राम येथील निवडणूक प्रचारसभेत भाजपला उद्देशून म्हणाल्या की, “माझ्याबरोबर हिंदुत्वाचा पत्ता खेळू नका, मी, हिंदू ब्राह्मण कन्या आहे. घरातून बाहेर पाऊल टाकण्यापूर्वी मी रोज चंडीपाठ म्हणते.” आपल्याला चंडीपाठ, पाठ आहे, हे दाखविण्यासाठी त्यांनी सभेत चंडीपाठ म्हणून दाखविले. त्या पुढे म्हणाल्या, “काही लोक हिंदू-मुस्लीम लोकसंख्येचा अनुपात ७० टक्के-३० टक्के असा सांगतात. असे बोलून ते नंदिग्रामच्या जनतेचा अपमान करीत आहेत. मी, हिंदू परिवाराची कन्या आहे. समाजाला धार्मिक आधारावर विभाजित करण्यावर माझा विश्वास नाही. मी त्यांना हिंदू श्लोकांच्या पाठांतराच्या स्पर्धेचे आव्हान देते.”
 
 
ममतादीदींचे ‘मी, हिंदू ब्राह्मण कन्या आहे’ हे वाक्य वाचून खूपच गंमत वाटली. वर्ष-दोन वर्षांपूर्वी कोलकात्याचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. ममतादीदी यांची गाडी जात असताना काही युवकांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. ममतादीदी संतापल्या, त्या कारमधून उतरल्या, “कुणी घोषणा दिल्या?” अशा चढ्या आवाजात त्यांनी प्रश्न केला. असे त्यांना दोनदा करावे लागले. त्यानंतर सात वर्षांच्या रिशु बाबू यांचे ‘ममता दीदी, जय श्रीराम’ हेे गाणे अतिशय व्हायरल झाले. त्या गाण्याचे बोल असे आहेत, ‘जिसने लिया राम का नाम, उसके बन गये बिगडे काम, ममतादीदी जय श्रीराम’ दुसरे चरण असे आहे, ‘तुम भी ले लो राम का नाम, हो जायेंगे चारो धाम, वीर हनुमंतने राम को पूजा, बन गये जग में वो महान, ममतादीदी जय श्रीराम’ हे गाणेदेखील बंगालमध्ये फार लोकप्रिय झाले. पण, ममतादीदी काही ‘जय श्रीराम’ बोलायला तयार नाहीत.
 
एकदम मंगळवार, दि. ९ मार्च विजया एकादशीच्या दिवशी ममतादीदींना कशी उपरती झाली? विजया एकादशीचा असाही परिणाम होऊ शकतो, हे आम्हाला तरी नवीनच! ममतादीदींची सगळी हयात राजकारणात गेली. राजकारण हा त्यांचा श्वास आणि उच्छ्वास. या ३०-४० वर्षांच्या राजकीय प्रवासात ‘मी, हिंदू ब्राह्मण कन्या आहे’ असे जाहीरपणे त्या कधीच बोलल्या नव्हत्या. आज एकाकी त्यांना ‘मी, हिंदू आहे, ब्राह्मण आहे आणि कन्या आहे’ असा त्रिवेणी साक्षात्कार कसा झाला?
 
 
या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे, बंगालमध्ये निवडणुका आहेत. भाजपने बंगाल जिंकायचेच, या निर्धाराने पाऊल टाकलेले आहे. ममतांचे अनेक आमदार, ममतादीदींना सोडून चालले आहेत, ते भाजपत दाखल होत आहेत. ममतादीदींच्या तृणमूल काँग्रेसमध्ये पळापळ चालू आहे. पायाखालची वाळू सरकू लागली आहे. ममताविरोधी प्रचार करताना ममतांचा राज्यकारभार हिंदूविरोधी कसा आहे, हा मुद्दा भाजपने जबरदस्त लावून धरलेला आहे. त्यांचा हिंदूविरोध जाहीरपणे लोकांना दिसावा, त्यांना चिडविण्यासाठी आणि संताप येण्यासाठी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्या, तो प्रसंग वर दिला आहे आणि नंतर त्या प्रसंगावर झालेले गाणे दिलेले आहे. ते नेटवर उपलब्ध आहे, वाचकांनी ते जरूर ऐकले पाहिजे.
 
 
ममता बॅनर्जी बंगालच्या मुख्यमंत्री झाल्या. बंगालमध्ये असलेल्या मुस्लीम संख्येमध्ये लक्षावधी मुस्लीम घुसखोरांची भर पडली आहे. अनेक जिल्ह्यांच्या लोकसंख्येचे संतुलन बिघडलेले आहे. निवडणुका जिंकण्यासाठी ममतादीदींनी उघडा-नागडा मुस्लीम तुष्टीकरणाचा मार्ग धरला. तो इतका भयानक आहे की, त्यामुळे बंगालमधील हिंदूंचे जीवन आणखी काही वर्षांनी जबरदस्त संकटात आल्याशिवाय राहणार नाही. ममतादीदींच्या मुस्लीम तुष्टीकरणाच्या काही कृती अशा आहेत.
 
१) बंगालमध्ये नवरात्रीतील दुर्गापूजा उत्सव हा जनोत्सव असतो. विजयादशमीच्या दिवशी चौकाचौकांतील दुर्गामूर्तींचे विसर्जन होते. रात्री 10च्या आत हे विसर्जन झाले पाहिजे, असा ममतादीदींनी आदेश काढला. दुसऱ्या दिवशी विसर्जनावर बंदी घातली. कारण, दुसऱ्या दिवशी मोहरम होता. दुर्गापूजा हिंदूंनी आपल्या देशात करायची नाही तर ती काय पाकिस्तानात जाऊन करायची?
 
२) बशीरहाट या ठिकाणी सांप्रदयिक दंगा झाला. यात हिंदूंची घरे जाळण्यात आली, त्यांची दुकाने लुटण्यात आली आणि पोलिसांच्या व्हॅनदेखील जाळण्यात आल्या. दंगेखोरांना ममतादीदींनी अटकही केली नाही. दंगलीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी भाजपने त्रिसदस्यीय समिती नेमली. ममतांनी या समितीला प्रवेश नाकारला.
 
३) डुलारगड येथे अतिरेक्यांनी हिंदूंवर हल्ले केले. ममतादीदींनी त्याकडे दुर्लक्ष केले. मौलाना बरकती याने, मोदींच्या चेहऱ्याला जो काळे फासेल, त्याला मोठे इनाम जाहीर केले. या मौलाना बरकतीच्या आगलावू वक्तव्यावर ममतादीदींनी कोणतीही कृती केली नाही.
 
४) सोनू निगम याच्याविरोधात मुस्लीम धर्मगुरूंनी फतवा काढला. तेव्हा ममतादीदी मिठाची गुळणी घेऊन बसल्या.
 
५) बलुचिस्तान येथे होणाऱ्या अत्याचारासंबंधात एक सेमिनार ठेवण्यात आला होता, ममतांनी तो रद्द करायला लावला.
 
६) मुस्लीम इमामांना दरमहा २,५००चे मानधन देण्याचा निर्णय ममतांनी केला. हिंदू पुजाऱ्यांना फक्त अक्षता (म्हणजे काही दिले नाही) दिल्या.
 
७) तारकेश्वर बोर्डाचे अध्यक्ष म्हणून फिरहाद हकीम यांची नेमणूक केली. तारकेश्वर हे २८८ वर्षांचे जुने देवस्थान आहे. हिंदू देवस्थानावर मुसलमान अध्यक्ष, वा रे ममतांचा सेक्युलॅरिझम!
 
८) नुरूर बरकती या मुस्लीम मौलवीला लाल दिव्याची गाडी देण्यात आली. या बरकतीने नरेंद्र मोदी यांच्या विरोधात फतवा काढलेला आहे. मोदी यांचे जो डोके कापील त्याला २५ लाखांचे इनाम जाहीर केले आहे. मशिदीच्या बाहेर जे ‘जय श्रीराम’च्या घोषणा देतात, ते हिजडे आहेत. जो मुसलमान संघ किंवा भाजपशी संबंध ठेवील, त्याला समाज बहिष्कृत करण्यात येईल आणि ठोकून काढण्यात येईल.
 
९) रोहिंग्या मुसलमानांचा पक्ष ममतादीदी उघडपणे घेतात. “ते दहशतवादी नाहीत. भारतात त्यांचे स्वागत केले पाहिजे,” असे त्या म्हणतात.
 
ममतादीदींच्या मुस्लीमधार्जिण्या आणि हिंदूविरोधी राजकारणावर भाजपने कडाडून हल्ला चढविणे अगदी स्वाभाविक आहे. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणतात, “५ ऑगस्टला अयोध्येत मंदिराचे भूमिपूजन झाले. सर्व देश भूमिपूजनाचा आनंद साजरा करीत असताना ममता बॅनर्जींनी बंगालमध्ये ‘लॉकडाऊन’ लावले. ३१ जुलैला बकरी ईद होती. बकरी ईदला ‘लॉकडाऊन’ उठविले.” अशा आहेत, ममता!
 
 
अशा ममता म्हणजे ‘सौ चुहे खाकर बिल्ली चली हज’ असेच म्हणायला पाहिजे. त्यांना भाजपने जात विचारली नाही, तुम्ही हिंदू आहात की मुसलमान आहात, हेही विचारले नाही. तुम्ही पूजापाठ करतात का, हेही विचारले नाही. न विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे ममतादीदींनी दिली. उद्धव ठाकरे यांच्याकडून त्या ही कला शिकल्या असाव्यात. ममतादीदी म्हणतात त्याप्रमाणे त्या ब्राह्मण आहेत, हिंदू आहेत, मग मुसलमानांच्या दाढ्या का कुरवाळता? दाढ्या कुरवाळताना तुमचे हिंदूपण कुठे जाते? राज्य करताना तुम्ही मुस्लीम समुदायाला झुकते माप का देता? त्यांचा नागरिक म्हणून का विचार करीत नाही? मुसलमान म्हणूनच का विचार करता? राज्यकर्त्यांनी प्रजेला समान न्याय द्यावा लागतो, कायद्यापुढे सर्व समान, हे आपल्या राज्यघटनेचे तत्त्व आहे, ते तुम्ही पायदळी का तुडविता? या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी, ‘मी, हिंदू आहे, ब्राह्मण आहे, कन्या आहे,’ हे कशाला सांगता? बॅनर्जी ब्राह्मण असतात हे सर्व जगाला माहीत आहे आणि तुम्ही कन्या आहात हे जग रोज पाहतो. तुमच्या पोशाखावरून तुम्ही हिंदू आहात, हेही लगेचच लक्षात येते. राजकारणी माणसे फार चतूर असतात. सोयीचे असेल तेव्हा हिंदू पत्ता वापरायचा आणि इतरवेळी मुस्लीम पत्ता.
 
 
ममतादीदींच्या या वक्तव्याने आठवण झाली ती, मिर्झा राजा जयसिंगाची. औरंगजेबाचा सर्वात ताकदवान हिंदू सेनापती. एकलिंगाची रोज पूजा करणारा. पण, औरंगजेबाने मंदिरे फोडली तेव्हा मिठाची गुळणी घेऊन बसणारा, शिवाजी महाराजांना संपविण्यासाठी औरंगजेबाचा सेनापती बनून दक्षिणेत आला. तोही हिंदूच होता, कट्टर धार्मिक हिंदू, सेवा मात्र औरंगजेबाची. ममतादीदी या मिर्झाराजाच्या बहीण आहेत. औरंगजेबाची सेवा लोकशाही मार्गाने करायला निघालेल्या आहेत. हातात कुराण घेऊन मुस्लीम समुदायासमोर त्या भाषण करतील, नमाज पडतील आणि वर म्हणतील की, मी, ब्राह्मण कन्या आहे, रोज चंडीपाठ करते. त्या चंडीने बहुधा शस्त्र उगारले असावे आणि त्याचीच भीती वाटून ममता म्हणत्या झाल्या की, “मी, हिंदू आहे, ब्राह्मण आहे.”
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@