नारळीकरांचे वैचारिक व विज्ञानवादी विचार मराठी साहित्य विचाराला नवा आयाम देणारे ठरेल - छगन भुजबळ
नाशिक: '९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठी साहित्य विचाराला अतिशय नवा आयाम देणारे ठरेल' असा विश्वास राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांच्या पुणे येथील निवासस्थानी जाऊन त्यांना संमेलनाचे निमंत्रण दिले. यावेळी डॉ. नारळीकर यांच्या पत्नी सौ. मंगलाताई नारळीकर,लोकहितवादी मंडळाचे जयप्रकाश जातेगावकर, संजय करंजकर, मुकुंद कुलकर्णी, दिलीप साळवेकर आदी उपस्थित होते.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, "जागतिक स्तरावर पोहोचलेल्या मराठी साहित्याच्या एकुण प्रवासात विसाव्या शतकाच्या प्रारंभापासून महाराष्ट्राचीच नव्हे, तर जगातील तमाम मराठी भाषिकांच्या जीवनशैलीचा महत्वाचा भाग बनलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचा खळाळता प्रवाह आजतागायत अखंड सुरू आहे.
"डॉ. जयंत नारळीकर यांच्या सारखा वैचारिक आणि विज्ञानवादी साहित्यिक या संमेलनाला अध्यक्ष म्हणून लाभल्याने हे साहित्य संमेलन मराठी साहित्य विचाराला अतिशय नवा आयाम देणारे ठरेल. तसेच आम्ही सर्व नाशिककर आपल्या स्वागतासाठी अतिशय उत्सुक आहोत. आपल्या सुविद्य पत्नी सौ. मंगलाताई यांच्यासह आपणास संमेलनासाठी आमंत्रित करीत आहोत. आणि नाशिकमध्ये आम्ही आपल्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.