मुंबई : बेकायदा मशिदीच्या भोंग्याविरोधात आवाज उठवला म्हणून २०-२५ जणांनी एका तरुणाला घरात घुसून मारण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना मालवणीतील छेडा कॉम्पेक्समध्ये घडली. राज्यातील महाविकास आघाडीची अशी प्रकरणे हाताळण्याची क्षमता पाहता भाजपने हा मुद्दा केंद्र सरकारकडे नेला आहे.
‘मालवणी येथे ‘मॉब लिंचिंग’चा झालेला प्रयत्न हा अत्यंत निंदनीय आहे. आपल्याच घरी हिंदू असुरक्षित आहेत. ही परिस्थिती कशी उद्भवली? याप्रकरणाची चौकशी करा, अशी विनंती मी केंद्र सरकारला केली आहे,’ अशी माहिती मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी दैनिक ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना दिली आहे.
मालाड पश्चिमेच्या मालवणी येथील कट्टरपंथीय जिहादींचा उन्माद दिवसेंदिवस वाढतच असल्याचे चित्र आहे. मालवणीतील ‘छेडा कॉम्प्लेक्स’मधील रहिवासी रमेश पटेल यांना जवळपास २०-२५ जणांच्या धर्मांधांनी घरात घुसून मारण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार नुकताच घडला. रमेश यांचे मित्र प्रवीण जैन यांनी अवैध मशिदीविरोधात तक्रार दाखल केली होती. प्रवीण सध्या जीवाच्या भीतीने मुंबईबाहेर होते.
कट्टरपंथीय जिहाद्यांकडून जमावाने मारहाण होत असल्याच्या या घटनेबद्दल सर्वबाजूंनी तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. मालवणी येथे हिंदू दलितांना घर सोडून जाण्यासाठी सुरू झालेल्या दबावतंत्राचे प्रकरण ताजे असतानाच आता हा नवा प्रकार समोर आला आहे. मंगळवार, दि. २३ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास मालवणीतील ‘छेडा कॉम्प्लेक्स’मध्ये कट्टरपंथी धर्मांधांच्या जमावाने रमेश पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांना दमदाटी करून घरात घुसण्याचा प्रयत्न केला. रमेश हे प्रवीण जैन यांचे मित्र आहेत. प्रवीण जैन यांनी ‘छेडा कॉम्प्लेक्स‘ परिसरातील एका अवैध मशिदीविरोधात तक्रार दिली होती.
महापालिकेने याविषयी अलीकडेच मशिदीला नोटीस दिल्याचे समजते. त्यामुळे कट्टरपंथीय धर्मांधांच्या रोषाला प्रवीण आणि रमेश यांच्या कुटुंबीयांना सामोरे जावे लागत आहे. रमेश यांच्या कुटुंबीयांना मंगळवारी संध्याकाळी आधी कट्टरपंथीयांकडून दमदाटी करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर रात्री ११ वाजण्याच्या सुमारास २० ते २५ जिहाद्यांनी रमेश यांच्या घराबाहेर जमाव केला. रमेश यांना बाहेर पाठवा आम्हाला त्याच्याशी बोलायचे आहे, असे जमावातील लोक म्हणत होते. प्रसंगावधान राखून रमेश याच्या कुटुंबीयांनी जमावाला घरात घुसू दिले नाही.
तसेच सोसायटीतील काही रहिवासी आणि रमेशच्या कुटुंबीयांनी पोलिसांना १०० या क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस घटनास्थळी दाखल झाले नाहीत, असाही आरोप करण्यात येत आहे.या प्रकारानंतर रमेश आणि प्रवीण जैन पोलीस ठाण्यात गेले. बुधवार, दि. २४ फेब्रुवारी रोजी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. परंतु गुन्हादाखल झालेला नाही.