पुदुच्चेरीतून काँग्रेस सरकार पडल्यानंतर दक्षिण भारतातून काँग्रेसचा पुरता सफाया झाल्याचे दिसते. एकेकाळी दक्षिण भारत काँग्रेसचा बालेकिल्ला होता आणि जवळपास प्रत्येक राज्यात काँग्रेस सत्तेत असे. पण, आज परिस्थिती पूर्णपणे पालटली असून तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि आता पुदुच्चेरीतही काँग्रेसचे नामोनिशाण शिल्लक न राहिल्याचे जाणवते.
सन २०१४ मध्ये देशातील तमाम मतदारांनी काँग्रेसला केंद्रीय सत्तेतून पिटाळून लावले आणि काँग्रेसच्या प्रत्यक्ष र्हासाला सुरुवात झाली. त्यानंतर विविध राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांतही अपवाद वगळता जनतेने काँग्रेस पक्षाला अक्षरशः पाल झटकावी, तसे झटकले. अनेक राज्यात काठावरचे बहुमत मिळवून वा अनैसर्गिक आघाड्या करून बळकावलेली सत्ताही काँग्रेसला टिकवता आली नाही. आता तर काँग्रेसच्या हातातून एकामागोमाग एक राज्यसत्ता निसटण्याच्या यादीत इवल्याशा पुदुच्चेरीचेही नाव सामील झाले.
इथे सोमवारी विधिमंडळात विश्वासदर्शक ठरावावर मतदान होण्याआधीच मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी पदाचा राजीनामा दिला आणि काँग्रेसने आणखी एका प्रदेशातून सत्ता गमावली. मात्र, पुदुच्चेरीतील काँग्रेस सरकार कोसळण्याआधी उणेपुरे पाचच दिवस झाले, राहुल गांधींनी तिथला दौरा केला होता. पण, राहुलच्या दौर्यामुळे पुदुच्चेरीतील काँग्रेसी आमदार इतके प्रभावित झाले की त्यांनी थेट पक्षालाच ‘टाटा-बाय बाय’ केले. अर्थात, राहुल गांधी पुदुच्चेरीसारख्या केंद्रशासित प्रदेशातील काँग्रेसलादेखील उद्ध्वस्त होण्यापासून सावरू शकले नाहीत किंवा ते आले, त्यांनी पाहिले, ते बोलले आणि भूकंप होऊन स्वपक्षाच्याच सत्तेचे पतन झाले.
दरम्यान, पुदुच्चेरीत काँग्रेस आणि द्रविड मुन्नेत्र कळघम या दोन पक्षांचे आघाडी सरकार प्रदेशाचा कारभार हाकत होते. पण, राहुल गांधींच्या पुदुच्चेरी दौर्याआधीच इथले सरकार अस्थिर झाले होते. कारण, एका मंत्र्यासहित काँग्रेस व द्रमुकच्या अनेक आमदारांनी राजीनामे दिले होते, तसेच एका आमदाराला अपात्र घोषित करण्यात आले होते. त्यानंतर पुदुच्चेरीतील राजकीय वातावरण तापले आणि याच काळात केंद्र सरकारने उपराज्यपाल किरण बेदी यांनाही माघारी बोलावले. त्या उपराज्यपाल पदावर होत्या, तेव्हापासूनच मुख्यमंत्री नारायणसामी, काँग्रेसी मंत्री, नेते, आमदार व द्रमुकचे सदस्य किरण बेदी शासकीय कामांत अडथळे आणत असल्याचा आरोप करत होते.
त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने किरण बेदी यांना उपराज्यपालपदावरुन मुक्त केले व तेलंगणच्या राज्यपाल तमिलसाई सौंदर्यराजन यांच्याकडे तेथील अतिरिक्त जबाबदारी सोपवली. जेणेकरून नारायणसामी सरकारवर विश्वासदर्शक ठरावाची वेळ आलीच, तर ते केंद्र सरकार व उपराज्यपाल यांनी मिलिभगत केल्याचा आरोप करू शकणार नाहीत. पुढे तमिलसाई सौंदर्यराजन यांनी व्ही. नारायणसामी यांना विश्वासदर्शक ठराव मांडण्याचे निर्देशदिले. कारण, तिथे काँग्रेस व द्रमुक आघाडीच्या सदस्यसंख्येत कमालीची घट झाली होती व ते सरकार अल्पमतात गेले होते. अशा परिस्थितीतच राहुल गांधींनी पुदुच्चेरीचा दौरा केला, पण त्यांची पुदुच्चेरीभेट अल्पमतातील सरकार वाचवण्यासाठी पूरक नव्हे, तर मारकच ठरली. राहुल पुदुच्चेरीतील काँग्रेसला एकजूट करण्यासाठी गेले, पण झाले उलटेच. राहुल गांधींची राजकीय अपरिपक्वता पुदुच्चेरी काँग्रेसमध्येही ‘डॅमेज कंट्रोल’ करू शकली नाही नि त्यांची प्रतिमा इतकी बिघडली की तिथले नेते पूर्वीपेक्षाही अधिक वेगाने पक्षातून पलायन करते झाले.
विशेष म्हणजे, पुदुच्चेरीतून काँग्रेस सरकार पडल्यानंतर दक्षिण भारतातून काँग्रेसचा पुरता सफाया झाल्याचे दिसते. एकेकाळी दक्षिण भारत काँग्रेसचा बालेकिल्ला होता आणि जवळपास प्रत्येक राज्यात काँग्रेस सत्तेत असे. पण, आज मात्र परिस्थिती पूर्णपणे पालटली असून तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि आता पुदुच्चेरीतही काँग्रेसचे नामोनिशाण शिल्लक नसल्याचे जाणवते. तामिळनाडूत तर काँग्रेस सन १९६७ पासून सत्तेबाहेर आहे, केरळमध्ये काँग्रेस व डाव्यांची आलटून पालटून सत्ता येत असते, तर कर्नाटकात दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकांत काँग्रेसला जनतेने सत्ता दिली नव्हती. पण, त्या पक्षाने विरोधात लढलेल्या निधर्मी जनता दलाच्या कुमारस्वामींना मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा दिला आणि अखेर ते सरकारही गडगडले.
आंध्र प्रदेशातील काँग्रेसची माती, तर स्वतः सोनिया गांधी व राहुल गांधींनीच केली आणि काँग्रेस नेते राहिलेल्या वाय. एस. आर. रेड्डी यांचे पुत्र जगनमोहन रेड्डी यांनी स्वबळावर स्वपक्षाचे सरकार तिथे स्थापन केले. आंध्र प्रदेशच्या विभाजनाच्या वादातून तेलंगणमध्ये तर काँग्रेसला आधारच राहिलेला नाही व तिथे तो पक्ष अस्तित्वहीनच आहे. त्यात आता पुदुच्चेरीची भर पडली व तिथलेही काँग्रेस सरकार गेले. महत्त्वाचे म्हणजे, येत्या तीन महिन्यांतच पुदुच्चेरीसह तामिळनाडू व केरळमध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. पुदुच्चेरीतील काँग्रेस सत्तेतून बेदखल होण्याचा प्रभाव शेजारच्या तामिळनाडूवर पडेल, तसाच तो केरळवरही पडल्याशिवाय राहणार नाही. कारण, दक्षिण भारतातून परिघ आखडत जाणार्या काँग्रेसला पुदुच्चेरीतील सरकारमुळे मनोबल कायम राखता येत होते. पण, तिथेही काँग्रेसचे दिवाळे वाजल्याने शेजारच्या राज्यांतील प्रदेश काँग्रेसची आगामी निवडणुकांमध्ये लढण्याची क्षमताही नक्कीच खच्ची होऊ शकते.
दरम्यान, पुदुच्चेरीतील काँग्रेस सरकार कोसळण्याचे धक्के फक्त दक्षिण भारतापुरतेच मर्यादित राहू शकत नाहीत. कारण, संपूर्ण देशाचा विचार केल्यास काँग्रेससारखा राष्ट्रीय पक्ष फक्त पंजाब, राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये स्वबळावर सत्तेत आहे, तर महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये नावापुरता तो पक्ष सरकारमध्ये सहभागी आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसमधील नाराजांचा ‘जी-२३’ गट पुन्हा एकदा सक्रिय होऊ शकतो का? गेल्यावर्षी काँग्रेसी वरिष्ठांनी हंगामी पक्षाध्यक्षा सोनिया गांधींकडे पत्र पाठवून पूर्णवेळ अध्यक्षाची मागणी करत पक्षांतर्गत निवडणुकांसह अनेक मुद्द्यावर आपली मते व्यक्त केली होती. पण, स्वतःची बुद्धी चालवणार्या या नेत्यांवर सोनिया गांधी व राहुल गांधींनीही संताप व्यक्त केला, नाही नाही ते आरोप केले.
तसेच त्यानंतर पूर्णवेळ अध्यक्ष वगैरे न नेमता सोनिया गांधी हंगामी तर राहुल गांधी बिनपदाचे अध्यक्ष म्हणून काम करू लागले. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या दौर्यानंतर विधानसभा निवडणुकीला केवळ तीन महिने बाकी असताना काँग्रेसने पुदुच्चेरी गमावले, याचा अर्थ ‘जी-२३’ गटाला पक्षनेतृत्वावर दबाव वाढवण्याची संधी चालून आल्यासारखाच घ्यावा लागेल. एकूणच, काँग्रेसने पुदुच्चेरी गमावल्याने पक्ष दक्षिण भारतातून नाहीसा झालाच, येत्या विधानसभा निवडणुका लढवतेवेळी दडपणाखाली आलाच, तसेच पक्षातील असंतुष्टांना गांधी कुटुंबीयांपुढे डोके वर काढण्याची जणू काही परवानगीही मिळाली. अर्थात, या सगळ्यामागे सोनिया गांधी व त्यांच्यापेक्षाही राहुल गांधींच्याच ‘ट्विटर’-‘ट्विटर’च्या खेळासह नाकर्तेपणाचा मोठा वाटा आहे, हे निश्चित.