कोण आहे जॉर्ज सोरोस?

    19-Feb-2021
Total Views |

George Soros_1  
 
 
 
जॉर्ज सोरोस या अमेरिकेतील उद्योगपतीला इमरान खान आणि त्यांच्या शिष्टमंडळाला भेटण्याची गरज का भासली? तर याचे उत्तर सोरोस यांच्या विध्वंसक व्यक्तिमत्त्वात दडलेले आहे.
 
जॉर्ज सोरोस हा मूळ हंगेरीतील बुडापेस्टमध्ये जन्मलेला आणि नंतर अमेरिकेत स्थायिक झालेला अब्जाधीश उद्योगपती. युरोपातून अमेरिकेत येऊन स्थायिक झालेला आणि अब्जाधीश झालेल्या अनेक उद्योगपतींपैकी एक. त्याची मालमत्ता नऊ अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढी असून आतापर्यंत ३० अब्ज डॉलर्स त्याने त्याच्या 'एनजीओ'ला (बिनसरकारी स्वयंसेवी संस्था) आणि त्याच्यामार्फत अनेक उपसंस्थांना दिली आहे आणि अजूनही दिली जाते, असे सांगितले जाते. पण, या अर्थसाहाय्याचे उद्देश मात्र कधीच निर्हेतुक नव्हते आणि नाहीत. 'ओपन सोसायटी फाऊंडेशन' नाव असणाऱ्या या 'एनजीओ'ची पाळेमुळे जगातील १२० देशांत पसरलेली आहेत. या 'एनजीओ'ला संलग्न अशा अनेक स्थानिक संस्था विविध देशांमध्ये पसरलेल्या आहेत. अमेरिकन डॉलर हे जगात सर्वात जास्त वापरले जाणारे आणि मागणी असणारे चलन असल्यामुळे जॉर्ज सोरोससारख्या अशा अब्जाधीश व्यक्तिमत्त्वांना एक प्रकारची मस्ती आणि मग्रुरी चढलेली दिसून येते. 'फोर्ड फाऊंडेशन' ही पण अशीच दुसरे अमेरिकन उद्योगपती फोर्ड या उद्योगपतींच्या संस्थेतर्फे चालविली जाणारी 'एनजीओ.' या 'एनजीओ'ची पाळेमुळेही जगभर पसरलेली आहेत.
 
 
जगातील विविध देशांतील मग त्यामध्ये आखाती देश आले, दक्षिण अमेरिकेतील देश आले, युरोपातील देश आले आणि आशियातील देशही आले; या देशांमधील अतृप्त आत्मे असणारे पत्रकार, संपादक, वकील, राजकारणी, सनदी अधिकारी याचबरोबर 'फेसबुक', 'ट्विटर'सारखी समाजमाध्यमे यांना पैशांच्या बळावर आपल्याकडे ओढून एका प्रकारची 'इकोसिस्टीम' (सर्वव्यापी रचना) या व्यक्तीने आणि त्यांच्या संलग्न संस्थांनी तयार केली असल्याचे दिसून आले आहे. जगातील अनेक देशांमध्ये अशांतता माजविणे, अर्थव्यवस्था खिळखिळी करणे हे या तथाकथित 'एनजीओ'चे उद्दिष्ट. 'ओपन सोसायटी फाऊंडेशन' या नावाने चालविल्या जाणाऱ्या अमेरिकेतील 'एनजीओ'ने जगामध्ये कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे एकमेकांशी संलग्न उपसंस्था स्थापन केल्या आहेत. या संस्थांची नावेही अशी असतात की, त्या नावांवरून एखादी व्यक्ती त्या 'एनजीओं'बद्दल चांगले मत बनविते.
 
 
'ओपन सोसायटी फाऊंडेशन' आणि त्यांच्या उपसंस्थांमार्फत विविध देशांमधील वर उल्लेखलेल्या व्यवसायातील अनेक लोकांना जो अर्थपुरवठा केला जातो, तो चक्क डोळे पांढरा करणारा आहे. या संस्थेच्या संकेतस्थळावर चक्क बेकार लोकांना एखाद्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी 'रजिस्ट्रेशन' करण्याची सोय आहे. 'ब्लॅक लाईव्हज मॅटर्स' या काही महिन्यांपूर्वी अमेरिकेत उसळलेल्या आंदोलनादरम्यान ही गोष्ट समोर आली होती. विविध देशांमधील लेखक, वाचाळ पत्रकार यांना प्रथम हेरून आणि मग हाताशी धरून त्यातील भविष्यात उपयोगी ठरू शकतील, अशा लोकांना सार्वजनिक पुरस्कार मिळवून देणे, त्यांना जनमानसात स्थापित करणे आणि मग त्यांच्यामार्फत आपणांस हवा असलेला अजेंडा राबविणे, हे यातील विविध टप्पे आहेत. अनेकवेळा एखाद्या अपरिचित व्यक्तीला अचानक पुरस्कार जाहीर होऊन ती व्यक्ती चर्चेत आल्याचे दिसते. मग त्या व्यक्तीच्या जाहीरपणे मुलाखती सुरू होतात, सत्कार समारंभ आयोजित केले जातात. एकदा त्या व्यक्तीला जनमानसात ओळख मिळाली आणि त्या व्यक्तीचा पुरेसा गाजावाजा झाला की, ती व्यक्ती तिला मिळालेल्या विषयपत्रिकेतील विषयाचे ज्ञान वाटावयास सुरू करते. या व्यक्ती जे सांगतील तेच 'ब्रह्मवाक्य' हे बिंबवण्याचा प्रयत्न होतो. त्याला सुरुवातीला काही प्रमाणात यशही मिळते. अशा व्यक्तींना जाहीरपणे प्रश्न विचारण्याचीही सोय नसते. चुकून एखादी व्यक्ती प्रश्न विचारण्यात यशस्वी झालीच, तर त्याच्या प्रश्नांना टाळले जाते अथवा गोलमाल उत्तरे दिली जातात.
 
 
 
खरेतर 'एनजीओ' स्थापन होण्यामागची संकल्पना चांगली आहे. सरकार प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक छोट्या, मोठ्या सामाजिक, शैक्षणिक प्रकल्पांत लक्ष घालू शकत नाही. त्या ठिकाणी मोठे उद्योग आणि उद्योगपती हे सामाजिक जाणिवेच्या भूमिकेतून अशा प्रकल्पांना साहाय्य्य करतात आणि तेच त्यांच्याकडून अपेक्षितही आहे. पण, या अशा काही 'एनजीओ' संस्थानांचा वापर करून एखाद्या देशात अस्थिरता, अशांतता माजविणे अशा गोष्टींमध्ये यांचा सहभाग पुढे आलेला आहे. अमेरिकन उद्योगपतींचा या मागील उद्देश हा एखादा देश अमेरिकेच्या स्पर्धेत उभा राहू नये आणि जर उभा राहत असेल, तर त्याला अस्थिरतेमध्ये गुंतवून ठेवणे, असा आहे की काय, अशी दाट शंका घेण्यास वाव आहे. काही गरीब देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण करून शस्त्रास्त्रांच्या मागणीमध्ये वाढ करून घेणे आणि अमेरिकेतील शस्त्रास्त्रनिर्मितीमधील उद्योगांना 'धंदा' निर्माण करून देणे, हा असू शकतो. मग या उद्योगांसाठी या देशातील राजकारणीही पुढाकार घेताना दिसतात. हे दुष्टचक्र गेली अनेक वर्षे चालू आहे. अमेरिकन डॉलरची जगभरातील मागणी आणि त्यामुळे असणारी डॉलरची दादागिरी याला कारणीभूत असावी.जॉर्ज सोरोस याच्या ब्रिटिश पौंड या चलनाशी संबंधित कारवायांमुळे ब्रिटनच्या 'बँक ऑफ इंग्लंड'ला १९९२ मध्ये घाम फुटला होता. जॉन मेजर या तत्कालीन ब्रिटनच्या पंतप्रधानांना यामुळे त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावयास लागला होता. इटलीचे पूर्व उपपंतप्रधान मेटीओ साल्वीनी यांनी जॉर्ज सोरोस याचे नाव घेऊन त्याला इटलीमध्ये निर्वासितांना घुसविण्याबद्दल दोषी धरले होते आणि त्याच्यावर टीका केली होती. ब्रिटनच्या 'ब्रेक्झिट' समर्थक पक्षाचे नेते 'निगेल फराज' यानेही जॉर्ज सोरोस याला निर्वासितांना युरोपमध्ये आणण्यासाठी जबाबदार धरले होते. तुर्कस्तानचे अध्यक्ष एर्दोगान यांनीही जॉर्ज सोरोस याला त्याच्या देशामध्ये अस्थिरता आणि अशांतता माजविण्याबद्दल दोषी धरले होते.
 
 
जॉर्ज सोरोस हा मूळ हंगेरी या युरोपातील देशातून आलेला असल्याने हंगेरीतही त्याने त्याच्या 'एनजीओ'मार्फत अनेक कारवाया सुरु केल्या होत्या. पण, एकेकाळी सोरोस याच्याच संस्थेतून आलेल्या आणि नंतर हंगेरीचे पंतप्रधान बनलेल्या व्हिक्टर ओरबान यांनी जॉर्ज सोरोसला आणि त्याच्या अनेक संस्थांना हंगेरीमध्ये पूर्णपणे बंदी घातलेली आहे. तेथील संसदेमध्ये त्यांनी सोरोस यांना प्रतिबंध करण्यासाठी कायदाही संमत करून घेतला होता. थोडक्यात, हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ओरबान हे जॉर्ज सोरोसला पुरेपूर ओळखून आहेत. हंगेरीतील विद्यापीठे, इंजिनिअरिंग महाविद्यालये याला जॉर्ज सोरोसच्या संस्थांकडून संशोधनाच्या नावाखाली मिळणाऱ्या आर्थिक मदतीवरही व्हिक्टर ओरबान यांनी पूर्णतः बंदी घातलेली आहे. हंगेरीतील केंद्रीय युरोपियन विद्यापीठ (सेंट्रल युरोपियन युनिव्हर्सिटी) ही हंगेरी आणि अमेरिकेत ओळखली जाणारी संस्था आहे. या संस्थेचा आश्रयदाता आहे अर्थातच जॉर्ज सोरोस. व्हिक्टर ओरबान यांच्याच शब्दात सांगावयाचे झाले तर 'सेंट्रल युरोपियन युनिव्हर्सिटी' ही जॉर्ज सोरोसच्या 'ओपन सोसायटी फाऊंडेशन'ची 'प्रोटोटाईप संस्था' बनविण्याला माझा विरोध आहे. त्यामुळे या विद्यापीठामार्फत जॉर्ज सोरोसला हंगेरीतील वर्तुळांमध्ये प्रवेश करण्यालाही अर्बन यांनी प्रतिबंध केलेला आहे. एप्रिल २०१७ मध्ये व्हिक्टर ओरबान यांनी तेथील संसदेत कायदा करून या युनिव्हर्सिटीला हंगेरीत राहून सोरोसशी संबंध ठेवावयास विरोध केला होता. वेळ आली तर ती युनिव्हर्सिटी बंदही केली जाईल, असे अर्बन यांनी सांगितले होते. हे सर्व विस्ताराने सांगावयाचे कारण म्हणजे, जॉर्ज सोरोस हे काय व्यक्तिमत्त्व आहे हे कळावे म्हणून.
 
 
 
 
व्हिक्टर ओरबान हे जॉर्ज सोरोसला उपहासाने 'अंकल जॉर्ज' असे संबोधतात. २०११ नंतर आखाती देशांमध्ये सुरू झालेले जनआंदोलन ज्याला 'अरब स्प्रिंग' म्हटले गेले आणि त्यामध्ये इजिप्त, इराक, सीरिया, लिबिया, येमेन हे देश होरपळले गेलेले जगाने पाहिले. अजूनही या देशांमधील परिस्थितीत सुधारणा नाही, हे आपण बघतोच. 'इसिस' या अतिरेकी संघटनेने सीरिया आणि इराकमध्ये अनेक वर्षे घातलेला हैदोस दिसत होता. वर उल्लेखलेल्या देशांमधील सैरभैर झालेले निर्वासित मिळेल त्या मार्गाने युरोपात घुसण्याचा प्रयत्न करत होते. बोटींमध्ये बसून निर्वासितांच्या तांड्यांच्या भाराने अनेक वेळा बोटी उलटून अनेक निर्वासित मृत्युमुखी पडल्याचे समोर आलेले होते. जे निर्वासित जर्मनी, फ्रान्स, इटली देशात पोहोचले आणि ज्या देशांनी या निर्वासितांना आश्रय दिला, तेथे याच निर्वासितांनी स्थानिक लोकांना नुसता त्रासच दिला नाही, तर त्यांच्यावर हल्ले केले आणि हैदोस घातला. त्यामुळे या निर्वासितांना युरोपातील स्थानिक लोकांनी आपापल्या देशामध्ये सामावून घेण्यास विरोध सुरु केला होता. आखाती संस्कृती आणि युरोपातील विकसित लोकशाही संस्कृती यामधील हा संघर्ष होता. 'ब्रेक्झिट' होण्यामागेही निर्वासितांना ब्रिटनमध्ये येण्यापासून रोखणे हाही एक उद्देश होताच.
 
 
युरोपातील ज्या देशांनी प्रथमपासून या निर्वासितांना आपल्या देशात प्रवेश देण्यास नुसता विरोधच केला नाही, तर कायदे करून निर्वासितांच्या त्या देशातील प्रवेशाला निर्बंध घातले. त्यामध्ये हंगेरी आणि पोलंड या देशांचे नाव प्रामुख्याने समोर येते. या निर्वासितांना युरोपातील देशांमध्ये प्रवेश देण्यासाठी 'युरोपियन युनियन' (यामध्ये प्रामुख्याने फ्रान्स आणि जर्मनी) आग्रही होती. सोरोसने युरोपातील या देशांनी निर्वासितांना सामावून घ्यावे, असा जोरदार प्रचार चालविला होता आणि अजूनही चालविलेला दिसतो. सोरोसच्या मूळ देशाने म्हणजे हंगेरीने याला जोरदार अटकाव घातला. हंगेरीने सोरोसला आणि त्याच्याशी संबंधित सर्व संस्थांना हंगेरीत पूर्णपणे बंदी घातलेली आहे. व्हिक्टर ओरबान हे हंगेरीचे गेली अनेक वर्षे पंतप्रधान असून त्यांनी सोरोसच्या कारवायांना कडक प्रतिबंध घातला आहे. एवढेच नाही तर निर्वासितांना देशामध्ये सामावून घेण्याच्या युरोपियन युनियनच्या निर्देशांना धुडकावून लावले होते. 'युरोपियन युनियनमधून बाहेर पडावे लागले तरी चालेल, पण एकाही निर्वासिताला हंगेरीत प्रवेश मिळणार नाही,' असे व्हिक्टर ओरबान यांनी ठणकावून सांगितले होते. अजूनही ओरबान या विषयावर ठाम आहेत, हे विशेष. अशी विध्वंसक विचारसरणी असणाऱ्या जॉर्ज सोरोस या अशा व्यक्तिमत्वाने गेली काही वर्षे भारताकडे मोर्चा वळविला असल्याचे दिसून आले आहे. दोन वर्षांपूर्वी दावोस येथील कार्यक्रमात बोलताना जॉर्ज सोरोसने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रथमच प्रत्यक्ष उल्लेख केला होता आणि त्यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. भारताच्या अंतर्गत बाबींशी सोरोसचा खरेतर काहीही संबंध नाही. अमेरिकेतील डेमोक्रेटिक पक्षाला भरघोस आर्थिक मदत करणाऱ्या व्यक्तींमध्ये सोरोसचे नाव अग्रेसर आहे आणि यापूर्वीही होते. 'हाऊडी मोदी' या २०१९ मध्ये अमेरिकेतील ह्यूस्टनमध्ये झालेल्या आणि जगभरात गाजलेल्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजे दि. २३ सप्टेंबरला पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांची आणि त्यांच्यासोबतच्या शिष्टमंडळाची जॉर्ज सोरोसने अमेरिकेतील एका हॉटेलमध्ये भेट घेतली होती. या भेटीची छायाचित्रे समाजमाध्यमांमध्ये उपलब्ध आहेत. जॉर्ज सोरोस या अमेरिकेतील उद्योगपतीला इमरान खान आणि त्यांच्या शिष्टमंडळाला भेटण्याची गरज का भासली? तर याचे उत्तर सोरोस यांच्या विध्वंसक व्यक्तिमत्त्वात दडलेले आहे.
 
 
- सनत्कुमार कोल्हटकर