मोदीद्वेष्ट्यांना आफ्रिकन थप्पड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Feb-2021   
Total Views |

vaccine_1  H x
 
 
पुण्यातील ‘सीरम इन्स्टिट्यूट’मध्ये तयार करण्यात आलेल्या कोरोनारोधी ‘अ‍ॅस्ट्राझेनेका’ लसीच्या १० लाख कुप्या दक्षिण आफ्रिका भारताला परत पाठवणार!’ मंगळवारी बहुतांश भारतीय प्रसारमाध्यमांनी सदरचे वृत्त दिले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांना हायसे वाटले. ‘व्हॅक्सिन डिप्लोमसी’च्या माध्यमातून जगभरातील छोट्या-मोठ्या देशांशी भारताचे संबंध दृढ करण्याची पावले उचलतात काय मोदी? ‘व्हॅक्सिन डिप्लोमसी’च्या माध्यमातून संयुक्त राष्ट्र, जागतिक आरोग्य संघटनेच्या मनात भारताची प्रतिमा उंचावतात काय मोदी? पण आता बघा, चांगलीच फजिती झाली नाही मोदींची? नरेंद्र मोदींच्याच सत्ताकाळात भारताच्या दहा लाख कोरोनारोधी लसकुप्या दक्षिण आफ्रिका माघारी पाठवणार! बरी जिरली मोदींची! असाच विचार मंगळवारी मोदीविरोधकांनी आणि मोदीद्वेष्ट्यांनी केला नि तशी वृत्ते पसरवली.
 
 
कोरोनाच्या नव्या प्रकारावर ‘अ‍ॅस्ट्राझेनेका’ लस प्रभावी ठरत नसल्याने दक्षिण आफ्रिका त्या लसकुप्या माघारी पाठवणार, अशी बातमी ‘द हिंदू’ने दिली. नंतर ‘एनडीटीव्ही’नेदेखील माध्यमांच्या आणि दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्यमंत्र्यांच्या हवाल्याने हेच वृत्त उचलत छापले. त्याचाच कित्ता ‘इकॉनॉमिक टाईम्स’, ‘आऊटलुक’, ‘व्हीसीसर्कल’सह इतर मीडिया पोर्टल्सनी गिरवला. सोशल मीडियावरदेखील मोदी व भाजपविरोधकांनी सदरच्या बातम्या सामायिक करत स्वदेशी कोरोनारोधी लस धोकादायक असल्याचा आपला जुना-पुराणा राग पुन्हा एकदा आळवला. तथापि, कोरोनारोधी लसपुरवठ्यामुळे जगात मोदींचे नाव होईल, पण त्यापेक्षाही भारताचे कर्तृत्व झळाळून उठेल, एवढा साधा विचारही या मंडळींचे मेंदू करू शकले नाहीत. अर्थात, द्वेषाची राख माथ्याला फासली की असेच होते म्हणा. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदींना सदानकदा पाण्यात पाहणाऱ्यांचा आनंद उणापुरा २४ तासही टिकू शकला नाही. कारण, दक्षिण आफ्रिकेनेच सर्व मोदीविरोधकांच्या-मोदीद्वेष्ट्यांच्या सणसणीत थोबाडीत हाणली आणि आम्ही ‘सीरम इन्स्टिट्यूट’च्या ‘अ‍ॅस्ट्राझेनेका’ लसींच्या १० लाख किंवा त्यापेक्षा कमीदेखील कुप्या परत देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे स्पष्ट केले, हे बरेच झाले.
भारतीय लसकुप्या वापरणारच
 
 
देशातील तथाकथित सत्य आणि नि:पक्ष प्रसारमाध्यमांनी दिलेल्या लसकुप्या माघारीच्या वृत्ताची सच्चाई नेमकी काय होती पण? त्याचे उत्तर दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्यमंत्र्यांनी दिले आणि सत्य सर्वांसमोर आले. दक्षिण आफ्रिकेचे आरोग्यमंत्री डॉ. ज्वेली मखीज यांनी मंगळवार, दि. १६ फेब्रुवारी रोजी ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ने विकसित केलेल्या कोरोनारोधी ‘अ‍ॅस्ट्राझेनेका’ लसीच्या कुप्या परत पाठवणार नसल्याचे स्पष्ट केले. ‘स्टेट ऑफ द नेशन अ‍ॅड्रेस डिबेट’दरम्यान संसदेत डॉ. ज्वेली मखीज म्हणाले की, “‘अ‍ॅस्ट्राझेनेका’ लसकुप्या माघारी देण्याबाबत प्रसारमाध्यमांत जे काही सांगितले जात आहे, त्यात कसलेही तथ्य नाही.” पुढे त्यांनी सांगितले की, “मी पुन्हा एकदा स्पष्ट करु इच्छितो की, लसकुप्या कालबाह्य झालेल्या नाहीत आणि आम्ही स्वतः लसकुप्यांच्या कालबाह्यतेची तारीख ३१ एप्रिल अशी निश्चित केली आहे. लसकुप्या कालबाह्य झाल्याची चुकीची अफवा पसरवण्यात आलेली आहे. आम्ही ‘जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन’च्या ९० लाख लसकुप्यांची मागणी केलेली आहे. कितीतरी आंतरराष्ट्रीय स्तरावरील लसउत्पादकांशी आमची चर्चा सुरू आहे.” अर्थात, भारतातील आपल्या वातानुकूलित कार्यालयात बसून दक्षिण आफ्रिकेने भारताच्याच लसकुप्या माघारी देण्याची घोषणा केल्याच्या बातम्यांचे उत्साही पतंग उडवणारे स्वतःच तोंडघशी पडले. पण म्हणून कोणतीही शहानिशा न करता वृत्ते प्रसिद्ध करणारी माध्यमे झाल्याप्रकाराबद्दल माफी अथवा दिलगिरी तरी मागतील का?
 
दरम्यान, भारताच्या दहा लाख लसकुप्या परत पाठवण्याच्या वृत्तावर देशातील मोदीविरोधक व मोदीद्वेष्टे खूश झाले तसाच आनंद पाकिस्तानलाही झाला. कारण, भारताच्या वाईटावर टपलेल्या पाकिस्तानने, तिथल्या सत्ताधारी पंतप्रधान इमरान खान यांच्या पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ पक्षानेही आपल्या ट्विटर खात्यावरुन ‘फोर्ब्स’चे वृत्त सामायिक करत भारत कोरोना लसीच्या माध्यमातून संपूर्ण जगाला धोक्यात घालत असल्याचा आरोप केला होता. म्हणजे, स्वतःची कोरोनारोधी लस तयार करण्याची पात्रता नाही आणि भारताने लस विकसित केली तर त्यावरुन काहूर माजवायचे, असाच हा प्रकार. तोही भारतातील मोदीविरोधकांच्या-मोदीद्वेष्ट्यांच्या सुरात सूर मिसळणारा, पण दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानसह सर्वांचीच तोंडे बंद केली, हे महत्त्वाचे.
@@AUTHORINFO_V1@@