‘भारतरत्न’ पुरस्कृतांची चौकशी नाही; गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण
सर्व स्तरांतून विरोध झाल्यानंतर राज्य सरकारचा अखेर ‘यु-टर्न’
मुंबई: शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर ट्विट केल्याप्रकरणी ‘भारतरत्न’ पुरस्कृत कलाकारांची चौकशी करण्याचे आदेश अखेर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मागे घेतले आहेत. या निर्णयाबाबत सर्व स्तरांतून प्रखर विरोध झाल्यानंतर सरकारला अखेर उपरती झाली असून यावरून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आता ‘यु-टर्न’ घेतल्याचे चित्र आहे. “शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर विविध कलाकारांनी केलेल्या ट्विटसंदर्भात माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. कलाकारांची चौकशी करा, असे माझे आदेश नव्हते. या प्रकरणात भाजपच्या आयटी सेलचा सहभाग असण्याची शक्यता वाटल्याने मी त्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. गानसम्राज्ञी लता मंगेशकर आमचे दैवत आहेत,” असे स्पष्टीकरण राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवार, दि. १५ फेब्रुवारी रोजी दिले.
दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर पॉपस्टार रिहानाने ट्विट केल्यानंतर आणि एकच चर्चा सुरू झाली. यानंतर अनेक प्रख्यात खेळाडू तसेच बॉलिवूडमधील कलाकारांनी ट्विट केले होते. यावरून वादंग माजला होता. आपला देश विभागण्याचा प्रयत्न होत असून तसे होऊ देऊ नका असे आवाहन कलाकार मंडळींकडून करण्यात आले होते. मात्र, यावेळी काही कलाकारांच्या ट्विटमधील मजकूर समान असल्याचा आक्षेप घेत याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली होती. त्यावेळी त्यांच्या मागणीला उत्तर देताना याची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. विरोधी पक्षातील नेत्यांकडून याला कडाडून विरोध केल्यानंतर सर्वसामान्यांकडूनही याविरोधात तिखट प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर आता सरकारने यावर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. अनिल देशमुख म्हणाले की, “सचिन तेंडुलकर व लता मंगेशकर यांना संपूर्ण देशातील जनता मानत असल्याने त्यांच्या चौकशीचा प्रश्नच उद्भवत नाही. या ट्विट प्रकरणात भाजपच्या आयटी सेलचा प्रमुख आणि इतर १२ ‘इन्फ्लुएन्सर’चा समावेश असल्याचे महाराष्ट्र पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यानुसार पोलीस कार्यवाही करत आहेत,” असे ते म्हणाले.
अनिल देशमुख यांनी भारतरत्नांची चौकशी होणार असे म्हटल्यावर भाजपने आक्रमक भूमिका घेत अनिल देशमुख यांच्यावर जोरदार टीका सुरू केली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अतुल भातखळकर व आशिष शेलार यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. “संतापजनक! कुठे गेला मराठीबाणा? कुठे गेला महाराष्ट्रधर्म? ‘भारतरत्नां’ची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत. निषेध करावा तितका थोडा! या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?” असे फडणवीस यांनी ट्विट केले होते.