‘यू.एस.एस. एल्डरिज’ गायब झाली तेव्हा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

Eldridge_1  H x
 
 
 
फिलाडेल्फिया नाविक अड्ड्यापासून ३२० कि. मी. दूर व्हर्जिनियातल्या नॉरफोक बंदरात ‘एस. एस. अॅन्ड्र्यू फुरुसेथ’ नावाचं एक मालवाहू जहाज उभं होतं. त्याच्या जवळ ही ‘एल्डरिज’ विनाशिका एकदम प्रकट झाली. ‘फुरुसेथ’वरचे खलाशी पण चकित होऊन बघत राहिले. एकदम हवेतून प्रकट व्हावी, तशी ही ‘एल्डरिज’ आली तरी कुठून? पुन्हा थोड्या वेळाने ‘एल्डरिज’ तिथून गायब झाली आणि फिलाडेल्फियातल्या मूळ जागी प्रकट झाली.
 
भरभक्कम देहयष्टीचा एक दाढीवाला बुवा, अमेरिकेच्या चलनी नोटा विमानाप्रमाणे घड्या घालून त्यावरची चित्रं आपल्याला दाखवतो आहे. या चित्रांमधून ११ सप्टेंबर, २००१ ची ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर दुर्घटना’ कशी सूचित होते, ते तो आपल्याला सांगतो. मग एक डॉलरच्या नोटेवर एक पिरॅमिड आणि त्याच्यावर असलेला एक डोळा, हे चिन्ह कसं एक गुढ, रहस्यमय, गुप्त पंथाचं चिन्ह आहे, हे तो आपल्याला सांगतो. मग तो २० डॉलरची नोट अशा रीतीने घडी करतो की, नोटेवरचं अॅन्ड्य्रू जॅकसन या राष्ट्राध्यक्षाचं चित्र आपल्याला, त्याने तोंडभर मास्क-मुखपट्टी लावल्यासारखं दिसतं आणि खाली आकडा दिसतो-२०२०! म्हणजे २०२० साली सगळ्या जगाला मुखपट्टी बांधून काळ कंठावा लागणार आहे, हे यावरून ‘अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँके’ने आधीच सूचित केलं होतं, असं त्या बुवाचं म्हणणं आहे. मग फेडरल रिझर्व्हवाल्यांना हे कसं कळलं? तर म्हणे, अमेरिका या राष्ट्राच्या स्थापनेपासूनच त्याच्यावर ‘इल्युमिनाटी’, ‘फ्री मेसन्स’, ‘बिल्डरबर्ग’, ‘कमिटी ऑफ थ्री हंड्रेड’ किंवा तशाच कोणत्या तरी गुप्त पंथाचं वर्चस्व आहे. सध्या ही व्हिडिओ क्लिप समाजमाध्यमांवर सर्वत्र फिरते आहे. एक नवी ‘कॉन्स्पिरसी थिअरी’ जन्माला आली आहे.
 
अमेरिकेत जगातल्या प्रचलित शब्दांपेक्षा वेगळे शब्द वापरण्याची फॅशन आहे, त्यानुसार ते चलनी नोटांना ‘नोट’ न म्हणता ‘बिल’ असं म्हणतात, तर अशा सात प्रकारच्या नोटा किंवा बिल्स तिथे चलनात आहेत. सगळ्यात लहान एक डॉलरची नोट. तिच्या पुढच्या भागावर अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन याचं चित्र आहे. पाठच्या बाजूला, एका कोपर्यात गरुड हे अमेरिकेचं राष्ट्रीय चिन्ह आणि दुसर्या कोपर्यात एक पिरॅमिड आणि त्याच्यावर एक डोळा असं चिन्ह आहे. अनेक अभ्यासकांच्या म्हणण्याप्रमाणे हे चिन्ह ‘इल्युमिनाटी’ या गुप्त पंथाचं बोधचिन्ह आहे. त्यानंतर दोन डॉलरच्या नोटेवर एका बाजूला टॉमस जेफर्सन या माजी राष्ट्राध्यक्षाचं चित्र आणि पाठच्या बाजूला अमेरिकेच्या स्वातंत्र्याची घोषणा, या प्रसंगाचं चित्र आहे. पाच डॉलरच्या नोटेवर एका बाजूला अब्राहम लिंकनचं चित्र, तर पाठच्या बाजूला लिंकन मेमोरियल या वास्तूचं चित्र आहे. नंतर दहा डॉलरच्या नोटेवर पुढच्या बाजूला अलेक्झांडर हॅमिल्टन हा राष्ट्राध्यक्ष, तर पाठीमागे अमेरिकन ट्रेझरीचं चित्र आहे. २० डॉलरच्या नोटेवर पुढे अॅन्ड्र्यू जॅकसन हा राष्ट्राध्यक्ष, तर पाठीमागे व्हाईट हाऊसचं चित्र आहे. ५० डॉलरच्या नोटेवर पुढे युलिसिस ग्रँट हा राष्ट्राध्यक्ष, तर पाठीमागे कॅपिटॉल या अमेरिकन संसदेच्या इमारतीचं चित्र आहे आणि १०० डॉलरच्या नोटेवर पुढे बेंजामिन फ्रँकलिन हा राष्ट्राध्यक्ष, तर पाठीमागे इंडिपेन्डन्स हॉल म्हणजे, ज्या इमारतीत अमेरिकेच्या स्वातंत्र्याची उद्घोषणा करण्यात आली, तिचं चित्र आहे.
 
एक ते १०० डॉलरपर्यंतच्या या प्रत्येक नोटेवर अन्य आवश्यक नोंदीबरोबरच एक वाक्य आवर्जून लिहिलेलं असतं. ते म्हणजे, ‘इन गॉड वुई ट्रस्ट.’ ‘आम्ही देवावर विश्वास ठेवतो.’ जगातली सर्वशक्तिमान अमेरिका आपल्या चलनी नोटेवर हे वाक्य आवर्जून छापते. शासन हे निधर्मी असलं पाहिजे, सेक्युलर असलं पाहिजे, वगैरे उपदेश फक्त हिंदू समाजालाच करणार्या आपल्याकडच्या कथित निधर्मी विचारवंतांनी हे आवर्जून लक्षात घ्यावं. असल्या निधर्मी मुखंडांची पोरं बहुधा कायमची अमेरिकेत निघून गेलेली असतात. त्याच्याकडे गेल्यावर, पोरांनी नोटा हातात दिल्या, तर नीट पाहा. अमेरिकन शासन निधर्मी नाही, हे ते शासनकर्ते, सध्याचा पृथ्वीवरचा जो परमेश्वर म्हणजे डॉलर, त्या नोटेवरच ठासून सांगतायत- ‘इन गॉड वुई ट्रस्ट’! असो. तर या नोटांचं हे वर्णन एवढ्याचसाठी दिलं की, अमेरिकेत नव्यानेच प्रकट झालेल्या ‘कॉन्स्पिरसी थिअरी’प्रमाणे या विविध नोटा एका विशिष्ट प्रकारे दुमडल्या की, प्रथमच दिसतं वर्ल्ड टे्रड सेंटरचे दोन टॉवर्स व्यवस्थित उभे आहेत; मग दिसतं की त्यांच्या शिखरांमधून धूर येतो आहे; मग दिसतं की ते भुईसपाट होऊन तिथे फक्त एक धुराचा ढग उरला आहे. हे अविश्वसनीय आहे. पण, असं दिसतं हे तर कुणी नाकारू शकत नाही.
 
युरोपात गेली कित्येक शतकं अशा समजुती रूढ आहेत की, ज्यांना अतींद्रिय शक्ती अवगत आहेत, असे काही लोक एकत्र येऊन संपूर्ण जगावर राज्य करू पाहत आहेत. या लोकांच्या गुप्त संघटना असून, विविध सैतानी, अघोरी देवतांची उपासना करून ते अतींद्रिय शक्ती मिळवत असतात. ‘इल्युमिनाटी’, ‘फ्री मेसन्स’, ‘बिल्डरबर्ग’, ‘कमिटी ऑफ थ्री हंड्रेड’ ही या गुप्त संघटनांपैकी काहींची नावं आहेत. युरोपात चर्चमुळे या सगळ्या अघोर पंथीयांना बराच पायबंद बसला (म्हणजे असं युरोपीय अभ्यासकांना वाटतं.). मग १५व्या शतकात युरोपीय लोकांना स्थलांतर करण्यासाठी अमेरिका हा एक नवाच भूप्रदेश मिळाला. युरोपमध्ये ज्यांना काही उपजीविकेचं साधन नव्हतं, ते लोक भराभर अमेरिकेत गेले. तसेच हे गुप्त पंथाचे लोक पण गेले. नव्या अमेरिकन राष्ट्राचे ‘फाऊंडिंग फादर्स’ किंवा उद्गाते असं ज्यांना म्हटलं जातं, ते सगळेच लोक म्हणजे, जॉर्ज वॉशिंग्टन, टॉमस जेफर्सन, बेंजामिन फ्रँकलीन, अलेक्झांडर हॅमिल्टन, अॅन्ड्र्यू जॅकसन, हे सगळे जण ‘इल्युमिनाटी’ किंवा ‘फ्री मेसन्स’ पंथाचे अनुयायी होते, म्हणून तर एक डॉलरच्या नोटेवर पिरॅमिड आणि डोळा हे चिन्ह आलं.
 
याला म्हणतात, ‘कॉन्स्पिरसी थिअरी’ किंवा ‘कारस्थान सिद्धान्त.’ असे अनेक सिद्धान्त पश्चिमी देशांमध्ये रूढ आहेत. हे सिद्धान्त मांडणार्या अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की, अशा अनेक गुप्त संघटना आजही अस्तित्वात असून, त्यांना संपूर्ण जगावर स्वामित्व मिळवायचं आहे. किमान संपूर्ण जगाच्या आर्थिक व्यवहारावर त्यांना नियंत्रण मिळवायचं आहे; नव्हे, त्यांनी मिळवलंच आहे. कारण डॉलर हेच आज जगातलं सर्वात मजबूत चलन आहे आणि तो डॉलर तर त्या गुप्त संघटनांच्या ताब्यात आहेच. असेच इतरही अनेक ‘कारस्थान सिद्धान्त’ वेगवेगळ्या क्षेत्रांत असून, त्यावर नियमितपणे लेखन करणारे अनेक पत्रकार आहेत, लेखक आहेत, त्यांच्यातले सगळेच जण काही छा-छू गिरी करणारे नसून, विद्वान आणि गांभीर्याने अभ्यास करणारे आहेत. आपल्याकडे जसा आपण ब्रिटिशांनी आपला इतिहास विकृत केल्याचा सिद्धान्त मांडतो, तसा युरोपातले विद्वान त्यांच्या इतिहासाच्या उलट्या विकृतीकरणाचा सिद्धान्त मांडतात. उदा. आपण असं म्हणतो की, भगवान गौतम बुद्ध इसवी सन पूर्व काळात होऊन गेला. पण, ब्रिटिशांनी मुद्दाम त्याचा काळ इसवी सनानंतरचा दाखवला. म्हणजे, ‘आमचा येशू अगोदर, तुमचा बुद्ध नंतर’ असं त्यांना दाखवायचं होतं. युरोपीय विद्वान म्हणतात की, चर्च अधिकार्यांना येशू किंवा त्याचे धर्मप्रसारक किती महान होते हे लोकांना दाखवायचं होतं. पण, तशा फारशा गोष्टी उपलब्धच नव्हत्या. मग त्यांनी नंतरच्या काळातले राजे, संत किंवा तत्सम मोठ्या लोकांच्या जीवनातल्या गोष्टी उचलल्या आणि त्या अगोदरच्या काळातल्या येशू आणि त्यांच्या शिष्यांच्या चरित्रांमध्ये घुसडल्या. यंव रे गब्रू!
 
खरं म्हणजे, आपल्याला हा नमुना माहीत आहेच. विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय आणि त्याच्या दरबारातला चतुर तेनालीराम यांचे मजेदार किस्से आपल्याकडे अकबर आणि बिरबलाच्या गोष्टी म्हणून खपवल्या जातात. 
असो. तर यातला महत्त्वाचा मुद्दा असा की, वर दिलेल्या ‘रिव्हर्स हिस्ट्री’ सिद्धान्तावर खुद्द सर आयझॅक न्यूटनचा विश्वास होता. आता तर आयझॅक न्यूटनला तरी आपल्याकडचे, देवाला रिटायर करायला निघालेले कथित विचारवंत आणि त्यांचे सहप्रवासी, अंधश्रद्धाळू म्हणणार नाहीत, अशी अशा करूया. अशा अनेक ‘कारस्थान सिद्धान्तां’मधला एक मोठाच चमत्कारिक भासावा असा किस्सा म्हणजे ‘यू. एस. एस. एल्डरिज’ या अमेरिकन नौदलातल्या युद्धनौकेचा. २८ ऑक्टोबर, १९४३ या दिवशी ‘एल्डरिज’ ही विनाशिका नौदलाच्या फिलाडेल्फिया येथील तळावरून एकाएकी अदृश्य झाली.
 
एक निळा झगमगीत प्रकाशझोत कुठून तरी आला आणि ३०० फूट लांबीची, १,६०० टन वजनाची ‘एल्डरिज’ एकदम दिसेनाशीच झाली. बघणार्यांचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. ही काय भुताटकी!
 
पण, ही भुताटकी एवढ्यावर थांबली नाही. फिलाडेल्फिया नाविक अड्ड्यापासून ३२० कि. मी. दूर व्हर्जिनिया प्रांतातल्या नॉरफोक बंदरात ‘एस. एस. अॅन्ड्र्यू फुरुसेथ’ नावाचं एक मालवाहू जहाज उभं होतं. त्याच्या जवळ ही ‘एल्डरिज’ विनाशिका एकदम प्रकट झाली. ‘फुरुसेथ’वरचे खलाशी पण चकित होऊन बघत राहिले. एकदम हवेतून प्रकट व्हावी, तशी ही ‘एल्डरिज’ आली तरी कुठून? पुन्हा थोड्या वेळाने ‘एल्डरिज’ तिथून गायब झाली आणि फिलाडेल्फियातल्या मूळ जागी प्रकट झाली.
नंतर असं आढळलं की, ‘एल्डरिज’वरचे अनेक नौसैनिक गायब झाले आहेत. अनेक जण ‘एल्डरिज’च्या फळ्यांवर डिंकाने चिकटवावेत तसे चिकटून, जखडून पडले आहेत आणि अनेक जण कसल्यातरी जबरदस्त मानसिक धक्क्याने वेड लागल्यासारखं करताहेत.
 
‘कारस्थान सिद्धान्त’वाल्यांचं मत असं की, अमेरिकन नौदल किंवा ‘सी. आय. ए.’ किंवा युद्धखातं, अख्खी युद्धनौका अदृश्य करता येईल का, अशा प्रकारचे उच्च दर्जाचे वैज्ञानिक प्रयोग करत होतं. युद्धनौका अदृश्य झाली, कालदृष्ट्यासुद्धा ती ‘टेलिपोर्ट’ झाली. म्हणजे त्याच काळात ती लांब अंतरावरच्या दुसर्या ठिकाणी दृश्य झाली. मात्र, परत येताना ती, पृथ्वीवर आज ज्या चार मिती-डायमेंशन्स आहेत. लांबी, रुंदी, उंची आणि काळ यांच्या पलीकडच्या पाचव्या डायमेंशनमध्ये गेली. तिथून परत येताना तिच्यावरचे काही लोक त्याच पाचव्या मितीत राहिले, काही जहाजाला चिकटून परतले आणि काही त्या अतर्क्य, अमानवी अनुभवामुळे वेडे झाले.
 
प्रचलित विज्ञानाच्या कोणत्याही कसोटीवर यांपैकी कोणतीही गोष्ट हडसून खडसून सिद्ध होऊ शकलेली नाही. त्यामुळे कोणतंही सरकारी खातं वा वैज्ञानिक संस्था या प्रकाराला मान्यता देत नाही. पण, सर्वसामान्य अमेरिकन समाजात मात्र ही कथा ‘फिलाडेल्फिया एक्सपेरिमेंट’ म्हणून प्रसिद्ध आहे. त्यावर याच नावाने पुस्तकं, चित्रपट आणि दूरदर्शन मालिकादेखील निघाल्या आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@