तामिळनाडूमध्ये ‘मिनी व्हॅटिकन’ निर्मिण्याचे प्रयत्न?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Feb-2021   
Total Views |

Jesus _1  H x W
 
 
प्राप्तिकर आणि अंमलबजावणी संचालनालयाने तामिळनाडू आणि केरळमध्ये ‘कारुण्य’ गटावर आणि ‘जिझस कॉल्स’ या गटांवर मोठ्या प्रमाणात छापे टाकल्यानंतर त्यांच्याकडून किती प्रचंड प्रमाणात धर्मप्रसाराचे कार्य केले जात असल्याची माहिती पुढे आली आहे.
हिंदूंचे सक्तीने धर्मांतर रोखण्यासाठी कठोर कायदे करण्यात आले असले, तरी ख्रिस्ती धर्मप्रसारकांकडून धर्मांतर करण्याचे प्रयत्न देशाच्या विविध भागांमध्ये सुरू आहेत. विविध ख्रिस्ती संस्थांना प्रचंड प्रमाणात विदेशी मदत मिळत असून त्याद्वारे प्रलोभने दाखवून धर्मांतराचे कार्य केले जात आहे. अलीकडेच, धर्मांतराचे कार्य करणाऱ्या तामिळनाडूमधील दोन संस्थांच्या विविध ठिकाणच्या २८ कार्यालयांवर प्राप्तिकर खाते आणि अंमलबजावणी संचालनालयातर्फे छापे टाकण्यात आले. काही ठोस माहिती हाती आल्याने ‘जिझस कॉल्स’ आणि ‘कारुण्य’ या संस्थांच्या विविध कार्यालयांवर हे छापे टाकण्यात आले. अनधिकृत वृत्तानुसार, या छाप्यांमध्ये कोट्यवधी रुपयांचे भारतीय चलन आणि कित्येक किलो सोने जप्त करण्यात आले. ‘कारुण्य’ या संस्थेच्या विविध शैक्षणिक संस्था आहेत. पॉल दिनकरन हा ख्रिस्ती धर्मप्रसारक या सर्व संस्था चालवितो. १९९०च्या दशकापासून ‘कारुण्य’तर्फे ‘कारुण्य विद्यापीठ’ चालविले जाते. धर्मप्रसारावर लक्ष केंद्रित केलेल्या या ‘कारुण्य’कडून कोइंबतूरजवळील नेल्लुरवायल खेड्यामध्ये ‘मिनी व्हॅटिकन’ उभारण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे वृत्त ‘दिनमालार’ या तामिळी दैनिकात प्रसिद्ध झाले आहे. कोइंबतूरचे प्रसिद्ध वकील रंगराज यांनी हा आरोप केला आहे. ख्रिस्ती धर्मप्रसारक भारताच्या विविध भागामध्ये आपले हातपाय कसे पसरत आहेत, त्याची कल्पना यावरून यावी.
 
 
प्राप्तिकर आणि अंमलबजावणी संचालनालयाने छापे घातल्यानंतर जी काही माहिती पुढे आली ती धक्कादायक आहे. ‘कारुण्य’ गटास परदेशांतून प्रचंड प्रमाणात पैसा प्राप्त होतो. या गटास कॅनडामधून जो पैसा मिळाला त्यातील बराच पैसा शेतकरी आंदोलनाकडे वळविण्यात आल्याची चर्चा आहे. ‘कारुण्य विद्यापीठा’कडून त्या भागातील वनवासी बांधवांना हुसकावून लावण्याचे प्रयत्नही होताना दिसतात. ज्या नेल्लुरवायल खेड्यामध्ये ‘कारुण्य विद्यापीठ’ कार्यरत आहे, त्या खेड्याचे सर्व सरकारी नोंदींमध्ये नेल्लुरवायल असे नाव आहे. असे असताना त्या भागातील पोलीस ठाणे, टपाल कार्यालय यांना ‘कारुण्य नगर’ असे नाव देण्यात आले आहे. या नामांतरास ग्रामस्थांचा विरोध असतानाही त्यांच्यावर हे नामांतर लादले गेले आहे. या खेड्याचे ‘मिनी व्हॅटिकन’मध्ये परिवर्तन कारण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू असल्याचा आरोप रंगराज यांनी केला आहे. ‘कारुण्य’ गटाकडून अशिक्षित ग्रामस्थांची फसवणूक करण्याचे प्रकारही त्या भागात सुरू आहेत. विविध चमत्कारांमुळे दृष्टिहिनांना दिसू लागले, पंगू चालू लागले, मुके बोलू लागले, असा खोटा प्रचार करून ग्रामस्थांचे धर्मांतर करण्याचे प्रकारही त्या भागात सुरू आहेत. जाहिराती करून जनतेला भुलविण्याचे प्रकार घडत आहेत. अशा घटनांसंदर्भात स्थानिक न्यायालयामध्ये खटला गुदरण्यात आला असून, पॉल दिनकरन आणि अन्य काहींना नोटिसा बजाविण्यात आल्या असल्याची माहिती रंगराज यांनी दिली आहे.
 
 
प्राप्तिकर आणि अंमलबजावणी संचालनालयाने पॉल दिनकरन आणि त्याच्या ‘जिझस कॉल्स’च्या चेन्नई, त्रिची, कोइंबतूर, मदुराई येथील आणि केरळमधील विविध कार्यालये आणि निवासस्थाने अशा २८ ठिकाणी जे छापे टाकले त्यातून या गटाकडून कित्येक कोटी रुपयांचा कर चुकविला जात असल्याचे आढळून आले. या छाप्यामध्ये पाच किलो सोने आणि बेहिशोबी ११८ कोटी रुपये तपास यंत्रणांच्या हाती लागल्याची माहिती आहे. ‘जिझस कॉल्स’ नावाची जागतिक ख्रिस्ती मिनिस्ट्री असून त्याची निर्मिती दिवंगत डीजीएस दिनकरन यांनी केली आहे. तर ‘जिझस कॉल्स’ या गटाची मालकी धर्मप्रसारक आणि उद्योजक पॉल दिनकरन यांच्याकडे आहे.
 
 
अंमलबजावणी संचालनालयाकडून अशा ख्रिस्ती संस्थांवर जे छापे टाकण्यात आले, त्यातून पांढऱ्या झग्याखाली चालणारे काळे कारनामे प्रकाशात येऊ लागले आहेत. गेल्या नोव्हेंबर महिन्यात अंमलबजावणी संचालनालयाने केरळमध्ये मुख्यालय असलेल्या आर्चबिशप की. पी. योहानन यांच्याशी संबंधित संस्थेच्या इमारतींवर छापे टाकले असता, त्यामध्ये संबंधित चर्चकडून विविध ट्रस्टना जी बेहिशोबी रक्कम देण्यात आली होती, त्याची माहिती उघड झाली. या चर्चकडून २०१५-१६ या आर्थिक वर्षामध्ये २ हजार ३६७ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती हाती आली. मोदी सरकारने ख्रिस्ती धर्मप्रसारकांकडून चालविण्यात येणाऱ्या लाखो ‘एनजीओ’ बंद केल्याने त्यांना जो पैशाचा ओघ परदेशातून प्राप्त होता तो बंद झाला! अशा ‘एनजीओं’वर प्राप्तिकर आणि अंमलबजावणी संचालनालयाकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. ज्या ‘एनजीओ’ चालविण्यात येत होत्या त्यांच्याकडून ‘सुधारित नागरिकत्व कायद्या’स विरोध करण्यासाठी आंदोलने, कुडनकुलम अणु प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आंदोलने, अशी आणि अन्य प्रकारची आंदोलने चालविली जात होती. हे सर्व केले जात होते परदेशांमधून मिळणाऱ्या पैशाच्या जोरावर! मोदी सरकारने अशा संस्थांना जो पैसा मिळत होता त्यावरच घाला घातला!
 
 
अमेरिकेमध्ये या पॉल दिनकरन याच्या कुटुंबीयांच्या मालकीची दोन खासगी विमाने, एक आलिशान नौका, दहा बंगले आहेत. पण, या व्यक्तीविरुद्ध कोणी आवाज उठवताना दिसत नाही. हिंदू देवस्थानांवर, मठांवर काही कारवाई झाली की, माध्यमांकडून त्याबाबत २४ तास डांगोरा पिटला जातो. पण, ख्रिस्ती धर्मप्रसाराचे काम करणाऱ्या पॉल दिनकरन याच्यासारख्या व्यक्तीकडून वा त्या व्यक्तीकडून चालविल्या जाणाऱ्या संस्थेकडून जी कृष्णकृत्ये केली जातात, त्याबद्दल माध्यमे गप्प का बसतात, असा प्रश्न जागरूक नागरिकांकडून विचारला जात आहे.
 
 
देशाच्या विविध भागांमध्ये ख्रिस्ती धर्मप्रसारकांकडून धर्मांतराचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. प्राप्तिकर आणि अंमलबजावणी संचालनालयाने तामिळनाडू आणि केरळमध्ये ‘कारुण्य’ गटावर आणि ‘जिझस कॉल्स’ या गटांवर मोठ्या प्रमाणात छापे टाकल्यानंतर त्यांच्याकडून किती प्रचंड प्रमाणात धर्मप्रसाराचे कार्य केले जात असल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच अशा संस्थांकडून विविध सरकारविरोधी आंदोलनांना पैशाचा पुरवठा केला जात असल्याचेही उघड झाले आहे. अशा देशविरोधी संस्था देशाच्या भागात मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. वनवासी क्षेत्रात चमत्काराचे खोटेनाटे दाखले देऊन गरीब वनवासी बांधवांचे धर्मांतर करण्याचे प्रयत्न होत आहेत. हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी संपूर्ण हिंदू समाजाने संघटितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. देशाच्या अनेक भागात ‘कारुण्य’सारखी ‘मिनी व्हॅटिकन’ उभी राहिलेली आहेत. जागृत हिंदू समाजाच अशा ‘मिनी व्हॅटिकन’ना पायबंद घालू शकतो!
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@