नंदुरबारमध्ये आईपासून दुरावलेली बिबट्याची पिल्ले झाली मुंबईकर

    09-Dec-2021
Total Views |
leopard cubs_1  


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
नंदुरबारहून बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'त बिबट्याची दोन पिल्ल (Leopard cubs) दाखल झाली आहेत. आईपासून ही पिल्लं (Leopard cubs) विभक्त झाल्यामुळे त्यांची रवानगी राष्ट्रीय उद्यानात करण्यात आली आहे. यापुढे ही पिल्ले (Leopard cubs) राष्ट्रीय उद्यानातील 'बिबट निवारा केंद्रा'त राहतील.
 
 
 
 
नंदुरबारमध्ये तळोदा वनपरिक्षेत्रामधील उसाच्या शेतीच्या कापणीवेळी ऊस तोडणी कामगारांना बिबट्याची तीन पिल्लं (Leopard cubs) मिळाली होती. ही पिल्लं वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचा ताब्यात देण्यात आली. या पिल्लांची त्यांच्या आईसोबत पुनर्भेट घडवून आणण्याच्या दृष्टीने वन विभागाने प्रयत्न केले. त्यासाठी ही तीन पिल्ले (Leopard cubs) ज्याठिकाणी सापडली, तिथेच रात्री त्यांना ठेवून मादी बिबट्या येण्याची वाट पाहण्यात आली. परंतु, या तीन पिल्लांपैकी आई केवळ एक पिल्लू घेऊन गेली. वनकर्मचाऱ्यांनी पुढील दोन दिवस उरलेल्या दोन पिल्लांसाठी (Leopard cubs) पुनर्भेटीचा प्रयत्न करुनही आई त्याठिकाणी फिरकली नाही. सरतेशेवटी या दोन पिल्लांना (Leopard cubs) पुढील देखभालीसाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाठवण्यात आले.
 
 
 
 
शनिवारी ही पिल्ले (Leopard cubs) राष्ट्रीय उद्यानात दाखल झाली. दाखल करतेवेळी ही पिल्ले अशक्त होती. नंदुरबारमध्ये त्यांना बकरीचे दूध पाजले गेल्याने त्यांच्या पोटात बिघाड झाला होता. अशा अवस्थेत ही पिल्ल राष्ट्रीय उद्यानात आणल्यानंतर त्यांना प्राण्यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी बिबट्या बचाव पथकाचे सदस्य या पिल्लांची शुश्रूषा करत आहे. यातील एक पिल्लू नर आणि दुसरे पिल्लू मादी आहे. सध्या पिल्लांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या वजनातही वाढ झाली आहे. काही कालावधीनंतर ही पिल्लांना (Leopard cubs) राष्ट्रीय उद्यानातील 'बिबट निवारा केंद्रा'त कायमस्वरुपी पाठविण्यात येईल.