मुंबई (अक्षय मांडवकर) - पक्षी स्थलांतराच्या अभ्यासाकरिता चीनमध्ये रिंग केेलेला 'कर्ल्यू सॅण्डपायपर' (बाकचोच तुतारी) (curlew sandpiper) पक्षी नवी मुंबईच्या पाणथळ क्षेत्रात आढळून आला आहे. 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'च्या (बीएनएचएस) संशोधकांच्या निदर्शनास हा पक्षी आला आहे. या स्थलांतरामुळे हिवाळ्यात स्थलांतरित होणाऱ्या पक्ष्यांसाठी अतिक्रमणाच्या गर्तेत सापडलेले मुंबई आणि नव्या मुंबईचे पाणथळ क्षेत्र महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित झाले आहे. (curlew sandpiper)
पक्षी स्थलांतराच्या एकूण आठ आकाशमार्गांपैकी 'सेंट्रल एशियन फ्लायवे' या आकाशमार्गामध्ये भारताचा समावेश होतो. या आकाशमार्गावरून उत्तर आशियातील बहुतांश पक्षी हिवाळ्यात भारतात स्थलांतर करतात. 'बीएनएचएस'कडून या स्थलांतराचा शास्त्रीय अभ्यास गेल्या सहा ते सात दशकांपासून सुरू आहे. हा अभ्यास वेगवेगळ्या पद्धतीद्वारे केला जातो. 'रिंग' आणि 'कलर फ्लॅग' ही त्यामधील सर्वसामान्यपणे वापरली जाणारी पद्धत आहे. ही पद्धत जगभर वापरली जाते. यामध्ये पक्ष्याच्या पायाला सांकेतिक क्रमांक असलेली ‘रिंग’ आणि विशिष्ट रंगाचा ‘फ्लॅग’ लावण्यात येतो. या 'फ्लॅग'चा रंग हा प्रत्येक देशानुसार वेगवेगळा असतो आणि आंतरराष्ट्रीय करारानुसार संशोधकांना रंगाचा हा नियम पाळूनच पक्ष्यांच्या पायात 'फ्लॅग' लावावा लागतो. आतापर्यंत 'बीएनएचएस'च्या टीमने गेल्या तीन वर्षांमध्ये १० हजाराहून अधिक पक्ष्यांना 'रिंग' केले आहे. अशा पद्धतीने चीनमध्ये 'रिंग' आणि 'फ्लॅग' लावलेला पक्षी नवी मुंबईच्या पाणथळीवर आढळून आला आहे.
'बीएनएचएस'चे संशोधक मृगांक प्रभू हे १९ नोव्हेंबर रोजी आपल्या टीमसमेवत वाशीच्या पाणथळीवर पक्ष्यांना 'रिंग' लावण्याचे काम करत असताना त्यांना एक 'बाकचोच तुतारी' (curlew sandpiper) पक्षी सापडला. या पक्ष्याच्या पायाला एक रिंग आणि दुसऱ्या पायाला पिवळा - निळ्या रंगाचा 'फ्लॅग' लावलेला होता. त्या रिंगवर 'A05' हा क्रमांक नोंदवला गेला होता. 'बीएनएचएस'कडून जेव्हा यासंबंधीची माहिती जाणून घेण्यात आली, तेव्हा हा पक्षी चीनच्या बोहाय खाडीतील हेबेई प्रांतातील तांगशान मिठागरांमध्ये 'रिंग' केल्याचे समोर आले. 'बिजिंग नॉर्मल युनिव्हर्सिटी'च्या 'कॉलेज ऑफ लाईफ सायन्सेस'चे संशोधक व्हीपन लेई यांनी २७ मे, २०१५ रोजी या पक्ष्याला रिंग लावल्याची माहिती मिळाली. परदेशी भूमीवर टॅग केलेला एखादा पक्षी मुंबईच्या किनारपट्टीवर पुराव्यानिशी सापडल्याची ही पहिलीच वेळ आहे.
'बाकचोच तुतारी' (curlew sandpiper) प्रजातीच्या स्थलांतराचे स्वरूप समजून घेण्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा रेकॉर्ड आहे. ठाणे खाडी परिसरातील पाणथळ क्षेत्र आणि मिठागरे ही या स्थलांतरित पक्ष्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अधिवास आहेत. या नोंदीमुळे या अधिवासांचे महत्त्व वाढले आहे. - डॉ. राहुल खोत, साहाय्यक संचालक, बीएनएचएस
'बाकचोच तुतारी'विषयी
बाकचोच तुतारी (curlew sandpiper) हा लहान आकाराचा पक्षी असून तो उत्तर गोलार्धातील सायबेरिया आणि आर्क्टिक टुंड्रा प्रदेशात प्रजनन करतो. हा पक्षी 'इस्ट एशियन ऑस्ट्रेलियन फ्लायवे'चा प्रवासी आहे. परंतु, त्यातील काही पक्षी 'सेंट्रल एशियन फ्लायवे'चा देखील वापर करतात.