मुंबई : गेली अनेक वर्ष मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत राज करणारे अभिनेते नाना पाटेकर यांना गदिमा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दरवर्षी गदिमा प्रतिष्ठानच्यावतीने हा पुरस्कार देण्यात येतो. तर, छोट्या तसेच मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाने ठसा उमटवणाऱ्या निवेदिता जोशी सराफ यांना गृहिणी सखी सचिव पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रतिष्ठानचे कार्यक्रारी विश्वस्त आनंद माडगूळकर यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची घोषणा केली.
गेली काही वर्ष अभिनेते नाना पाटेकर हे अभिनयासोबतच नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून राज्यातील दुष्काळग्रस्त गावांना मदत करतात. त्यांनी आतापर्यंत अनेक दुष्काळग्रस्त गावे दत्तक घेतली. अभिनयासोबतच समाजकार्यातदेखील त्यांचे मोठे कार्य आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचा प्रतिष्ठित गदिमा पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे. तसेच, ज्येष्ठ संगीतकार कौशल इनामदार यांना गदिमा चैत्रबन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
गायिका रश्मी मोघे यांना स्व. विद्या माडगूळकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा विद्या प्रज्ञा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. १४ डिसेंबरला यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे संध्याकाळी ५ वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.