‘युरो-अटलांटिक’ ते ‘इंडो-पॅसिफिक’: नकाशा पाहा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

mapp 2_1  H x W
 


प्रसिद्ध इंग्रज लेखक जॉर्ज ऑर्वेल म्हणतो, “ज्या गोष्टी अगदी आपल्या नाकासमोर असतात, त्या पाहण्यासाठीसुद्धा (म्हणजे समजून घेण्यासाठी) आपल्याला सतत धडपड करावी लागते.” म्हणजे काय?अलीकडेच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचा उल्लेख, ‘तो तिकडचा खालचा माणूस’ असा केला म्हणजे काय?



इसवी सन १५० या वर्षी क्लॉडियस टॉलेमी या ग्रीक भूगोलतज्ज्ञाने बनवलेला जगाचा नकाशा हा पाश्चिमात्य तज्ज्ञांच्या मते, जगाचा सर्वात प्राचीन उपलब्ध नकाशा आहे. या नकाशात टॉलेमीने ऑस्ट्रेलियाला नाव दिलंय, ‘टेरा ऑस्ट्रेलिस इनकॉग्निटा.’ याचं शब्दश: भाषांतर होईल, ‘भूमी दक्षिणेकडची अज्ञात.’ म्हणजे काय?हल्ली वारंवार सगळे राजकीय विश्लेषक असं लिहीत असतात की, जागतिक राजकारणाचा केंद्रबिंदू आता युरो-अटलांटिक हा राहिलेला नसून तो आता ‘इंडो-पॅसिफिक’ हा झाला आहे. म्हणजे काय?प्रिय वाचक, या ‘विश्वसंचार’ सदरातल्या लेखांमधून मी वरचे वर तुम्हाला असं आवाहन करीत असतो की, हा लेख वाचत असताना जगाचा एक चांगलासा नकाशा, अ‍ॅटलास सोबत घ्या. लेखात वर्णन केलेली राष्ट्रं, देश, भूप्रदेश, राज्यं, प्रांत हे त्या नकाशात लगेच पाहा. तुमची त्या विषयाची एकंदर समजूत वाढत जाईल, वाढत राहील आणि तुमचं ज्ञानभांडार समृद्ध होईल, तुमचं व्यक्तिमत्त्व समृद्ध होईल. हे फक्त परदेशातल्या बातम्यांपुरतंच मर्यादित नाही. प्रभू रामचंद्र अयोध्येहून वनवासासाठी निघाले आणि पायी चालत दंडकारण्यात आले. तिथून पुढे ते लंकेत गेले. हा सगळे भूप्रदेश नकाशात पाहा म्हणजे रामायणातलं राजकारणही आपल्याला समजेल. राम वनवासाकरिता दक्षिणेतच का उतरले?




 
अयोध्येच्या उत्तरेला हिमालयात कित्येक रम्य वनं होती. कृष्णाने मथुरेत कंसाला ठार करून राज्यक्रांती घडवली, पण जरासंधाच्या सततच्या स्वार्‍यांमुळे त्याने मथुरेचा त्याग करून थेट पश्चिमेकडे समुद्रकाठी द्वारका ही नवी नगरी निर्माण केली. आजच्या उत्तर प्रदेश राज्यातली मथुरा, आजच्या बिहारमधली राजगीर ही जरासंधाची राजधानी आणि आजच्या गुजरातमधील द्वारका ही नकाशात पाहिलीत, तर महाभारतकालीन राजकारणाचा भव्य पट तुमच्यासमोर उभा राहील. एक वेगळा आनंद त्यातून मिळेल. पण, या तर झाल्या पाच नि दहा हजार वर्षांपूर्वीच्या गोष्टी. अगदी आत्ता ३०० वर्षांपूर्वी शिवरायांनी आपली राजधानी पुणे जिल्ह्यातल्या राजगडावरून तत्कालीन उत्तर कोकण जिल्ह्यातल्या रायगडावर नेली. शिवरायांनी असा निर्णय का घेतला, यांचं उत्तर नकाशा पाहिलात, तर पटकन समजेल आणि कायमचं उमजेल.अगदी हाच मुद्दा आता टीम मार्शल हा पत्रकार मांडतोय. टीम मार्शल ‘बीबीसी’, ‘स्काय न्यूज’ वगैरे प्रख्यात वृत्तवाहिन्यांचा माजी वार्ताहर आहे. गेली किमान तीन दशकं तो या वाहिन्यांसाठी विदेशी वार्तांचं वृत्तांकन करीत होता. त्याने ‘दि पॉवर ऑफ जिओग्राफी’ नावाचं पुस्तकच लिहून वर्तमान राजकारणात, इतिहासात भूगोलविज्ञान किती महत्त्वाचं असतं, हा विषय पुढे आणला आहे.




 
गेली काही शतकं कोणतीही नवी (किंवा जुनीसुद्धा) गोष्ट पश्चिमेने स्वीकारल्याशिवाय तिच्यावर जगत्मान्यतेचं शिक्कामोर्तब होत नाही. काय म्हणता, संत ज्ञानेश्वर ७०० वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरीत लिहितात की, पृथ्वी गोल असून ती सूर्याभोवती फिरते म्हणून? हॅ:! ज्ञानेश्वर असतील संत-बिंत! पण, ते भारतीय, काळे नि हिंदू होते. हां गॅलिलिओ म्हणतोय ना की, पृथ्वी गोल आहे? मग ते नक्कीच खरं असलं पाहिजे. कारण, तो पाश्चिमात्त्य, गोरा नि ख्रिश्चन होता.हा परधार्जिणेपणा इतका टोकाला गेला होता की, भारतभ्रमण करणार्‍या स्वामी विवेकानंदांना बडोद्याचे विद्वान शंकर बाळाजी पंडित यांनी सांगितलं की, “स्वामीजी, तुमचं म्हणणं पाश्चिमात्त्य जगासमोर मांडा. पश्चिमेने एकदा तुम्हाला मान्यता दिली की, भारतासह सगळं जग तुमच्यासमोर मान तुकवेल” आणि खरोखर तसंच घडलं.”
 


असो, तर आपण पुन्हा जॉर्ज ऑर्वेलकडे येऊ. नाकासमोर असणार्‍या गोष्टीसुद्धा आपण नीट समजून घेत नाही. कारण, आपण त्या नीट पाहतच नाही, असं ऑर्वेलला म्हणायचं आहे. मुंबईहून पुण्याला जाण्यास आपण सकाळची गाडी पकडली, तर प्रथम सूर्य उजवीकडे असतो, पण कल्याणच्या पुढे तो डावीकडे येतो. असं का होतं? नकाशा पाहा म्हणजे समजेल. पुणे हे मुंबईच्या आग्नेयेला येतं, पण, मुंबईच्या आग्नेयेला तर म्हणून मुंबईतून उत्तरेकडे जात पहिल्यांदा ठाणे गाठायचं. मग ‘यूटर्न’ मारून दक्षिणेकडे जायचं. हे नकाशा पाहिल्याशिवाय कळणार नाही.


 


 
जो बायडन ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांना, ‘तिकडचा खालचा माणूस’ का म्हणाले? आणि टॉलेमी ऑस्ट्रेलियाला ‘दक्षिणेकडची अज्ञात भूमी’ का म्हणतो? हे जगाचा नकाशा पाहिलात की, एका क्षणात समजेल.तीच गोष्ट ‘युरो-अटलांटिक’ आणि ‘इंडो-पॅसिफिक’ या संकल्पनांची आहे. गंमत म्हणजे, ‘टीम मार्शल’ हा ब्रिटिश पत्रकारच आपल्याला हे सांगतोय. आपण कोणताही जगाचा नकाशा पाहा. आपल्याला मध्यभागी युरोप खंडच दिसेल. त्याच्या एका बाजूला आशिया, एका बाजूला अमेरिका, खालच्या बाजूला आफ्रिका आणि अगदी खाली ऑस्ट्रेलिया, अशीच मांडणी केलेली दिसेल. का बरं? मध्यभागी आशिया किंवा आफ्रिका का नाही? अमेरिका किंवा ऑस्ट्रेलिया का नाही? युरोपलाच का मध्यवर्ती बिंदू धरलेलं आहे? युरोपलाच काय मोठं सोनं लागलंय? होय, युरोपला सोनं लागलंय! कारण, आज जगभर प्रचलित असलेला जगाचा नकाशा गेरार्डस मर्केटर या युरोपिय भूगोलवेत्त्याने सन १५६९ साली बनवलेला आहे. या कालखंडात युरोपिय दर्यावर्दी हे मुख्यत: त्यांच्या खंडाला वेढून असलेल्या अटलांटिक महासागरात संचार करीत होते. अटलांटिकमधून हिंदी आणि पॅसिफिक महासागरांकडे जाणारे सागरी मार्ग शोधत होते. हे करण्यामागे त्यांचे तीन उद्देश होते. व्यापारवृद्धी, साम्राज्यवादी आणि ख्रिश्चन धर्माचा प्रसार. गेली किमान पाच शतकं युरोपिय गोर्‍या ख्रिश्चनांचं हे ‘युरो-अटलांटिक-सेंट्रिक’ राजकारण सुरू आहे. हे समजण्यासाठी ब्रिटन, फ्रान्स, हॉलंड, स्पेन, पोर्तुगालही दर्यावर्दी राष्ट्र अटलांटिक महासागर, त्याच्या पल्याडची अमेरिका, युरोपच्या दक्षिणेकडचा भूमध्य सागर, त्याच्या दक्षिणेकडची आफ्रिका आणि पूर्वेकडचा मध्य आशिया हा सगळा प्रदेश नकाशात पाहा. नीट समजून घेतलंत तर नुसता नकाशा पाहून, ख्रिश्चॅनिटीच्या उगमापासून म्हणजे गेल्या किमान दोन हजार वर्षांपासूनच्या अनेक ऐतिहासिक घटनांचे धागेदोरे तुम्हाला आकलन होतील, हा बौद्धिक आनंदही बौद्धिक समृद्धी तुमच्या एकट्याची असेल.





 
आता मुद्दा आला, ‘इंडो-पॅसिफिक सेंट्रिक’ राजकारणाचा. ‘टीम मार्शल’ म्हणतोय, आजचं जग ‘युरो-अटलांटिक’ नव्हे, तर ‘इंडो-पॅसिफिक’ बनलंय. कारण, नवा जागतिक संघर्ष प्रदेश आता आशिया खंड आणि त्याच्या भोवतीचा हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागर असणार आहे. या संघर्षातले मुख्य भिडू आहेत अमेरिका, चीन आणि उत्तर कोरिया. बाकीचे भिडू आहेत रशिया, जपान, तैवान, ऑस्ट्रेलिया, भारत आणि आखाती देश. म्हणजेच ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन, पोर्तुगाल, हॉलंड हे युरोपिय प्रगत देश यात नाहीत. प्रगत आणि अण्वस्त्रसज्ज असूनही नाहीत. का नाहीत? पॅसिफिक या विशाल महासागराचा नकाशा पाहा. रशिया, चीन, जपान, तैवान, दोन्ही कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका हे सगळे नव्या दमाचे गडी पॅसिफिकवरच बसलेत. २०१४ नंतर नव्या दमाने उभा राहणारा भारत, तेलसंपन्न आखाती देश आणि त्यांच्या रिंगणात पाकिस्तानच्या ग्वादर बंदरामार्फत उतरू पाहणारा चीन यांचा हिंदी महासागरातला आखाडा समजून घ्यायचा असेल, तर नकाशा पाहा.
 
 
 

अमेरिकेच्या दूरदृष्टीचं कौतुक पाहायचं असेल, तर त्या हिंदी महासागर क्षेत्रातली अमेरिकेने नाविकतळ उभारलेली ‘दिएगो गार्सिया’ ही बेटं पाहा. भारताच्या दक्षिण टोकाच्याही बर्‍याच खाली दक्षिणेला असलेली ही बेटं ब्रिटनकडून भाडेपट्ट्यावर घेऊन अमेरिकेने तिथे एक जबरदस्त नाविक अड्डा उभारलेला आहे. ‘दिएगो गार्सिया’वरून एकाच वेळी संपूर्ण हिंदी महासागर क्षेत्र पूर्व पॅसिफिक क्षेत्र आणि अंटार्क्टिका एवढा विस्तृत प्रदेश अमेरिकन युद्धनौकेच्या पट्ट्यात येतो. अमेरिकन नाविक सेनापती आणि विचारवंत रिअर अ‍ॅडमिरल आल्फ्रेड साहेब यांच्या सागरी डावपेचांचं खरं मर्म ‘दिएगो गार्सिया’चे स्थान नकाशात पाहा, तरच लक्षात येईल. तात्पर्य, नकाशा पाहण्याची चांगली सवय आत्मसात करा!











 
@@AUTHORINFO_V1@@