मंदिर आहे, मंदिरच राहणार!

मुंबईत हे खपवून घेतले जाणार नाही; आ. मंगलप्रभात लोढांनी शिवसेनेला खडसावले

Total Views |



mp lodha prabhadevi_1




मुंबई, दि. २९ (प्रतिनिधी):
“मंदिर आहे मंदिरच राहणार. मुंबईत हे खपवून घेतले जाणार नाही,” अशा शब्दांत मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांनी शिवसेनेला बुधवार, दि. २९ डिसेंबर रोजी खडसावले.


३०० वर्षे जुन्या प्रभादेवी मंदिरासमोर अनधिकृत ख्रिस्ती स्मृतिस्तंभ उभारण्याचा घाट महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांकडून घालण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर मंगलप्रभात लोढा यांनी बुधवारी कार्यकर्त्यांसह प्रभादेवी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी आ. लोढा यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी संवादही साधला.



यावेळी ते म्हणाले की, “नागरिकांना सर्व काही कळते. त्यामुळे येथील नागरिक हिमतीने याविरोधात एकत्र आले. पोलिसांनी या नागरिकांवर आणि कार्यकर्त्यांवर अत्याचार केले. काल मी व्हिडीओ पहिला त्यात पोलीस एखाद्या आरोपीला पकडून नेतात. त्यापद्धतीने कारवाई करण्यात आली. कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करत पोलिसांच्या गाडीमध्ये चढविण्यात आले. पोलिसांच्या चेहर्‍यावर जो राग दिसत होता, तो पाहता त्यांनी खूप मोठे काही काम केल्याचा भाव त्यांच्या चेहर्‍यावर होता. वरिष्ठांना खूश करण्यासाठीचा त्यांचा हा प्रयत्न असावा. मात्र, हे मुंबईत खपवून घेतले जाणार नाही. मंदिर आहे मंदिरच राहणार. ज्यांना अशा पद्धतीने काही करायचे आहे, त्यांनी इतर ठिकाणी जाऊन करावे. मंदिर परिसरात असे कोणतेही काम करू नये, ज्यातून सामाजिक तेढ निर्माण होऊन वातावरण अशांत होईल.”


ते पुढे म्हणाले की, “शहरातील काही भागांत थेट धर्मांतरण होते, तर काही भागात हळूहळू ही प्रक्रिया सुरु केली जाते. इथे जो प्रकार घडला तो हळूहळू धर्मांतराच्या दिशेने जाणारा होता. मात्र, त्याभागातील स्थानिक नागरिक, विश्व हिंदू परिषदेचे, बजरंग दलाचे आणि भाजपचे सर्व कार्यकर्ते जागरूक होते. वेळेत ही बाब त्यांच्या लक्षात आली. बाजूलाच एक नवीन इमारत झाली आहे. त्याभागात सुरुवातीला हा स्मृतिस्तंभ होता. मुंबईतही अनेक भागांत स्मृतिस्तंभ आहेत. मात्र, कुठेही चर्चच्या नावाचा उल्लेख असणारा स्तंभ नाही. इथे आजूबाजूला कोणतेही चर्च नाही. मग येथे हा स्तंभ कसा उभारला गेला? कोण तुष्टीकरणाचा प्रयत्न करत आहे आणि काय राजकारण यामागे दडले आहे, हे माहीत नाही. मात्र कार्यकर्त्यांना आक्रोश पाहून स्मृतिस्तंभ उभारणार्‍यांना त्यांची चूक लक्षात आली. आता हा स्तंभ हटवण्यात आला आहे. मात्र जर पुन्हा हे प्रयत्न झाले तर कार्यकर्ते हे होऊन देणार नाहीत,” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.


गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहमदनगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूटमधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयातून पदव्युत्तर शिक्षण. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर कार्यरत.