कोलकाता निवडणुका : लोकशाहीचा महोत्सव की लोकशाहीची थट्टा?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2021   
Total Views |

kolkatta_1  H x
 
 
कोलकाता महानगरपालिकेच्या मतदानाच्यावेळी हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या. त्या लक्षात घेऊन, ममता सरकारने काय कारवाई केली ते कोठे प्रकाशात आल्याचे दिसून आले नाही.
 
 
गेल्या रविवार म्हणजेच दि. १९ डिसेंबर रोजी कोलकाता महापालिकेच्या निवडणुकांसाठी मतदान झाले. पण, या मतदानाच्या वेळी अनेक गैरप्रकार झाले. गावठी बॉम्बचे स्फोट, विरोधी उमेदवारांना वा कार्यकर्त्यांना धमक्या, दमबाजी असले प्रकार या निवडणुकीच्या दरम्यान घडले. निवडणुकीत झालेले अनेक गैरप्रकार लक्षात घेऊन या महापालिकेसाठी पुन्हा मतदान घेण्यात यावे, अशी मागणी भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी राज्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली. या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी सुवेंदू अधिकारी आणि त्यांच्या समर्थकांनी राज्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलनही केले. कोलकाता महापालिकेच्या निवडणुका म्हणजे ‘लोकशाहीचा उत्सव’ असल्याचे प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणत असल्या, तरी त्यांच्याच राज्यात या निवडणुकांच्या दरम्यान विरोधकांची मुस्कटदाबी करण्यात आली. त्यांचा आवाज दाबण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आला. या निवडणुकांच्या काळात केंद्रीय सुरक्षा दलाचा वापर करण्यास न्यायालयाने प्रतिबंध केला होता. त्यामुळे निवडणुकीच्या काळात गैरप्रकार करण्यास ममता सरकारला, तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांना मोकळे रान मिळाले. कोलकाता महापालिकेच्या सर्व म्हणजे १४४ जागांवर तृणमूल काँग्रेसने उमेदवार उभे केले आहेत, तर भारतीय जनता पक्षाने १४२ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने ९६ जागी, तर काँग्रेस पक्षाने १२१ उमेदवार रिंगणात उतरविले आहेत, असे असले तरी खरी लढत भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातच आहे. गेल्या लोकसभा निवडणुकांपासून प. बंगालमधील भारतीय जनता पक्षाने तृणमूल काँग्रेससमोर मोठे आव्हान उभे केले आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये तर तृणमूल काँग्रेसच्या हातून सत्ता जाते की काय, असे वातावरण भाजपने निर्माण केले होते. पण, ममता बॅनर्जी यांना पुन्हा सत्ता मिळाली. ती सत्ता मिळाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या गावगुंडांनी विरोधकांवर कसा अमानुष सूड उगविला, त्याच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत.
 
कोलकाता महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये ३७८ अपक्ष उमेदवार उभे आहेत. कोलकाता महापालिकेच्या निवडणुकांमध्ये ६३.६३ टक्के मतदान झाले. मतदानाच्या काळात हिंसाचाराच्या घटना घडल्या. त्यासंदर्भात १९५ समाजकंटकांना ताब्यात घेण्यात आले, तर मतदानाच्यावेळी गैरप्रकार झाल्याच्या ४५३ तक्रारी नोंदविण्यात आल्या. निवडणुकीच्या काळातील हिंसाचारात आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचे आढळल्यास २४ तासांच्या आत कडक कारवाई केली जाईल, असा इशारा तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी दिला असला, तरी मतदानाच्यावेळी हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या. त्या लक्षात घेऊन, ममता सरकारने काय कारवाई केली ते कोठे प्रकाशात आल्याचे दिसून आले नाही.
 
राज्य निवडणूक आयोग आणि पोलिसांनी निवडणूक शांततापूर्ण वातावरणात पार पडल्या,असे म्हटले असले तरी भाजपला ते मुळीच मान्य नाही. हिंसाचारग्रस्त वातावरणात पार पडलेल्या या निवडणुका रद्द झाल्या पाहिजेत आणि त्या पुन्हा नव्याने घेतल्या पाहिजेत, अशी मागणी भाजपने केली आहे. कोलकात्याच्या सीलदाह आणि खन्ना भागात दोन ठिकाणी गावठी बाँम्ब फेकण्याचा घटना घडल्या. त्यामध्ये काही नागरिक जखमी झाले. तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांकडून भाजप आणि साम्यवादी कम्युनिस्ट पक्षाच्या बूथ एजंटना रोखण्याचे प्रयत्न झाले. या गैरप्रकारांच्या निषेधार्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने ‘रास्ता रोको’ केला, तर संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने राज्यपाल जगदीश धनकड यांची भेट घेऊन त्यांच्याकडे केली. निवडणुकीत गैरप्रकार होणार, हे गृहित धरूनच केंद्रीय सुरक्षा दलास पाचारण करण्यात यावे, अशी मागणी आम्ही केली होती, असे भाजपने म्हटले आहे. निवडणुकीतील गैरप्रकारांच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यात दोन दिवसांचे आंदोलन करण्याची घोषणा डाव्या आघाडीचे नेते विमन बोस यांनी केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महिलांच्यावरही हात टाकल्याचा आरोप भाजपने केला आहे.
 
महापालिकेच्या या निवडणुकीमध्ये ४,९४९ मतदान केंद्रांपैकी १,१३९ मतदान केंद्रे संवेदनशील असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने म्हटले होते. निवडणुकीसाठी २३,५०० पोलीस तैनात करण्यात आले होते. अनेक भागांमध्ये पोलिसांनी संचलने काढली होती. अशा सर्व वातावरणात कोलकाता महापालिकेची निवडणूक पार पडली. अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये कोलकात्यामधील सर्व म्हणजे १६ जागा तृणमूल काँग्रेसचे जिंकल्या होत्या. आता तृणमूल काँग्रेसला किती जागा मिळतात ते पाहायचे! महानगरपालिकेसाठी जे मतदान झाले, त्याची मतमोजणी आज, मंगळवार दि. २१ डिसेंबर रोजी होत आहे. या निवडणुकांचे निकाल काय लागतात इकडे सर्वांचे लक्ष आहे.
 
योगी आदित्यनाथ विरुद्ध अखिलेश
 
उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने विविध कामांचा जो धडका लावला आहे, त्यामुळे विरोधकांना धडकी भरली आहे, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही. एकीकडे जनतेला धार्मिक सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने काशिविश्वनाथ धामसारखे भव्य प्रकल्प वेळेपूर्वी पूर्ण करून योगी आणि मोदी सरकारने केवळ उत्तर प्रदेशमधील जनतेची मने जिंकली नाहीत,तर जगभरातील हिंदूंची मने जिंकली आहेत, असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही. त्याचबरोबर उत्तर प्रदेशामध्ये अनेक विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. केंद्र सरकारकडून ज्या ४४ योजना राबविल्या जात आहेत, त्यामध्ये उत्तर प्रदेश देशात पहिल्या क्रमांकावर आहे. अन्नधान्य, ऊस, फळे यांचे उत्पादन करण्यामध्ये उत्तर प्रदेशने आघाडी घेतली आहे. उत्तर प्रदेशची अशी घोडदौड सुरू असल्याचे पाहून विरोधक अस्वस्थ झाल्याचे चित्र आहे. काही करून योगी आदित्यनाथ सरकारची बदनामी कशी करता येईल, असा प्रयत्न विरोधी नेते करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘युपी प्लस योगी, बहुत है उपयोगी’ असे योगी आदित्यनाथ यांचे कौतुक करताच समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव खूपच बेचैन झाले. त्यातून योगी आदित्यनाथ यांच्यावर खोटेनाटे आरोप करण्यास त्यांनी प्रारंभ केला आहे. “योगी आदित्यनाथ माझा फोन टॅप करतात आणि रोज संध्याकाळी माझी संभाषणे ऐकतात,” असा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे. अखिलेश यादव हे मागील विधानसभा निवडणुकीत सपशेल आपटलेले नेते. त्यांचे फोन टॅप करण्यापेक्षा योगी आदित्यनाथ यांच्याकडे अन्य कामे भरपूर आहेत. पण, योगी आदित्यनाथ यांची बदनामी केली की,आपली पत वाढेल, असा चुकीचा समज अखिलेश यादव यांनी करून घेतला असावा. आगामी निवडणुकीत होणाऱ्या पराभवापासून वाचण्यासाठी समाजवादी पक्षाच्या नेत्यांचा ‘छळ’ योगी आदित्यनाथ यांच्याकडून भावी काळात केला जाईल, असा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे. अखिलेश यादव यांच्यासारख्या नेत्यांच्या अपप्रचाराला तोंड देण्यासाठी भाजपने ‘जनविश्वास यात्रे’ची मोहीम हाती घेतली आहे. या जनविश्वास यात्रेचा शुभारंभ करताना, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी समाजवादी पक्षावर जोरदार टीका केली. समाजवादी पक्ष म्हणजे भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचार आणि गैरप्रकार असल्याची टीका त्यांनी केली, तर योगी आदित्यनाथ सुशासनातून राज्य प्रगतीपथावर नेत आहेत, असे गौरवोद्गार भाजप अध्यक्षांनी काढले. भाजपच्या जनविश्वास यात्रेस पाच ठिकाणांहून प्रारंभ झाला असून, ही यात्रा राज्यातील ४०० मतदार संघातून जाणार आहे. भाजपची विधासभा निवडणूक पुन्हा जिंकण्याच्या दिशेने तयारी सुरु असताना योगी आदित्यनाथ यांच्याविषयी भ्रम निर्माण करण्याचे उद्योग काही जणांकडून सुरू झाले आहेत. योगी आदित्यनाथ यांना बाजूला सारून प्रचाराची सर्व सूत्रे मोदी यांनी आपल्या ताब्यात घेतली आहेत, असे आरोप करण्यामागे भ्रम निर्माण करण्यापलीकडे अन्य कोणता हेतू असू शकतो? मोदी आणि योगी यांच्यामुळे उत्तर प्रदेश सर्वांगीण प्रगतीकडे वाटचाल करीत असल्याची खात्री जनतेला पटली असल्याने असल्या अपप्रचाराकडे जनता दुर्लक्ष करणार हे स्पष्ट आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@