नवजात अर्भकाला विमाचे सुरक्षा कवच

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Dec-2021   
Total Views |

page 8 _1  H x




महिलांच्या गरोदरपणाचा खर्च समाविष्ट असणार्‍या कित्येक आरोग्य विमा पॉलिसी उपलब्ध आहेतच. पण, मातेबरोबरच नवजात बालकांनाही विमा सुरक्षेचे कवच प्रदान करणार्‍याही काही पॉलिसी बाजारात दिसतात. परंतु, या प्रकारच्या पॉलिसीचे नेमके स्वरुप काय, त्यात कुठले आरोग्यविषयक धोके ‘कव्हर’ होतात, कुठले नाही आणि यासंबंधी अशाच काही प्रश्नांची आजच्या या लेखाच्या माध्यमातून उत्तरे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करुया.
 
 
बदलत्या जीवनशैलीमुळे सध्या मूल जन्माला येताना आरोग्यविषयक अडचणी निर्माण होण्याचे प्रकार बरेच वाढले आहेत. परिणामी, रूग्णालयाचे बिल बरेच फुगते. यातून दिलासा मिळावा म्हणून फारसा परिचित नसलेला असा नवजात अर्भकाचा आरोग्य विमा उतरविणे हादेखील एक चांगला पर्याय ठरू शकतो.
 
 
नवजात बालकाला जंतुसंसर्ग होण्याचे प्रमाण भारतात आजही फार मोठे आहे. नवजात बालकांच्या उपचार पद्धतीवर खासकरुन खासगी रुग्णालयांमध्ये फार मोठे शुल्क आकारले जाते. नेहमीच्या आरोग्य विमा योजनांमध्ये नवजात अर्भकांवर होणारा खर्च देण्याचा ‘क्लॉज’ समाविष्ट नसतो. यासाठीच खास असलेली आरोग्य ‘विमा पॉलिसी’ घ्यावी लागते. पण, यासाठी बर्‍याच सर्वसाधारण विमा कंपन्यांच्या बर्‍याच प्रकारच्या पॉलिसी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यापैकी योग्य पॉलिसी निवडणे, ही पॉलिसी विकत घेणार्‍याची जबाबदारी ठरते.
 
यासाठी म्हणजेच नवजात अर्भकाच्या आजारपणाचे ‘रिस्क’ ‘कव्हर’ होण्यासाठी ‘कॉम्प्रेव्हेन्सिव्ह’ आरोग्य विमा पॉलिसीचे संरक्षण घेतले, तर त्यामुळे त्या नवजात अर्भकावर योग्य उपचार होऊ शकतात. सर्वांच्याच बाबतीत नाही, पण बर्‍याच जणांच्या बाबतीत आयत्यावेळेला पैसा कुठून आणायचा, कसा उभारायचा, हा मोठा प्रश्न निर्माण होतो. नवजात अर्भक जन्मत:च शरीर प्रकृतीने ठिकठाक असावे, असे प्रत्येक जन्मदात्यांना वाटते. पण दुर्दैवाने तसे झाले नाही, तर आरोग्य विमा पॉलिसी फार मोठा आधार ठरू शकते.
 
 
काही विमा पॉलिसीत नवजात अर्भकाच्या उपचार पद्धतीचा खर्च समाविष्ट केलेला असतो. काही पॉलिसींमध्ये तो पर्यायी असतो. जर विमा उतरविण्याचा पर्याय स्वीकारला, तर तो समाविष्ट केला जातो. पॉलिसीत जर या संबंधीचा ‘क्लॉज’ समाविष्ट असेल, तर ‘प्रीमियम’ कमी आकारला जातो. हा ‘क्लॉज’ मुद्दाम समाविष्ट करून घेतला, तर मात्र ‘प्रीमियम’ची रक्कम जास्त आकारली जाते. प्रसुतीसाठी होणारा खर्च बहुतेक पॉलिसींमध्ये समाविष्ट नसतो. काही विशिष्ट पॉलिसींमध्येच हा खर्च समाविष्ट असतो. हा खर्च समाविष्ट असणार्‍या पॉलिसींचे प्रमाण फार कमी आहे.
 
नवजात अर्भकासाठी विम्याची सोय
 
ज्या कंपन्यांच्या पॉलिसींमध्ये प्रसुतीच्या खर्चावर विमा संरक्षण मिळते, अशा पॉलिसींमध्ये नवजात अर्भकासाठीचे विमा संरक्षण हा अतिरिक्त फायदा म्हणून समाविष्ट केले जाते. काही काही पॉलिसींमध्ये जर आईच्या प्रसुतीसाठीचा विमा उतरविलेला असेल, तरच नवजात अर्भकाचा विमा उतरविला जातो.
 
थांबायचा कालावधी
 
गर्भारपणाचा कालावधी व प्रसुती यासाठीच संरक्षण देणार्‍या पॉलिसींमध्ये बर्‍याच अटी व नियम असतात. बर्‍याच प्रकरणांमध्ये या अटींवर व नियमांवर बोट ठेवून विम्याचे दावे नामंजूरही केले जातात. याचे भान ठेवून योग्य विमा पॉलिसी विकत घ्यावी, म्हणजे नंतर पस्तावण्याची वेळ येणार नाही.
 
प्रसुती व नवजात अर्भकाच्या उपचार पद्धतीचा खर्च काही काही पॉलिसींमध्ये पॉलिसी विकत घेतलेल्या तारखेपासून मिळत नाही, यासाठी थांबायचा कालावधी (वेटिंग पीरिएड) आखून दिलेला असतो. पॉलिसी विकत घेण्यापूर्वी हा कालावधी किती दिवसांचा आहे, याची माहिती करून घ्यावी, नाहीतर हा ‘क्लॉज’ अडचण निर्माण करू शकतो. परिणामी, दावा असंमतही होऊ शकतो.
काही पॉलिसींमध्ये पॉलिसीधारकाने जर अतिरिक्त ‘प्रीमियम’ भरला, तर ‘वेटिंग पीरिएड’चा ‘क्लॉज’ समाविष्टकेला जात नाही. हा एक पॉलिसी विकत घेण्यासाठी ‘वेटिंग पीरिएड’च्या जाचातून सुटण्याचा चांगला पर्याय आहे किंवा ज्या पॉलिसींचा ‘वेटिंग पीरिएड’ कमी आहे, अशी पॉलिसी विकत घेण्याचाही प्रस्ताव आहे.
 
नुकत्याच जन्मलेल्या मुलांसाठी विमा संरक्षण
 
नुकतेच जन्मलेले मूल (जस्ट बॉर्न बेबी) व नवीन जन्माला आलेले मूल (न्यू बॉर्न बेबी) यांच्या विमा संरक्षणात फरक असतो. नुकत्याच जन्मलेल्या बाळाला काही पॉलिसींमध्ये ते जन्मलेल्या दिवसापासून 90 दिवसांपर्यंत विमा संरक्षण हे प्रसुती विमा पॉलिसीचा एक भाग म्हणून मिळते. सर्व पॉलिसींमध्ये ही तरतूद नसते. त्यामुळे अशी तरतूद असलेली ‘पॉलिसी’ निवडण्याचा पर्याय पॉलिसी विकत घेणार्‍याला उपलब्ध असतो. काही पॉलिसींमध्ये अशा प्रकारचा दावा संमत करताना ठरावीक कमाल रक्कम दिली जाते. कमाल किती रक्कम द्यायची, हे ‘पॉलिसी क्लॉज’मध्ये समाविष्ट केलेले असते. रक्कम देणार्‍यावर ‘कॅपिंग’ असते. काही विमा कंपन्या ज्या रकमेची पॉलिसी उतरविली आहे, त्या रकमेचा काही टक्के हिस्सा अशा या उपचार पद्धतीवर देतात.
 
नवजात बाळाला विमा संरक्षण
 
91 दिवसांच्या अर्भकापासून ते 180 दिवसांचे अर्भक या प्रकारात समाविष्ट होतात. काही विमा कंपन्यांची अगोदर जर पॉलिसी काढली असेल, तर पॉलिसी सुरू असण्याच्या कालावधीत नवीन जन्माला आलेल्या बाळाला पॉलिसीत समाविष्ट करून घेतात. तसे ‘अ‍ॅण्डॉर्समेंट’ पॉलिसीत, पॉलिसीधारकाकडून अतिरिक्त ‘प्रीमियम’ घेऊन करतात, पण पॉलिसीत अशी ‘अ‍ॅण्डॉर्समेंट’ करताना ते लहान मूल आजारी असता कामा नये. मूल आजारी झाल्यावर फायदा मिळावा म्हणून ‘अ‍ॅण्डॉर्समेंट’ करुन घेता येत नाही. काही विमा कंपन्या फक्त पॉलिसीच्या नूतनीकरणाच्या वेळीच अशा मुलांना विमा संरक्षण देतात, मध्येच देत नाहीत.
 
संरक्षण
 
नवीन बालकांसाठीची चांगली आरोग्य विमा पॉलिसी बाळ जन्माला येण्यापूर्वीचा व जन्मानंतरच्या दोन्ही वेळच्या उपचाराच्या खर्चांचा दावा संमत करणे, यात प्रसुती प्रक्रियेचा खर्च, जन्माच्या वेळी काही समस्या निर्माण झाल्यास त्याचा खर्च, तसेच शिशूंचे केले जाणारे लसीकरण, या सर्व खर्चांचा परतावा दावा करून मिळविता येऊ शकतो. शिशूंच्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी त्यांचे बर्‍याच प्रकारचे लसीकरण करून घ्यावे लागते. हे लसीकरण करून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. जर कोणत्या पालकाने ठरलेल्या तारखेस बाळाचे लसीकरण करून घेतले नाही व लसीकरण न केल्यामुळे त्या बाळाला जर एखादा आजार जडला, तर ती पालकाची अक्षम्य चूक समजण्यात येते व उपचार पद्धतीच्या खर्चाचा दावा नामंजूर केला जातो. प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याच्या लसीकरणाचे वेळपत्रक अचूक पाळावयासच हवे. हे त्यांच्या व त्यांच्या बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे.
 
दावा कशाचा मिळत नाही?
 
बालकाला जर जन्मजात बाह्य अवयवांशी संबंधित आजार असेल, तर त्याचा दावा या प्रकारच्या पॉलिसीत नामंजूर होऊ शकतो, पण शरीराच्या आतील भागात जर काही जन्मजात दोष असेल, तर त्यावरील उपचार पद्धतीचा खर्च मंजूर होऊ शकतो. या पॉलिसीत कित्येक प्रकारचे आजार /कित्येक प्रकारची उपचार पद्धती ही ‘एक्सक्लुजन क्लॉज’मध्ये समाविष्ट केलेली असते. या ‘एक्सक्लुजन क्लॉज’मध्ये समाविष्ट असणार्‍या आजारांचा खर्च स्वत:ला करावा लागतो.
 
तुमच्या अर्भकासाठी योग्य पॉलिसी निवडणे, हे आव्हानात्मक असते. बाजारात अशा प्रकारच्या एवढ्या पॉलिसी उपलब्ध आहेत, त्यापैकी सर्वात जास्त फायदा देऊ शकणारी पॉलिसी ठरविणे तितकेसे सोपे नाही. कमी ‘प्रीमियम’मध्ये जास्तीत जास्त ‘कव्हरेज’/संरक्षण देणारी व कडक अटी/नियम नसणारी पॉलिसी निवडावी.
 
समजा, पॉलिसी निवडल्यानंतर असे लक्षात आले की, आपण चुकीची पॉलिसी निवडली आहे, तर आरोग्य विमा पॉलिसींबाबत ‘पोर्टेबिलिटी’ची सुविधा उपलब्ध आहे. पॉलिसीतले नियम व अटींचे ‘क्लॉज’ पूर्ण अभ्यासल्याशिवाय कोणतीही पॉलिसी विकत घेऊ नये. समजा, चांगली पॉलिसी विकत घेण्यासाठी ‘प्रीमियम’ जास्त भरावा लागला, तर त्या ‘प्रीमियम’वर आयकर सवलत मिळतेच, हा एक अतिरिक्त फायदा आहे.
 
9920895210/ 9324403003
@@AUTHORINFO_V1@@