जळगाव : एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा म्हणून आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारही मैदानात उतरले आहेत. एसटी कामगारांना आपण आजूबाजूच्या राज्यांपेक्षा अधिकची पगारवाढ दिली असल्याचे सांगत संप मागे घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
एकंदरीत एसटी विलीनीकरणाबद्दल राज्य सरकार सकारात्मक नसल्याचे संकेत त्यांनी दिले. राज्यातील शाळा, कॉलेज, परिक्षा सुरू झाल्या आहेत. सर्वसामान्यांना एसटीचा मोठा आधार आहे. या स्थितीत एसटी कर्मचारी हट्टाला पेटले आहेत, असा दावा त्यांनी केला.
"प्रवासी नागरिकही आपलेच आहेत आणि एसटी कामगारही आपलेच आहेत. माझी कळकळीची आणि नम्रतेची विनंती आहे की, आता कामावर येऊन तुम्ही एसटी सुरू केली पाहिजे," असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांनी आतापर्यंत अनेकदा कामगारांना मूभा दिली. पण आता मात्र त्यांनी सहनशीलतेचा अंत पाहू नये.", असा इशारा त्यांनी केला आहे.
तुटेपर्यत ताणू नका!
'मेस्मा' कायद्यासंदर्भात काही निर्णय घेतला किंवा टोकाचा निर्णय घेऊन तुटेपर्यंत ताणले तर मागच्या काळामध्ये काय अवस्था झाली हे आपण बघितले. जर कुणी ऐकायला तयार नसेल आणि नवीन भरती सुरू केली तर नोकरीचा प्रश्न येणार आहे. याबद्दल पण मंत्रीमंडळात चर्चा झाली आहे. इथपर्यंत टोकाची वेळ येऊ नये," अशी विनंती अजितदादांनी एसटी कर्मचाऱ्यांना केली आहे.