‘हिंदू असणे’ म्हणजे काय, हे ‘मी हिंदू आहे’ असे न म्हणता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कृतीने दाखवून दिले. नुसती वटवट करण्यात कुणाच्या बापाचे काय जाते? मणभर शब्दांपेक्षा कणभराची कृती, तुम्ही अपघाताने हिंदू आहात की, श्रद्धेने आणि अस्मितेने हिंदू आहात, हे सिद्ध करते. राहुल गांधींना या वाटेने अजून शेकडो मैल चालायचे आहे. अर्थात तेवढा दम असेल तर!
शहर जयपूर... स्थान विद्याधर नगर स्टेडियम... कार्यक्रम ‘महंगाई हटावो रॅली.’ निमंत्रक काँग्रेस पक्ष आणि प्रमुख वक्ते राहुल गांधी! राहुल गांधी यांनी महागाईवर भाषण करण्याऐवजी ‘हिंदू आणि हिंदुत्व’ या विषयावर भाषण केले. महागाई तशी नवीन नसते. ती पं. नेहरुंच्याही काळात होती, इंदिरा गांधींच्या काळातही होती, राजीव गांधी यांच्या काळात होती आणि मनमोहन सिंग यांच्याही काळात होती. त्याविरुद्ध विरोधी पक्ष रॅली काढीत. सत्तेवर असलेल्या काँग्रेसविरुद्ध भाषण करित. आज चक्क उलटे झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे देशात भाजपची सत्ता आहे. महागाई आहे. पण, काँग्रेस विरोधी बाकावर आहे आणि याच काँग्रेसने महागाई विरुद्ध रॅली काढली.
महागाई ही सत्तानिरपेक्ष असते. सत्तेवर कोण बसलं आहे, याच्याशी महागाईला काहीही देणंघेणं नसतं. अमुक एखादा पक्ष सत्तेवर आहे, म्हणून महागाई आहे, तो सत्तेवरुन गेला की, महागाई दूर होईल... अंधार आहे, दिवा लावला की, अंधार दूर होईल, इतका हा सोपा विषय नाही. महागाईची दोन प्रमुख कारणे असतात. वस्तूंचा कमी पुरवठा आणि मागणी जास्त, हे पहिले कारण. दुसरे कारण म्हणजे चलन फुगवटा. त्याला जोडूनच नैसर्गिक आपत्ती, वाहतुकीला अडथळा अशी तात्कालिक कारणेदेखील आपल्याला पाहायला मिळतात. यावर बोलायचे, तर गहन अभ्यास असावा लागतो. राहुल गांधींचा अभ्यास किती असतो, हे सर्व जगाला माहीत असल्यामुळे त्याविषयी न लिहिलेलेच बरे!
यासाठी राहुल गांधींनी ‘हिंदू’ हा विषय घेतला. ते जे काही म्हणाले, त्यातील महत्त्वाची वाक्ये अशी, “मी हिंदू आहे, पण हिंदुत्ववादी नाही. देशात २०१४ पासून हिंदुत्ववाद्यांची सत्ता आहे, हिंदूंची नाही. या देशात हिंदुत्ववाद्यांमुळे महागाई वाढत आहे. हिंदुत्ववाद्यांना सत्तेतून बाहेर काढा आणि देशात पुन्हा हिंदूंची सत्ता आणा. हिंदुत्ववादी सत्तेचे भुकेले आहेत, तर हिंदू सत्यासाठी मरत असतो. सत्य हाच त्याचा मार्ग आहे. हिंदुत्ववादी द्वेषाने पछाडलेला असतो. हिंदुत्ववाद्यांना फक्त सत्ता हवी आहे, त्यांना सत्य नको आहे.” सर्वप्रथम आपण राहुल गांधींचे अभिनंदन करुया की, ते जाहीरपणे म्हणाले की, ‘मी हिंदू आहे.’ नेहरु-गांधी घराण्यातील राजपुत्राने ‘मी हिंदू आहे,’ असे म्हणणे हे आश्चर्यकारकच आहे.
पं. जवाहरलाल नेहरु हे राहुल गांधींचे पणजोबा होते. ते एकदा म्हणाले,“मैं शिक्षा से ईसाई, संस्कृति से मुस्लीम, दुर्भाग्य से हिंदू हूँ।” त्यांचे मूळ इंग्रजी वाक्य असे आहे, "By education I'm an Englishman, by views an Internationalist, by culture a Muslim and a Hindu only by accident of birth..." नेहरुंच्या या वाक्यावर नेहरुभक्त उलटसुलट चर्चा करित असतात. त्यांचा पण ‘तू’ मात्र, म्हणतो की,‘मी हिंदू आहे’, म्हणजे दुसर्या भाषेमध्ये पं. नेहरुंचा विचार मला मान्य नाही, असे पण ‘तू’ला म्हणायचे आहे. पं. नेहरु १९६४ पर्यंत देशाचे पंतप्रधान होते. एवढ्या काळात ते कधीही कुठल्याही मंदिरात गेले नाहीत. हिंदू धर्माचार्यांचा त्यांनी कधीही सन्मान केला नाही. प्रकल्पाचे भूमिपूजन किंवा नारळ फोडणे इत्यादी गोष्टी त्यांनी कधी केल्या नाहीत. अशा घराण्यात वाढलेले राहुल गांधी म्हणतात की, ‘मी हिंदू आहे.’
राहुल गांधींमध्ये एवढे परिवर्तन कसे झाले? हे परिवर्तन नरेंद्र मोदी यांच्यामुळे झाले. राहुल गांधींचे भाषण रविवारी झाले आणि सोमवारी काशी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘काशिविश्वनाथा’चे दर्शन घेतले. गंगेत स्नान केले. भोलेनाथाचा जयजयकार केला. साधुसंतांना वंदन केले. श्रमजीवींना पुष्पांजली अर्पण करुन सन्मान करण्यात आला आणि ‘काशी कॉरिडोर’ राष्ट्राला अर्पण केला. ‘हिंदू असणे’ म्हणजे काय, हे ‘मी हिंदू आहे’ असे न म्हणता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कृतीने दाखवून दिले. नुसती वटवट करण्यात कुणाच्या बापाचे काय जाते? मणभर शब्दांपेक्षा कणभराची कृती, तुम्ही अपघाताने हिंदू आहात की, श्रद्धेने आणि अस्मितेने हिंदू आहात, हे सिद्ध करते. राहुल गांधींना या वाटेने अजून शेकडो मैल चालायचे आहे. अर्थात तेवढा दम असेल तर!
राहुल गांधी म्हणतात की, “मी हिंदू आहे, हिंदुत्ववादी नाही.” पण, ‘मी हिंदू आहे’ हे म्हणायला तीन पिढ्या जाव्या लागल्या. ‘मी हिंदुत्ववादी’ हे म्हणायला एवढ्या पिढ्या घालवता येणार नाहीत. त्यामुळे राहुल गांधींना आता घाई केली पाहिजे. दोन निवडणुकांच्या अपयशाने ‘मी हिंदू’ असल्याचा साक्षात्कार त्यांना झाला आहे आणि २०२४ची निवडणूक हरल्यानंतर ‘मी हिंदुत्ववादी आहे,’ याचा देखील त्यांना साक्षात्कार होईल.
त्यासाठी त्यांना सावरकर वाचण्याची गरज नाही. कारण, सावरकर ही दाहकता आहे, तो एक अंगार आहे, तो राहुल गांधींच्या नाजूकपणाला सहन नाही होणार! त्यासाठी त्यांनी महात्मा गांधी यांना वाचायला पाहिजे. महात्मा गांधी हिंदू धर्माचे कडवे अभिमानी होते. त्यांनी भविष्यवाणी केली की, “हिंदू धर्म आता थकल्यासारखा वाटत असला तरी तो भविष्यात आज आहे, त्यापेक्षा अधिक शक्तीने उभारुन येईल.” (तो कालखंड आता चालू आहे.)
महात्मा गांधी पुढे म्हणतात, “मी केवळ हिंदू परिवारात जन्मलो म्हणून हिंदू नसून,मी निवडीने आणि निष्ठेने हिंदू आहे. मला हा धर्म माहीत आहे आणि तो मी जाणतो, तो मला ऐहिक आणि पारलौकिक जगातील आत्मशांती देईल.” आणखी एका ठिकाणी गांधींजी म्हणतात, “मी जन्माने हिंदू आहे. हिंदू धर्मात मला शांती प्राप्त होते. जेव्हा शांती माझ्यापासून दूर जाते, तेव्हा ती मला हिंदू धर्मात सापडते. मी अन्य धर्मांचा अभ्यास केलेला आहे. यावरुन माझे मत असे झाले आहे की, हिंदू धर्मात काही उणीवा जरी असल्या तरी हिंदू धर्मच हा माझ्यासाठी धर्म आहे, असे मला वाटते आणि त्यामुळे मी स्वतःला सनातनी हिंदू म्हणवतो.” राहुल यांच्या नावात ‘गांधी’ आहे, म्हणून त्यांनी ‘ओरिजनल’ गांधींचा अभ्यास केला पाहिजे.
‘हिंदू’ आणि ‘हिंदुत्व’ यांची फारकत करता येत नाही आणि असे जे कुणी करु पाहतात, ते तार्किक घोडचुका करतात. हिंदू याचा अर्थ सर्वसमावेशकता, सत्य शोधण्याचा निरंतर प्रयत्न, कठोर तार्किकता, बुद्धिवाद, विज्ञाननिष्ठा. या सर्वांचे दर्शन उपनिषदांतून होते आणि हिंदुत्व म्हणजे असा सगळा आशय ज्या विचारधारेने स्वीकारलेला आहे, तिला ‘हिंदुत्व विचारधारा’ म्हणतात. या विचारधारेत आजच्या काळातील संदर्भ लक्षात घेऊन काही गोष्टी जोडाव्या लागतात. हिंदुत्व म्हणजे ‘सबका साथ सबका विकास’, हिंदुत्व म्हणजे १३० कोटी भारतीय जनता, हिंदुत्व म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध करणारे योगदर्शन आणि हिंदुत्व म्हणजे विदेशनीतीतील ‘सांस्कृतिक सॉफ्ट पॉवर डिप्लोमसी.’ एका वाक्यात सांगायचे, तर जागतिक शांतता, जागतिक भातृभाव, विश्वाच्या पर्यावरणाचे रक्षण, जगातून अज्ञान-दारिद्य्राचे निर्मूलन हे हिंदुत्व आहे. ही सर्वसमावेशक, सर्वव्यापी, सर्वसंग्राहक, संकल्पना आहे.
राहुल गांधी यांच्यापुढील सगळ्यात मोठा प्रश्न ते हिंदू आहेत की अहिंदू आहेत. हिंदुत्ववादी आहेत की, अन्य कुणी आहेत, हे सांगण्याचा नसून एकविसाव्या शतकातील काँग्रेसची विचारधारा कोणती असेल, हे सांगण्याचा आहे. काँग्रेस हा हिंदू पक्ष म्हणून उभा राहिला. स्वातंत्र्यापूर्वी हिंदूंनी त्याला आपला पक्ष मानला. ते हिंदू आता काँग्रेसपासून का दूर होत चालले आहेत, याचा शोध राहुल गांधी यांनी घ्यायला पाहिजे. हिंदुत्ववादी सत्तेवर असल्यामुळे महागाई वाढत चालली आहे, हे विनोदी विधान झाले.
जो हिंदुत्वाचा वारसा काँग्रेसने हरवला, म्हणजे गांधीजींच्या हिंदू वारशाचा जेव्हा त्याग केला, तिथपासून काँग्रेसच्या घसरणीला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी चुकूनही ‘मी हिंदू आहे, हिंदुत्ववादी आहे, हिंदूंचे राज्य मला आणायचे आहे,’ असे म्हणत नाहीत. तसे म्हणण्याची त्यांना गरज वाटत नाही. कारण, हिंदू समाजाने त्यांना सच्चा, हाडाचा आणि पक्का हिंदू समजून घेतले आहे. राहुल गांधींची प्रतिमा त्याच्या एकदम उलट आहे. हा माणूस कच्च्या हाडाचा, ढोंगी आणि मतलबी आहे. हिंदुपणाचा मुखवटा घेऊन तो फिरत आहे. मुखवट्यामागचा चेहरा असली कसा होईल, याची चिंता राहुल गांधींनी केली पाहिजे. त्यांच्याच भाषेत सांगायचे, तर आज देशात हिंदूंचेच राज्य आहे आणि हिंदू समाजाचा संकल्प तेच राज्य कायम करण्याचा आहे. काशीचा संदेशदेखील हाच आहे.