कोल्हापूरकर फुटबॉलपटू अनिकेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Dec-2021   
Total Views |

News 1 _1  H x
कठीण परिस्थितीवर मात करत भारतीय फुटबॉल संघाची कॅप मिळवणार्‍या कोल्हापूरच्या अनिकेत जाधवच्या ( Aniket Jadhav) कर्तृत्वाची थोडक्यात माहिती... 


भारत क्रीडा प्रकारात एक सर्वगुणसंपन्न देश आहे. अनेक क्रीडा प्रकारात भारत प्रगती करत असून जगभरामध्ये आपला ठसा उमटवला आहे. खो-खो, कबड्डीपासून ते हॉकी, क्रिकेटपर्यंत सर्व खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये भारताला एक महत्त्वाचे स्थान आहे. जसे की, हॉकीमध्ये भारतीय हॉकी संघाने जागतिक क्रमवारीत आपले एक स्थान निर्माण केले आहे. तर, क्रिकेटचा फिवर हा देशासाठी एका धर्मासारखाच मानला जातो. याचसोबत गेल्या काही वर्षांमध्ये फुटबॉल या परदेशी खेळात भारतीयांनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे भायचुंग भुतिया, सुनील छेत्री यांसारख्या भारतीय फुटबॉल खेळाडूंनी जागतिक फुटबॉल क्षेत्रामध्ये भारताचा झेंडा नेहमीच उंचच उंच फडकावला आहे.
अद्याप, भारताला फुटबॉल क्षेत्रात अव्वल दर्जाचे स्थान मिळाले नसले, तरीही क्रिकेटप्रेमींच्या या देशात फुटबॉललादेखील तेवढेच महत्त्व दिले जाते. पश्चिम बंगालपासून ते गोव्यापर्यंत देशाच्या कानाकोपर्‍यात अनेक युवा खेळाडू फुटबॉल प्रशिक्षण घेतात. त्यामुळे भविष्यकाळात अनेक खेळाडूंच्या योगदानामुळे नक्कीच भारत फुटबॉल क्षेत्रातही अव्वल संघांमध्ये गणला जाईल ही अपेक्षा. यात महाराष्ट्रामध्येही फुटबॉलचे वेड काही कमी नाही. नुकतीच आगामी आशियाई चषक स्पर्धा (एफसी)साठी निवड करण्यात आलेल्या भारतीय फुटबॉल संघात कोल्हापूरच्या अनिकेत जाधवचा  Aniket Jadhav समावेश केला आहे. अनेक अडीअडचणींवर मात करत त्याने ही पायरी गाठली आहे. जाणून घेऊया याबद्दल थोडक्यात माहिती...



दि. १३ जुलै, २००० मध्ये अनिकेत जाधव याचा जन्म कोल्हापूरमध्ये झाला. अनिकेतच्या घरची परिस्थिती अगदी बेताची होती. कारण, त्याचे वडील रिक्षाचालक, तर आई गृहिणी आहे. लहानपणापासून त्याला खेळामध्ये आवड होती. साधारण वयाच्या सातव्या-आठव्या वर्षापासूनच त्याने फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली. या खेळामध्ये त्याची उत्सुकता वाढू लागली. त्यानंतर त्याने या खेळामध्ये कर्तृत्व गाजवण्याचा ध्यास घेतला. पण विशेष म्हणजे, घरची परिस्थिती बिकट असूनही अनिकेतच्या खेळामध्ये कधी अडसर होणार नाही याची काळजी त्याच्या आई-वडिलांनी घेतली.


याची जाणीव अनिकेतला होतीच, त्यामुळे एकदा हा मार्ग निवडल्यानंतर माघार न घेण्याचा दृढनिश्चय त्याने मनात केला आणि पुढे फुटबॉलचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. २०१२ मध्ये त्याच्या कारकिर्दीची खरी सुरुवात ही पुणे ‘एफसी अकादमी’सोबत झाली. या क्लबसोबत तो सलग तीन वर्ष होता. यावेळी त्याने विविध गटांत अनेक सामन्यांमध्ये आपली चमक दाखवली. त्यानंतर २०१५ मध्ये त्याची निवड चाचणीनंतर १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत होणार्‍या भारतीय संघाच्या शिबिरासाठी निवड करण्यात आली. राष्ट्रीय युथ संघामध्ये चमक दाखवल्यानंतर भारतामध्ये झालेल्या १६ आणि १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची संधी त्याला मिळाली. २०१७ ते २०१९ ही वर्ष त्याने ‘इंडियन एरॉज’ या संघासाठी दिली. यामध्ये त्याने आपल्या खेळाची चुणूक दाखवत ‘आय लीग’मध्ये १८ सामने खेळले आणि दोन महत्त्वपूर्ण गोल केले.


क्रिकेटमध्ये ‘आयपीएल’प्रमाणेच भारतीय फुटबॉलमध्ये ‘आयएसएल’ लीगचे महत्त्व आहे. अनिकेतने  Aniket Jadhav २०१९ मध्ये ‘जमशेदपूर एफसी’कडून पदार्पण केले. विशेष म्हणजे या संघाचे प्रतिनिधित्व करण्याआधी त्याने ‘बॉलबॉय’चेसुद्धा काम केले. त्यानंतर त्याची कामगिरी पाहता ‘जमशेदपूर एफसी’ने त्याला करारबद्ध केले. यावेळी त्याने दोन हंगामामध्ये २७ सामन्यात आपला सहभाग नोंदवला. २०१९ मध्ये त्याला ‘ब्लॅकबर्न रोवर्स’कडून त्यांच्या अकादमीमध्ये तीन महिने सराव करण्याची संधी मिळाली. येथील बहुमूल्य मार्गदर्शन त्याला पुढच्या कामगिरीसाठी अमूल्य ठरले. आता २०२१ पासून तो हैदराबाद संघासाठी खेळत आहे.



दरम्यान, अनेक राष्ट्रीय खेळांमध्ये चांगली कामगिरी केल्याने अनिकेतची उझबेकिस्तानमध्ये होणार्‍या आशियाई चषक स्पर्धा २०२२साठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे २०१९ नंतर तो पुन्हा एकदा भारतीय जर्सीत दिसणार आहे. कोरोना काळात लॉकडाऊनदरम्यान त्याने या संधीसाठी न चुकता गेली दोन वर्षे खूप मेहनत घेतली होती. निवड झाल्याने त्याच्या मेहनतीचे फळ त्याला मिळाले.



तसेच यासाठी निवड झालेला तो एकमेव महाराष्ट्राचा खेळाडू आहे. कोल्हापुरात जडणघडण झालेल्या अनिकेतने विविध आघाड्यांवर नेत्रदीपक कामगिरी केली. फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर देशभर आपला ठसा उमटवला. या संघात निवड झाल्याने फक्त कोल्हापूरवासीयांचाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. येत्या काळात अशीच प्रगती करत भारतीय फुटबॉल संघाची जागतिक पटलावर वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी त्याला ‘दै. मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा...



@@AUTHORINFO_V1@@