...आणि ‘पीसमेकर’ तोफ मागच्या बाजूने फुटली. जहाजाच्या डेकवर अतितप्त लोखंडाचा वर्षाव झाला. धूर विरल्यावर असं लक्षात आलं की, गृहमंत्री एबल अप्शर, आरमारमंत्री टॉमस गिलमर आणि खासदार डेव्हिड गार्डिनरसह एकूण आठ जण जागीच ठार झालेत; तर ३०-३५ जण गंभीर जखमी झालेत.
भारतीय संगीत परंपरेत सामुदायिक गायन करण्याची परंपरा दिसत नाही. एक कलावंत गात असतो आणि बाकी सारे ऐकत असतात. क्वचित जुगलबंदी कार्यक्रम असेल, तर दोघे गातात. वृंदगायन असेल, तर एक किंवा दोन मुख्य गायक असतात आणि बाकीचे त्यांचे साथीदार, साजिंदे असतात. उदा. तमाशातला सवाल-जवाब घ्या. दोन प्रमुख कलावंत गात असतात आणि इतर साजिंदे फक्त गाण्याच्या मुखड्याचे बोल पुन्हा पुन्हा घोकून म्हणण्यासाठी किंवा, जी जी एवढंच म्हणण्यापुरता आवाज लावत असतात.
एखाद्या रंगलेल्या मैफलीत श्रोते कडाडून टाळी देतील, ‘वाहवा! क्या बात है’ म्हणून दिलखुलास दाद देतील; एखाद्या रंगलेल्या कीर्तनांत, भजनात श्रोत्यांनाही बुवांबरोबर गात गात नाचावंसं वाटत असतं, पण प्रत्यक्षात ते तसं करणार नाहीत. एखाद्या तमाशाच्या बोर्डावर तुफान रंगलेल्या लावणीला ग्रामीण प्रेक्षक-श्रोते, शिट्ट्या आणि टाळ्यांची प्रचंड दाद देतील, शेमले-पटके-टोप्या हवेत उडवतील, पण कुणी गायला किंवा नाचायला लागणार नाहीत. तो मान फक्त त्या कलावंताचाच असतो. ही आपली परंपरा आहे.
पश्चिमी देशांमध्येदेखील अशी परंपरा आहेच. पण त्यांच्याकडे एक वेगळी सामुदायिक गाण्याचीदेखील परंपरा आहे. ही बहुधा चर्चपासून निर्माण झालेली असावी. चर्चमधल्या काही विशिष्ट प्रार्थना या सामुदायिक म्हणायच्या असतात. ऑर्गनच्या सुरावटीवर जेव्हा चर्चमध्ये उपस्थित असणारेयच्चयावत लोक आपला आवाज लावतात, तेव्हा एक वेगळंच वातावरण निर्माण होतं. आपण इथे जमलेले सगळे जण एक आहेत, ही भावना या सामुदायिक आवाजातून निर्माण होत असते. पश्चिमी
देशांमधल्या शाळा-कॉलेजांमध्येही मुद्दाम अशी सामुदायिक गीतं गायली जातात. संस्थेची प्रमुख व्यक्ती व्यासपीठावरून ते गीत गायला सुरुवात करते आणि मग सगळेच उपस्थित; त्यात शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी सगळेच; आपापला आवाज लावतात. हे गीत त्या-त्या संस्थेचं, शहराचं सन्मान गीत असतं किंवा बरेचदा ते संपूर्ण देशाबद्दल सन्मान भावना व्यक्त करणारं गीत असतं. त्यामुळे सर्वांनाच ते येत असतं. सर्वजण मुक्तपणे ते गातात. त्या सामुदायिक स्वरांतून एक उत्साह, एक ऊर्जा निर्माण होते.
तुम्ही जर पाश्चिमात्य सैनिकी चित्रपट पाहिले असतील, तर तुम्हाला माहित असेल की, या देशांच्या सैन्यांच्या प्रत्येक विभागाचं स्वत:चं असं एक ‘व्हिजन साँग’ असतं. शिवाय संपूर्ण सैन्याची गीतं असतात. सैनिक व्यायाम म्हणून धावताना, परेड करताना, खेळताना अशी गीतं सामुदायिकपणे गातात. त्यातून त्यांच्यात आणि एकंदर वातावरणातएक विलक्षण उत्साह संचारतो. आपल्या भारतीय सैन्यातही आता अशी गीतं आहेत.
आपण ही परंपरा अर्थातच इंग्रजांकडून उचलली आहे. पण हिंदू राजवटींच्या भारतीय सैन्यामध्ये अशी काही पद्धत होती का? माहित नाही, संशोधनास प्रचंड वाव आहे. नगारे-नौबती, तूर-बंबाळ, शिंगं-कर्णे, कहाळा-मांदाळा, शहाजणं अशी रणवाद्यं नक्कीच होती. रणांगणावर त्यांच्या प्रचंड घोषात हिंदू योद्धे शत्रूवर तुटून पडत. पण ज्यांना ‘मार्शल म्युझिक’ लष्करी संगीत म्हणता येईल, असा काही रचनाबंध त्यांत होता का?
हा सगळा विषय पुढे येण्याचं कारण म्हणजे जॉन टायलर या एका अमेरिकन राष्ट्राध्यक्षाचा अपघाती मृत्यू एका सामुदायिक गीतगायनामुळे टळला, असं संशोधन नुकतंच पुढे आलं आहे. जॉन टायलर हा काही फार लोकप्रिय वगैरे होता, अशातला भाग नाही. सन १८४१ ते १८४५ या काळात तो राष्ट्राध्यक्ष होता. मात्र, एक व्यक्ती म्हणून आणि एक राजकीय नेता म्हणून त्याच्या जीवनात काही फारच लक्षणीय घटना घडल्या.
अमेरिकन निवडणूक प्रक्रियेनुसार सन १८४०च्या अखेरीस निवडणूक झाली. ‘व्हिग’ हा पक्ष आणि त्याचे नेते विल्यम हॅरिसन आणि जॉन टायलर हे अनुक्रमे राष्ट्रध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून निवडून आले. दि. ४ मार्च, १८४१ या दिवशी त्यांचं सरकार सत्तारुढ झाल्याबरोबर एका महिन्याने म्हणजे दि. ४ एप्रिल, १८४१ या दिवशी राष्ट्रध्यक्ष विल्यम हॅरिसन तापाने मरण पावला, अमेरिकन राज्यघटनेतल्या नियमांनुसार, अशावेळी उपाध्यक्ष हा आपोआपच अध्यक्ष होतो. तसा ध्यानीमनी नसता जॉन टायलर एकदम राष्ट्रध्यक्ष झाला.
अमेरिकेच्या राजकीय इतिहासात आणखी दोन वेळा असे प्रसंग घडलेत. सन १८६५ साली राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकनचा खून झाला आणि उपाध्यक्ष अॅन्ड्य्रू जॉन्सन राष्ट्राध्यक्ष बनला. १९६३ साली अध्यक्ष जॉन केनेडीचा खून झाला आणि उपाध्यक्ष लिंडन जॉन्सन राष्ट्राध्यक्ष बनला. काही राजकीय निरीक्षकांच्या मते, जगभरच्या डाव्या विचारवंतांना सध्याच्या काळात तशी जरा आशा वाटते आहे. कारण, वर्तमान अध्यक्ष जो बायडेन ७९ वर्षांचे असून त्यांची प्रकृती साधारणचअसते. उलट उपाध्यक्ष कमलादेवी हॅरिस फक्त ५७ वर्षांच्या आहेत. राजकारणात साठी न ओलांडलेली व्यक्ती म्हणजे तरुणच देव करो आणि अध्यक्ष त्यांचा कार्यकाळ पूर्ण करोत.
असो, तर जॉन टायलर असा अचानक राष्ट्राध्यक्ष बनल्यावर काही काळाने काही राजकीय मुद्द्यांवरुन त्यांचं त्यांच्या पक्षाशी म्हणजे ‘व्हिग’ पक्षाशी जोरदार भांडण झालं, परिणामी ‘व्हिग’ पक्षाच्या अध्यक्षाने आपल्या सरकारच्या प्रमुखाला म्हणजे साक्षात राष्ट्राध्यक्षाला पक्षातून जी.पी.एल. (** पे लाथ) दिली, पण अमेरिकन घटनेतील तरतुदींनुसार त्यांचं राष्ट्राध्यक्षपद कायम राहिलं. विरोधी पक्ष डेमोक्रॅटिक यांनी त्याला बाहेरुन पाठिंबा दिला, काय गंमतीदार स्थिती आहे पहा! बिनपक्षाचा राष्ट्राध्यक्ष!
पुढच्याच वर्षी म्हणजे १८४२ साली त्याची पत्नी लेटिशिया मरण पावली. बिचारीला ‘फर्स्ट लेडी’ म्हणून व्हाईट हाऊसमध्ये मिरवायला वर्षभरच मिळालं. जॉन-लेटिशिया या दांपत्याला चांगली सात मुलं होती. इतर अनेक मुद्द्यांबरोबरच जॉन टायलर दोन मुद्द्यांबद्दल खूप आग्रही होता. एक म्हणजे, अमेरिकेचं नौदल अद्ययावत आणि बलवान झालं पाहिजे. तरच आपल्याला ब्रिटनची समुद्रावरची दादागिरी रोखता येईल. आणि दुसरं म्हणजे, टेक्सास या दक्षिणेकडच्या राज्याला अमेरिकन संघराज्यात प्रवेश हवा आहे, तो आपण दिला पाहिजे.
अमेरिकन नौदलात जॉन टायलरचा एक मित्र आणि पाठीराखा होता. त्याचं नाव होतं कॅप्टन रॉबर्ट स्टॉक्टन. टायलरने त्याला आरमार मंत्री पद देऊ केलं. पण त्याने ते नाकारलं. उलट अमेरिकन नौदल बलवान झालं पाहिजे, हा टायलरचाच मुद्दा उचलून धरुन त्याने ‘यू.एस.एस.प्रिन्स्टन’ या नावाचं एक आत्याधुनिक जहाज बांधून घेतलं, त्याच्यावर दोन विशाल तोफा बसवल्या. या तोफा इतक्या प्रचंड होत्या की, त्यांच्यातून उडवला जाणारा गोळा २०० पौंड म्हणजे सुमारे ९० किलो वजनाचा असे आणि तो पाच मैल म्हणजे सुमारे आठ कि.मी.अंतरावर जाऊन पडत असे, ही १८४३ सालची गोष्ट आहे. त्याकाळातली ही आधुनिकतेची कमाल मर्यादा होती.
दि. २८ फेब्रुवारी, १८४४ या दिवशी कॅप्टन स्टॉक्टनने हे जहाज राजधानी वॉशिंग्टन नजीकच्या पोटोमॅक नदीत आणलं. राष्ट्राध्यक्ष टायलर आणि त्यांच्या मंत्रिमंडळातले अनेक मंत्री, न्यूयॉर्कचा खासदार डेव्हिड गार्डिनर, आरमारातले अनेक उच्च अधिकारी, अनेकांचे कुटुंबिय असं एक मोठं वर्हाडच जहाजावर चढलं. कल्पना अशी होती की, ‘यू.एस.एस.प्रिन्स्टन’ या सगळ्या अत्युच्च मंडळींना घेऊन पोटोमॅक नदीत दिवसभर सहल करेल. कॅप्टन स्टॉक्टन सर्वांना या जहाजाची यांत्रिक-तांत्रिक वैशिष्ट्यं समजावून देईल. मधनं-मधनं त्या दोन्ही महाकाली तोफांना बत्ती देऊन त्यांच्या शक्तीचीही झलक दाखवण्यात येईल. शिवाय जोरदार मेजवानी तर होणारच.
कार्यक्रम सुुरु झाला. ‘प्रिन्स्टन’ची अत्याधुनिकता आणि तोफांची अचाट मारकशक्ती पाहून सगळे खूष झाले. मग जंगी मेजवानी झाली.सगळे उच्चपदस्थ त्यांच्या बायका, मुलं, नोकर जहाजावरसर्वत्र हिंडत होते, पुरुष मंडळी नौदलाच्या पुढच्या महत्त्वाकांक्षी कार्याबद्दल चर्चा करीत दारुचे घुटके घेत होती. एवढ्यात ‘पीसमेकर’ या तोफेला पुन्हा बत्ती देत असल्याचं सांगण्यात आलं. सगळे ती आतषबाजी बघायला जमले. राष्ट्राध्यक्ष टायलर खालच्या डेकवर खासदार डेव्हिड गार्डिनरच्या दोघी मुलींशी गप्पा मारत होता.
तो म्हणाला,‘आलोच मी. द्या तुम्ही बत्ती थांबू नका.’ वरच्या डेकवर कॅप्टन स्टॉक्टनने उत्साहाने एक समरगीत गायला सुरुवात केली. सगळ्यांच्याच परिचयाचं ते गीत होतं. त्यामुळे सर्वांनीच ते गायला सुरुवात केली, त्या डेकवर जाण्यासाठी जिन्याच्या पायर्या चढत असलेला राष्ट्राध्यक्ष जॉन टायलर बरोबरच्या खासदार कन्यांना म्हणाला, ‘माझं फार आवडतं गीत आहे हे. काय मस्त गातायत सगळे. थांबा. मला इथूनच ते ऐकू द्या’, तिकडे त्या गीताच्या जल्लोषात तोफेला बत्ती दिली गेली.
...आणि ‘पीसमेकर’ तोफ मागच्या बाजूने फुटली. जहाजाच्या डेकवर अतितप्त लोखंडाचा वर्षाव झाला. धूर विरल्यावर असं लक्षात आलं की, गृहमंत्री एबल अप्शर, आरमारमंत्री टॉमस गिलमर आणि खासदार डेव्हिड गार्डिनरसह एकूण आठ जण जागीच ठार झालेत; तर ३०-३५ जण गंभीर जखमी झालेत. म्हणजे राष्ट्राध्यक्ष जर वेळेवर वर आला असता, तर तो साहजिकच गृहमंत्री आणि आरमारमंत्री यांच्यामध्ये उभा राहिला असता. आत्तापर्यंतचा निष्कर्ष असा होता की, राष्ट्राध्यक्ष खालच्या डेकवर गप्पा मारत थांबला, म्हणून बचावला. पण आता नव्या संशोधनानुसार तो जिन्यावर सामुदायिक गीत ऐकत थांबला, म्हणून वाचला.
जीवन आणि मृत्यू... फक्त काही क्षणांचा फरक!!