मुस्लीम प्रश्न हा अत्यंत जटील प्रश्न आहे. युरोप, अमेरिकेतील लोकशाही, उदारमतवादी राजवटी असोत, तुर्कस्तानसारखी लष्करावर भिस्त असलेली इस्लामिक देशांतील सेक्युलर राजवट असो की रशिया, चीनमधील कम्युनिस्ट राजवटी असोत, कोणालाच मुस्लीम मूलतत्त्ववादाला उत्तर शोधणे जमलेले नाही. या पार्श्वभूमीवर हिंदू समाजापाशी असे वेगळे काय आहे की, त्यामुळे या प्रश्नावर उत्तर काढण्याची शक्यता निर्माण होते, याचा विचार केला पाहिजे.
गेल्या रविवारी ‘मुस्लीमकेंद्री हिंदुत्व की, हिंदुत्वकेंद्री मुस्लीम‘ हा माझा लेख वाचल्यानंतर शेफाली वैद्य यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना, अनिरुद्ध खोले यांच्या लेखाशी १०० टक्के सहमती व्यक्त करताना, “माझा (करंबेळकर यांचा) लेख ‘डिप्लोमॅटिक‘ व एवढे शब्द खर्च करून काहीच भूमिका न मांडणारा आहे,” असे सांगितले. शेफाली वैद्य हे नाव तसे सुपरिचित आहे. कोणताही, कोणाचाही संघटनात्मक पाठिंबा नसताना सोशल मीडियाचा वापर करून गेल्या दहा वर्षांत त्यांनी स्वत:चा दबदबा निर्माण केला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ‘नो बिंदी, नो बिझनेस‘ असा हॅशटॅग सोशल मीडियावर ‘ट्रेंड’ करत, त्याचे रुपांतर पुढे सक्रिय चळवळीत झाले. परिणामी, एकट्याच्या बळावर हिंदू प्रथा-परंपरांना अव्हेरणार्या जाहिराती मागे घ्यायला त्यांनी मोठमोठ्या ब्रॅण्ड्सना भाग पाडले. त्यामागची भूमिका व ही चळवळ नेमकी कशी उभी राहिली, त्यासंबंधीची त्यांची सविस्तर मुलाखतही ‘महाएमटीबी’वर उपलब्ध आहेच. ज्यांना चळवळींचा अभ्यास करायचा आहे, त्यांनी ती जरूर ऐकली पाहिजे. एकदा समाज जागृत झाल्यानंतर स्वयंप्रेरणेने स्वत:चेच रक्षण तो स्वत: कसे करतो, त्याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. यावरुन हिंदू समाजाने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे, असे म्हणता येईल. पण, आता पुढे काय, असा प्रश्न कायम आहे. केवळ मुस्लीमद्वेषाचे राजकारण म्हणजेच हिंदुत्व, अशी ओळख राहणे हेच हिंदुत्वाला अपेक्षित आहे काय? या संदर्भात ते विवेचन होते. ते जर‘डिप्लोमॅटिक‘ आहे, असे शेफाली वैद्य यांच्यासारख्या उत्तम वैचारिक पार्श्वभूमी असणार्या चळवळीतील अभ्यासू घटकाला वाटत असेल, तर त्यावर अधिक विवेचनाची गरज आहे.
कोणत्याही चळवळीचे 'Matter of substance' आणि 'Matter of circumstances' असे दोन भाग असतात. चळवळ ही नकारात्मक, ‘आम्हाला काय नको’ हे सांगणारी असते. त्याचबरोबर काय हवे व त्याचे काय परिणाम होतील, याचाही विचार मांडण्याची आता वेळ आली आहे. समाजाच्या प्रश्नावर गणिती उत्तरे कधीच नसतात. त्यासाठी विविध शक्यतांचा शोध घेत जावे लागते. हिंदू समाजापुढचे पहिले आव्हान हे हिंदू समाजाच्या अस्मितांवर हल्ला करून त्याला ‘विचारस्वातंत्र्य’ हे गोंडस नाव द्यायचे, या वर्गाचा सामना कसा करायचा हे आहे, तर दुसरे आव्हान, जे धर्म आक्रमक पद्धतीने आपल्या धर्माचा प्रचार करतात, त्यांना तोंड कसे द्यायचे, हा आहे. यापैकी पहिल्या आव्हानामुळे दुसरे आव्हान कठीण बनले आहे. त्यामुळे या पहिल्या आव्हानाशी लढण्याचे कामही महत्त्वाचे आहे व त्यातील शेफाली वैद्य या बिनीच्या शिलेदार आहेत. माझे विवेचन हे दुसर्या आव्हानाशी निगडित आहे. एका पातळीवर या दोन्ही भूमिका पूरकही आहेत. ‘टाईम्स ऑफ इंडिया’चे माजी संपादक गिरीलाल जैन यांनी एका लेखात त्यांच्या शहाबुद्दीन यांच्याशी झालेल्या चर्चेचा संदर्भ दिला होता. शहाबुद्दीन यांनी त्यांच्याशी बोलताना ‘हिंदू-मुस्लीम प्रश्न‘ असा उल्लेख केल्यानंतर गिरीलाल जैन त्यांना म्हणाले, “भारतासमोरचा प्रश्न हिंदू-मुस्लीम प्रश्न असा नसून, मुस्लीम प्रश्न कसा हाताळायचा, या संबंधातील हिंदूंच्या मधील प्रश्न आहे.‘’ माझ्या मते, हिंदू समाजातील स्वत:ला पुरोगामी समजणारे, स्वयंघोषित हिंदू-मुस्लीम सामंजस्याचे पुरस्कर्ते हेच या संबंधात बाधा आणणारे प्रमुख घटक आहेत.
मुस्लीम प्रश्न - जागतिक प्रयत्न
मुस्लीम प्रश्न सोडविण्याचा हिंदू मार्ग कोणता असू शकतो, याचा विचार करण्यापूर्वी हा प्रश्न सोडवण्याचे जे काही प्रयत्न जगामध्ये झालेत किंवा होत आहेत, त्याचा थोडक्यात आढावा घेऊ. स्पेनमध्ये इसवी सन ७११ मध्ये प्रथम मुस्लीम आक्रमण झाले व नंतर जवळ जवळ ८०० वर्षे स्पेनच्या या ना त्या भागावर इस्लामचा ताबा राहिला. ८०० वर्षांनी तिथे ख्रिश्चनांनी मुस्लिमांचा पूर्ण पराभव केला. एकतर ‘ख्रिश्चन व्हा, देश सोडा किंवा मरायला तयार व्हा,’ असे तीन पर्याय मुस्लिमांना दिले. परंतु, धर्मनिष्ठा चिवट असते. वरवर ख्रिश्चन धर्म स्वीकारून गुप्तपणे इस्लाम धर्म पाळणारा नवा वर्ग तयार झाला. त्याचे समूळ उच्चाटन करायला पुढची सुमारे २५० वर्षे लागली. त्यानंतर स्पेनच्या यादवी युद्धात फ्रान्सिस फ्रँकोला मोरोक्कोच्या सैनिकांनी मदत केली, म्हणून १०० वर्षांपूर्वी त्याने मुस्लीम मोरोक्कन सैनिकांना मशीद बांधायला परवानगी दिली. आज जवळ जवळ डझनभर मोठ्या मशिदी स्पेनमध्ये आहेत. १९९४ साली स्पेनमध्ये ‘अल कायदा’ने प्रवेश केला. २००४ साली स्पेनच्या माद्रिद येथे रेल्वेत जिहादी बॉम्बस्फोट झाले. यांत मोरोक्को येथील दहशतवादी संघटनेचा हात होता.
२००४ साली स्पेनच्या माद्रिद येथे रेल्वेत झालेल्या जिहादी बॉम्बस्फोटाची छायाचित्रे
गेल्या काही वर्षांत ज्या अटका झाल्या, त्यात दहशतवादाशी संबंधित स्पॅनिश लोकांचाही मोठा सहभाग आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार ४२ टक्के स्पॅनिश लोक मुस्लिमांकडे संशयाने बघतात. दुसर्या महायुद्धानंतर तुर्कस्तानमधील खलिफाची राजवट इंग्रजांनी संपवली, १९२३ साली तिथे केमाल पाशाने सेक्युलर राजवट स्थापन केली. धार्मिक शिक्षणावर बंदी आणून आधुनिक शिक्षणाला सुरुवात केली. तुर्कस्तानचा अरब संस्कृतीशी संबंध तोडून युरोपीयन संस्कृतीशी जोडला. तुर्कस्तानचे लष्कर हे तिथल्या सेक्युलर राजवटीची हमी असेल, असे त्याने जाहीर केले. पण, २००३ साली रसीप तैय्यब एर्दोगान तुर्कस्तानचे पंतप्रधान झाल्यानंतर तुर्कस्तानचे सेक्युलर स्वरूप बदलून ते पुन्हा इस्लामी धर्माधिष्ठित राष्ट्र बनू लागले. २०१७ साली तुर्कस्तानात अध्यक्षीय राजवट सुरू झाली. एर्दोगान राष्ट्राध्यक्ष बनले व आज तुर्कस्तान हे मुस्लीम धर्माधिष्ठित राष्ट्र आहे व ज्या मोजक्या मुस्लीम देशांचा पाकिस्तानला पाठिंबा आहे, त्यात तुर्कस्तानचाही समावेश आहे. रशियामध्ये किमान दोन पिढ्या, तिथल्या कम्युनिस्ट राजवटीने तिथल्या नागरिकांना नास्तिकतेची शिकवण दिली, प्रार्थनास्थळे बंद केली, धर्मगुरूंना धर्मप्रचाराची बंदी केली. परंतु, त्याचा काहीही परिणाम झाला नाही. कम्युनिस्ट राजवट जाताच तिथे पुन्हा धर्मनिष्ठा उफाळून आली. रशियात जवळ जवळ सात टक्के मुस्लीम आहेत. काही काळ चेचन्या येथील मुस्लीम फुटीरतावाद्यांशी संघर्ष केल्यानंतर तूर्त पुतिन यांनी त्यांच्याशी जुळवून घेण्याचे ठरवले आहे. रशियामधील ख्रिश्चन हे ऑर्थोडॉक्स चर्चवर श्रद्धा ठेवणारे आहेत. त्यांच्यासाठी कॅथॅालिक चर्चवर श्रद्धा ठेवणार्या ख्रिश्चनांपेक्षा रशियन मुस्लीम अधिक जवळचे आहेत, असे पुतिन यांचे प्रतिपादन आहे. चीनमधील मुसलमानांना चिनी संस्कृतीत आणण्यासाठी चीन काय करीत आहे, याच्या बातम्या येत असल्याने त्याबाबत अधिक चर्चा करण्याचे कारण नाही. इस्रायलला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याचा इस्लामी शेजार रक्तरंजित संघर्षपूर्ण राहिला आहे.
““सुमारे पन्नास वर्षांपूर्वी सा.‘विवेक’च्या दिवाळी अंकात नारायण आठवले यांची कथा आली होती. त्याचा मतितार्थ असा. एका खोलीत रात्रीच्या वेळी दोन तरूण मित्र कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला शिवाजी महाराजांनी सन्मानपूर्वक परत पाठविले ते बरोबर की चूक, यावर तावातावाने चर्चा करीत होते. जर मुघल हिंदू स्त्रियांवर अत्याचार करीत असतील, तर त्याचा प्रतिशोध म्हणून महाराजांनीही त्या सुनेला कोणातरी सरदाराला देऊन टाकायला हवे होते, असा चर्चेचा सूर होता. तेवढ्यात बाहेर दंगल पेटल्याचे आवाज येऊ लागले व एक मुस्लीम तरूणी घाबरलेल्या अवस्थेत त्या खोलीत आली. तिने त्यांच्याकडे रात्रभर राहण्यासाठी विनंती केली. ती त्यांनी मान्य केली. दुसर्या दिवशी सकाळी ती तरूणी आभार मानून जात असताना या दोघांनी तिला विचारले की, “आम्ही दोघे हिंदू तरूण असतानाही तुला इथे सुरक्षित राहू असे वाटले?” त्यावर ती म्हणाली, “या खोलीत मी शिवाजी महाराजांचा फोटो पाहिला व इथे मी सुरक्षित राहू शकेन अशी मला खात्री वाटली व ती बरोबर ठरली.’‘ कथा वास्तवदर्शी नसल्या तरी ते समाजमनाचे प्रकटीकरण असते.””
जटील प्रश्न
मुस्लीम प्रश्न हा सोडवायला अत्यंत जटील प्रश्न आहे. युरोप, अमेरिकेतील लोकशाही, उदारमतवादी राजवटी असोत, तुर्कस्तानसारखी लष्करावर भिस्त असलेली इस्लामिक देशांतील सेक्युलर राजवट असो की रशिया, चीनमधील कम्युनिस्ट राजवटी असो, कोणालाच मुस्लीम मूलतत्त्ववादाला उत्तर शोधणे जमलेले नाही. इस्रायलमध्येही इस्लामला लोकशाही चौकटीत बसविण्याचा प्रयत्न असफल झाला आहे. या पार्श्वभूमीवर हिंदू समाजापाशी असे वेगळे काय आहे की, त्यामुळे या प्रश्नावर उत्तर काढण्याची शक्यता निर्माण होते, याचा विचार केला पाहिजे. याचे उत्तर हिंदू समाजाच्या समाजशास्त्रीय जडणघडणीत आहे. युरोपीय किंवा सेमेटिक धर्माचे समाज जिथे जिथे गेले, तिथे तिथे त्यांनी अन्य समाजाची लूट केली, त्या समाजांना गुलाम केले, त्या समाजांना नष्ट केले. हिंदू संस्कृतीची चिन्हे जगातील अनेक देशांत दिसतात. तिथे अशा गुलामीच्या, तिथल्या समाजाची लूट केल्याच्या, तिथले समाज नष्ट केल्याच्या आठवणी नाहीत. भारतातही असंख्य प्रकारचे संप्रदाय आहेत, जाती, जमाती आहेत, भाषा आहेत. ज्या एका-एका घटकांच्या भिन्नतेमुळे जगात संघर्ष सुरू असतात, असे कितीतरी घटक हिंदू समाजात विद्यमान आहेत. तरीही हिंदू समाज टिकून आहे. भारतावर ग्रीक, शक, कुशाण आदी अनेकांची आक्रमणे झाली. पण, त्यातील कोणी वेगळे आता ओळखून येणार नाहीत. भारताची आंतरिक दृढ एकात्मता हे या समाजाचे अंतरंग आहे व कमालीची विविधता हे त्याचे बाह्यांग आहे. अनेक देशांत देशच्या देश एका आक्रमणाच्या झंझावातात धर्मांतरित झाले. परंतु, या दृढ आंतरिक एकात्मतेमुळेच एवढ्या वर्षांच्या मुस्लीम राजवटीमुळे किंवा ख्रिश्चन मिशनर्यांच्या प्रयत्नांमुळेही अशिक्षित, दारिद्य्रावस्थेत राहणारे कोट्यवधी हिंदूही धर्मांतरित झाले नाहीत. इतिहासात हिंदू समाजाचे कोणतेही एक धार्मिक पीठ नव्हते, केंद्रीय राजसत्ता नव्हती. तरीही बहुसंख्य हिंदू समाज परकीय धार्मिक किंवा सांस्कृतिक आक्रमणाला एक समाज म्हणून एक राहिला, याचे कारण कोणती तरी एकच भाषा, परंपरा, जीवनपद्धती त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न केला नाही. आंतरिक एकतेची अनुभूती व व्यवहारातील स्वतंत्रता या दोन्हींच्या आकलनाचा आवाका आल्याशिवाय हिंदू समाजशास्त्रीय जडणघडणीची कल्पना येणार नाही. विविध समाज घटकांना आपल्यात समाविष्ट करून घेण्याची हिंदू धर्माची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे. इतिहासात ‘जर-तर’च्या भाषेला अर्थ नसतो, तरीही जर उत्तरकालीन मराठेशाहीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिभेचा किंवा पहिल्या बाजीरावांच्या कर्तृत्वाचा राज्यकर्ता मिळाला असता व भारतावर इंग्रजांचे राज्य आले नसते, तर भारतात मुस्लीम समाज कसा राहिला असता? असा प्रश्न मी प्रख्यात विचारवंत ज. द. जोगळेकर यांना विचारला होता. “एक जात म्हणून,” असे तत्काळ उत्तर त्यांनी दिले होते. “जर खिलाफत आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा देऊन ते अखिल भारतीय करून मुस्लिमांना त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव करून दिली नसती, तर गावागावांतील मुसलमान तिथल्या तिथल्या समाजगटात विरघळून गेले असते,” असे विधान ‘व्हॉईस ऑफ इंडिया’ या प्रकाशन संस्थेचे संपादक व हिंदुत्ववादी विचारवंत सीताराम गोयल यांनी मुंबईतील एका भाषणात केले होते. तत्पूर्वीची ‘मुस्लीम लीग’ ही काही सरंजामशहांपुरती मर्यादित होती. खिलाफत आंदोलनाने सर्वसामान्य मुस्लिमांना धार्मिक आधारावर राजकीय अस्मिता मिळवून दिली, या त्यांच्या भाष्यावर अभ्यास होणे गरजेचे आहे. आपली वेगळी ओळख टिकवूनही हिंदू समाजाच्या व्यापक प्रवाहात सहभागी होण्याची हिंदू समाजाची जी सामाजिक व्यवस्था आहे, ती अन्य सेमेटिक धर्म, संप्रदाय यांच्यात किंवा कम्युनिझमच्या इहवादी विचारात नाही, हे हिंदूंचे वेगळेपण आहे. तशी सहअस्तित्वाची भावना निर्माण करण्याकरिता काय करावे लागेल, हे उत्तर शोधण्याची गरज आहे.
राष्ट्रीयता हा संबंधांचा पाया
हिंदू-मुस्लीम संबंधात सर्वात मोठा अडथळा तथाकथित गांधीवादी व डाव्या व लिबरल म्हणवून घेणार्या लोकांचा आहे. त्यांच्या दृष्टीने ‘सेक्युलर’ याचा अर्थ हिंदू समाजाच्या अस्मितांची कुचेष्टा व मुस्लिमांच्या जातीयवादाचे अल्पसंख्याक म्हणून संरक्षण! जोवर या लोकांना हिंदू समाजात प्रतिष्ठा होती, त्यांचे वजन होते, तोवर त्यांनी मुस्लीम जातीयवादाचे संरक्षण व संवर्धन केले. परंतु, आता चित्र बदलत आहे. अरविंद केजरीवाल यांना अयोध्येत जाऊन रामाचे दर्शन घेणे, ही राजकीय अपरिहार्यता वाटते. जर ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान व्हायचे ठरविले असेल, तर प्रशांत किशोर त्यांनाही अयोध्येची यात्रा घडवून आणतील. आपणच अधिकाधिक कडवे हिंदुत्ववादी आहोत, हे दाखविण्याची स्पर्धा सुरू होईल. किंबहुना ती तशी झालीच आहे. शेफाली वैद्य यांच्यासारखा एक वर्ग त्याला अपवाद आहे. पण, आपण अपवादाबद्दल बोलत नाही. या पार्श्वभूमीवर सुयोग्य हिंदुत्वाची भूमिका काय असावी, यांवर विचारमंथन होणे गरजेचे व अपरिहार्य आहे. जवळ जवळ गेली १०० वर्षे हिंदुत्व संरक्षण, संवर्धन व विजयी होण्यात ज्या संघाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, त्यांच्यावर तर ती जबाबदारी विशेषत्वाने येते. एम. जे. अकबर यांनी एका लेखात म्हटल्याप्रमाणे, “एकविसाव्या शतकात राहणारा बहुसंख्य हिंदू समाज व मध्ययुगीन काळात राहू पाहणारा लक्षणीय संख्येतील अल्पसंख्य मुस्लीम समाज यांच्यातील परस्पर संबंध हे नेहमीच सुप्त ज्वालामुखी सारखे राहतील. कोणत्याही कारणाने त्याचा स्फोट होऊ शकतो. मग या दोन समाजात संवाद घडायचा कसा? एकतर हिंदू समाजाला मध्ययुगात जावे लागेल (जे इष्टही नाही व शक्यही नाही) किंवा मुस्लीम समाजाचे तोंड एकविसाव्या शतकाकडे वळवावे लागेल. ते कसे वळवायचे, हा कूटप्रश्न आहे. भारतात स्पेन, तुर्कस्तान, रशिया, चीन येथील उत्तरे चालणार नाहीत. तो हिंदू समाजाचा स्वभावही नाही आणि ते व्यवहार्यही नाही किंवा अमेरिका, युरोपीय राष्ट्रांप्रमाणे तो प्रश्न केवळ सेक्युलर, लोकशाही घटनात्मक ढाचावरही सोडून चालणार नाही. ते सर्व प्रयत्न अपयशी ठरले आहेत. इस्रायलप्रमाणे सातत्यपूर्ण संघर्षात राहून ती किंमत मोजणे हा एक पर्याय आहे. तो अनंत काळ परवडणारा आहे काय? की त्याला काही पर्याय असू शकतो? याचा शोध घेण्यासाठी मुस्लीम समाजाशी सातत्यपूर्ण संपर्क वाढवित राहणे अनिवार्य आहे. हा संपर्क वाढविताना हिंदूंची भूमिका कोणती असली पाहिजे, असाही प्रश्न त्यातून निर्माण होतो. त्याकरिता भारताला स्वत:चा असा हिंदू मार्ग शोधावा लागेल.
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधींनी हा प्रश्न सोडविण्यासाठी हृदयपरिवर्तनावर विश्वास ठेवला व तो प्रयोग पूर्णपणे फसला. सा. ‘विवेक’चे माजी संपादक राजाभाऊ नेने यांच्याशी या प्रश्नासंदर्भात चर्चा करीत असताना दीनदयाळ उपाध्याय यांनी या संदर्भात कोणता मार्ग सुचविला होता? असा प्रश्न मी त्यांना विचारला होता. ‘We should be nationally assertive, religiously tolerant and socially assimilative” ही त्रिसूत्री दीनदयाळजींनी सांगितली होती. दीनदयाळजींनी हा मार्ग सुचविला, तेव्हा जनसंघाची शक्ती अगदी मर्यादित होती व आपले सरकार 'Nationally assertive' वागू शकेल, असा विचारही मनात येणे अशक्य होते. आज सरकार असे वागू शकते, हे सिद्ध झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुढच्या दोन गोष्टी करण्याची जबाबदारी कोणालातरी उचलावी लागेल व तीही तारतम्याने भान ठेवून! मुस्लिमांना या देशात राहायचे असेल तर त्यांना राष्ट्रहिताच्या चौकटीत राहावे लागेल. तसे राहण्याची त्यांची जर तयारी असेल, तर हिंदूंना मिळणारे सर्व नागरी हक्क त्यांना घटनेद्वारे मिळणारच आहेत. स्वा. सावरकरांची भूमिकाही यापेक्षा वेगळी नव्हती. न्या. रानडे यांनी 'Spiritualise, Equalise and Humanise' असा आधुनिक भारताच्या उभारणीसाठी तीन शब्दांचा मंत्र सांगितला होता. न्या. रानडे व दीनदयाळ उपाध्याय या दोघांचेही तीन शब्दांचे मंत्र आपल्याला पुरेसे दिशादर्शन करणारे आहेत. या गोष्टी केवळ सांगण्यापुरत्या नाहीत. त्याचे उदाहरण बघायचे असेल, तर संभाजीनगर येथील डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाचे आहे. त्याचा यासंदर्भात समाजशास्त्रीय अभ्यास होण्याची गरज आहे.
Then what we are fighting for?
प्रश्न एवढाच आहे की, आज ज्यांनी ज्यांनी हिंदुत्वाची म्हणून कडवी भूमिका घेतली आहे, ती मुस्लीमद्वेषाची आहे की, निरोगी राष्ट्र घडविण्याची आहे? संघाची भूमिका राष्ट्र घडविण्याची म्हणजे 'Matter of substance' ची आहे. त्यात 'Matter of circumstances' म्हणून अनेक घटक सामील झालेले आहेत. या घटकांना जर हिंदुत्व चळवळीतील 'Matter of substance' कळला नाही, तर काळाचे संदर्भ बदलले की ते घटक एकतर क्षीणप्राय होत जातील किंवा त्रासदायक ठरत जातील. मोदी, योगी यशस्वी आहेत याचे कारण त्यांनी हिंदुत्व व प्रशासन कौशल्य याचा समन्वय घडवून आणला आहे. संघानेही हिंदू जीवनमूल्यांच्या आधारे हिंदू समाज टिकविण्याची भूमिका घेतली आहे. ही मूल्ये हजारो वर्षांच्या परंपरेतून आली आहेत. त्या मूल्यांचा बळी देऊन एकतर हिंदू समाज एकत्र टिकणार नाही व एकवेळ टिकला तरी त्याचे वेगळेपण राहणार नाही. हे नेमके कसे घडेल, याचे गणिती उत्तर अशक्य असते. दुसर्या महायुद्धात आपापल्या आघाड्यांवर जिंकत असताना जर्मनी रशियावर व जपान अमेरिकेवर हल्ला करून आत्मघात करून घेतील, असे कोणाला वाटले असते. जगात जेव्हा जेव्हा निर्णायक क्षण आले असता, नियतीने आपले दान विध्वंसापेक्षा, विनाशापेक्षा सकारात्मकतेच्या बाजूने टाकले आहे. त्यामुळेच मानव जात आजवर टिकून आहे. हा भाबडा विश्वास वाटू शकतो किंवा सकारात्मकतेवरील श्रद्धाही! मुस्लीम समाजातून मिळणार्या सकारात्मक संकेतांचा उपयोग करून पुढे जाण्या हिंदूंचे हित व व्यावहारिक शहाणपण दोन्हीही आहे. सरसंघचालकांनी हा एखाद्या खोलीत बसून काढलेला बुद्धिजीवी किंवा साक्षात्कारी निष्कर्ष नाही, तर जीवंत भेटीगाठीतून आलेली ती अनुभूती आहे.
दुसर्या महायुद्धात जनरल जॉर्ज मार्शल यांनी अमेरिकेचे ‘चीफ ऑफ स्टाफ’ म्हणून काम केले होते. अमेरिकेचे अध्यक्ष रुझवेल्ट यांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता. जोवर मार्शल अमेरिकेत आहेत, तोवर अमेरिकेला कोणतीही भीती नाही, असे ते सांगत. युद्धाच्या काळात विविध प्रकाशने सैनिकांना वाचण्यासाठी पाठविली जात. एका प्रकाशनात सरकारवर कडवट टीका केली होती. ते प्रकाशन सैनिकांमध्ये वाटू नये, अशी राष्ट्राध्यक्षांची इच्छा आहे, असा निरोप अध्यक्षांच्या स्वीय सचिवाने मार्शल यांच्या स्वीय सचिवांकडे दिला. जनरल मार्शल कागदपत्रे चाळत असता भीत भीत अध्यक्षांची इच्छा मार्शल यांच्या कानावर घातली. मार्शल यांनी आपले डोळे रोखत एकच वाक्य उच्चारले, ‘Then what we are fighting for?हा निरोप रुझवेल्ट यांना कळताच, ते घाईघाईने म्हणाले, “वाटून टाका!”
हिंदूंनी मुस्लिमांसारखे संकुचित मूलतत्त्ववादी व्हायचे की मुस्लिमांना हिंदूंसारखे सर्वसमावेशक करायचे, हा प्रश्न प्रत्येकाने आपल्या मनाला विचारला पाहिजे.