मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक २०२१मध्ये भारताचे अस्तित्व आता साखळी सामन्यातच संपण्याची शक्यात निर्माण झाली आहे. याचे कारण म्हणजे पाकिस्तान, न्यूझीलंडसोबत झालेले दारूण पराभव. यावेळी चहुबाजूने विराट कोहली आणि त्याच्या संघनिवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. गेल्या २ सामन्यात भारतीय संघाचा सर्व अनुभवी फिरकीपटू आर. अश्विनचा समावेश का करण्यात आलेला नाही? असा प्रश्न आता क्रीडाप्रेमी विचारत आहेत. यावर आता इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू निक कॉम्पटननेही हा प्रश्न उपस्थित केला आहे.
कॉम्पटनने ट्वीट केले आहे की, "मला समजत नाही, की कर्णधार विराट कोहलीसोबत बिघडलेल्या संबंधांमुळे अश्विनला संघात जागा मिळालेली नाही का? तुम्हाला वाटते का कर्णधाराला इतकी स्वायत्तता मिळायला पाहिजे?" असे प्रश्न उपस्थित केले आहेत. काही दिवसांपूर्वी माध्यमांच्या हवाल्याने एक बातमी पसरली होती की, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर काही वरिष्ठ खेळाडूंनी विराटची तक्रार बीसीसीआयकडे केली होती. यामध्ये अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा यांच्यासोबतच आर. अश्विनचेदेखील नाव पुढे आले होते. मात्र, यावर अधिकृतरित्या कोणीही दुजोरा दिला नाही.
याआधीदेखील इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाने ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळली होती. या चारही कसोटी सामन्यांमध्ये भारताचा सर्वोत्तम फिरकीपटू ख्याती असलेल्या आर. अश्विनचा अंतिम ११मध्ये समावेश करण्यात आला नव्हता. यावेळीही दोघांच्या नात्यामध्ये तणाव असल्याच्या बातम्या चर्चेत आल्या होत्या. सध्या सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेसाठी आर अश्विनचा मोठ्या कालावधीनंतर संघात समावेश केला गेला होता. सराव सामन्यात अश्विनने शानदार गोलंदाजी केली होती. मात्र, तरीही अतिमहत्त्वाच्या सामन्यांमध्ये त्याचा अंतिम ११मध्ये समावेश नसल्याने असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.