ठाणे : महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी भिवंडीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुस्लीम बांधवांना डोके शांत ठेवण्यासाठी पानसुपारी, पानमसाला खाण्याचा अजब सल्ला दिला. त्यांनी म्हंटले की, "जास्त मांस खाऊन डोके गरम करू नका. तुमचे डोके शांत ठेवा. तुमच्या विरोधकांना हेच हवे आहे की तुमचे डोके गरम व्हावे. परंतु तुम्ही शांत राहा, डोक्यावर बर्फ ठेवा."
भिवंडी शहरातील जकात नाका परिसरात कोणार्क बिल्डिंगमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हा अध्यक्ष शोएब खान गुड्डू यांच्या कार्यालयाचे उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील उपस्थित होते. या दरम्यान कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला होता. तसेच कलम १४४चे उल्लंघन देखील या ठिकाणी झाल्याने निजामपूर पोलिस ठाण्यात आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजपदेखील आक्रमक झाली. "जे स्वत:च, मारहाणीच्या प्रकरणात जेलमध्ये जाऊन आलेले आहेत. ते शांत राहण्याचा सल्ला देत आहेत. असे म्हणत पानपराग खा, गुटखा खा सांगणाऱ्या आव्हाडांवर गुन्हा दाखल करा," अशी मागणी भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे. मुस्लीम बांधवांना सल्ला देण्यापेक्षा त्यांची डोकी भडकावणाऱ्या रझा अकादमीवर बंदी घाला. मगच तुम्हाला यावर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे, असा सल्लादेखील त्यांनी आव्हाड यांना दिला.