‘समृद्धी प्रकाशन’ संस्थेच्यावतीने देण्यात येणारा ‘संत नामदेव साहित्य पुरस्कार’ डोंबिवलीतीलडॉ. वृंदा कौजलगीकर यांच्या ‘मराठी ग्रामीण कादंबरी उगम आणि विकास’ या पीएच.डीच्या प्रबंध पुस्तकाला मिळाला आहे. यानिमित्ताने डॉ. वृंदा कौजलगीकर यांचा जीवनप्रवास जाणून घेऊया...
‘समृद्धी प्रकाशना’कडून संत नामदेव साहित्य पुरस्कार २०२१ करिता साहित्य मागविण्यात आले होते. भारतातील मराठी व हिंदी भाषिक साहित्याचा त्यात सहभाग होता. त्यामध्ये कथा, कादंबरी, काव्य, नाट्य, प्रवासवर्णन, संपादन, संशोधन, वैचारिक, चरित्र, समीक्षा, बालसाहित्य, ललित साहित्य इत्यादी विविध प्रकारांतील दि. १ जानेवारी २०१६ ते दि. ३१ डिसेंबर, २०२० पर्यंत प्रकाशित झालेले साहित्य मागविण्यात आले होते. यामध्ये डोंबिवलीतील डॉ. वृंदा कौजलगीकर यांनी त्यांच्या पीएच.डीच्या विषयाचे तयार केलेले पुस्तक पुरस्कार नामांकनासाठी पाठविले होते. त्यांच्या या पुस्तकाला ‘संत नामदेव साहित्य पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
वृंदा यांचा जन्म लातूर येथे झाला. त्यानंतर त्या सोलापूरमध्ये स्थायिक झाल्या. त्यामुळे त्यांचे शालेय शिक्षण ‘हिरीबाई देवकरन’ या शाळेत झाले. बीए, एमए आणि बीएड ‘संगमेश्वर महाविद्यालय’ आणि ‘दयानंद महाविद्यालया’तून पूर्ण केले. वृंदा यांचे १९७९ साली लग्न झाले व त्यानंतर त्या डोंबिवलीत आल्या. डोंबिवलीतील पांडुरंगवाडी येथे त्या वास्तव्याला आहेत. लग्नानंतर काही वर्षांच्या कालवधीनंतर त्यांनी एम.फील आणि पीएच.डी मुंबई विद्यापीठातून पूर्ण केली. एम.फील त्यांनी १९९३ साली प्राप्त केली, तर पीएच.डी १९९९ साली पूर्ण करून ‘डॉक्टरेट’ पदवी त्यांनी मिळविली. पीएच.डीच्या विषयावरती त्यांनी पुस्तक तयार केले आहे व त्या पुस्तकाला राष्ट्रीय पारितोषिक मिळाले आहे.
वृंदा शाळेत असताना अनेक उपक्रमांमध्ये हिरिरीने सहभागी व्हायच्या. एकांकिका, गणोशोत्सवात अनेक कार्यक्रम दिग्दर्शित करायच्या. वृंदा यांच्या आई राधाबाई कुगावकर या सातवीच्या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातून प्रथम आल्या होत्या. त्याकाळी महिला फारशा शिक्षण घेत नव्हत्या. त्यामुळे राधाबाई यांनी मिळविलेले यश सर्वांसाठीच कौतुकाचा विषय होता. त्यांना कविता लिहिण्याचीदेखील आवड होती. त्यांच्याकडूनच लिखाणाचा वारसा वृंदा यांना मिळाला. एमए आणि बीएड्चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ‘राजाराम महाविद्यालया’त आणि सोलापूर महापालिकेत काही काळ नोकरी केली.
वृंदा या माटुंग्यातील खालसा महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या. १९८४ ते २०१० पर्यंत त्यांनी इथे सेवा दिली. कनिष्ठ महाविद्यालयात त्या विभागप्रमुख म्हणून कार्यरत होत्या. मराठी विषय त्या विद्यार्थ्यांना शिकवत. नोकरी करत असतानाच एम.फील आणि पीएच.डी पूर्ण करण्याचे त्यांनी ठरविले. अनेक दिवसांपासून त्यांची इच्छा पुढील शिक्षण घेण्याची होती. मात्र, कौटुंबिक कारणांमुळे त्यांना शिक्षण घेता येत नव्हते. कौटुंबिक जबाबदारी सांभाळत त्यांनी पुढील शिक्षण पूर्ण करण्याचे मनाशी पक्के ठरविले. त्यादृष्टीने पाऊल उचलत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. एम.फीलचा विषय ‘आनंद यादव यांच्या गोतावळा कादंबरीचे मूल्यमापन’ असा होता. तो वाढवून वृंदा यांनी पीएच.डीचा विषय ‘१९६० नंतरची मराठी ग्रामीण कादंबरी’ हा घेतला होता. त्याचे आता पुस्तक केले असून त्याला ‘मराठी कादंबरी : उगम आणि विकास’ असे नाव दिले आहे. उस्मानबाद येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या पुस्तकातील स्त्रीजीवन त्यांनी मांडले होते.
वृंदा या ‘ज्येष्ठ नागरिक संघ रघुवीरनगर’ या संघाच्या माजी अध्यक्षा आहे. मसापच्या कार्यकारिणीतसुद्धा त्या आहेत. जिजाऊ महिला ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा आहेत. ‘फेस्कॉम’चा उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून त्यांना पुरस्कार मिळाला आहे. दिवाळी अंकात कथालिखाण त्या करतात. आचार्य अत्रे यांची नाटके त्यांनी पुनर्जीवित केली आहेत. ‘पाणिग्रहण’ या नाटकाचे पुनरुज्जीवन केले होते. देशस्थ ऋग्वेदी संघातर्फे कल्याणच्या ‘आचार्य अत्रे सभागृहा’मध्ये त्या नाटकाचा प्रयोगदेखील त्यांनी केला होता. एवढेच नाही, तर त्यांनी त्यात अभिनयदेखील केला. त्यानंतर विविध ठिकाणांहून नाटकांच्या प्रयोगासाठी त्यांना आमंत्रित करण्यात येत होते. त्यानुसार अनेक ठिकाणी त्यांनी त्याचे प्रयोग केले आहेत. वरळीला ‘नेहरू सेंटर’मध्ये नाटक सादर केल्यानंतर जब्बार पटेल यांनी सत्कार केला होता. शालेय जीवनात एकांकिका करीत असल्याने त्यांना अभिनय करणे सहज शक्य झाले. घरात कोणी अभिनय करीत नव्हते. अभिनय हा गुण त्यांच्यात उपजतच होता. वडिलांना अभिनय करणे फारसे आवडत नव्हते. त्या गाण्यांच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतात.
‘आम्ही सिद्धलेखिका ठाणे’ असा त्यांचा डोंबिवलीतील काही लेखिकांचा ग्रुप आहे. त्या ग्रुपवरील विषयांवर त्या लिखाण करतात. वृंदा यांच्या पहिल्या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे अनुदान मिळाले. ‘मनरेखा’ असे त्या कथासंग्रहाचे नाव आहे. या कथासंग्रहाला केशव मेश्राम यांची प्रस्तावना मिळाली आहे. कवितासंग्रह ‘गंध मनाचे’ प्रकाशित झाले. ‘उनाडक्या’ एकांकिकेला नाट्य परिषदेचे पारितोषिक मिळाले. ही महाविद्यालयीन जीवनावर आधारित एकांकिका आहे. ‘कथावृंद’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. ‘मराठी कादंबरी : उगम आणि विकास’ या प्रकाशित झालेल्या पुस्तकाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. अशा या हरहुन्नरी लेखिकेला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा...!