सर टायटस सॉल्ट-खारपाटील ते लोकरपाटील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

salt_1  H x W:


डॅनियल सॉल्ट हा मोठा उद्योगी इसम होता. तो फक्त विकून थांबला नव्हता. तो शेतीसुद्धा करायचा, मेंढ्या पाळून त्यांच्या लोकरीचे कपडे बनावायचा. इतरही अनेक बारीकसारीक उद्योग करायचा. कल्पक डोकं असणार्‍या प्रत्येक उत्पादकाची, प्रत्येक व्यापार्‍याची एक महत्त्वाकांक्षा असते. आपण अशी काहीतरी वस्तू बनवायची किंवा विकायची की, जी अन्य कुणाकडेही उपलब्ध असणार नाही.





हरिवंशातली कृष्ण, रुक्मिणी आणि मिठाची कथा प्रसिद्ध आहे. कृष्ण प्रत्येक राणीला एकेका पक्वान्नाचं नाव घेऊन, त्या पक्वान्नासारखी ‘तू मला आवडतेस’ असं सांगतो. रुक्मिणीला तो म्हणतो की, “तू मला मिठासारखी आवडतेस.” त्यावर इतर राण्या रुक्मिणीला हसतात. कारण, पक्वान्न श्रेष्ठ आणि मीठ म्हणजे अगदीच कनिष्ठ. मग एक दिवस कृष्ण सगळ्यांची व्यवस्थित फिरकी घेतो. जेवणातल्या एकाही पदार्थात मीठ घालू नका, अशी आज्ञा तो पाकशाळेच्या प्रमुखांना देतो. मीठ नसलेला पदार्थ घशाखाली उतरत नाही, असं म्हटल्यावर सर्व राण्यांना मिठाचं जेवणातलं स्थान म्हणजेच पर्यायाने रुक्मिणीचं कृष्णाच्या जीवनातलं स्थान कळून चुकतं.नोकरदार लोक दर महिन्याला जे वेतन किंवा पगार घेतात, त्याला इंगजीत ‘सॅलरी’ म्हणतात. मूळ लॅटिन भाषेत ‘सॅल’ म्हणजे ‘सॉल्ट’ किंवा मीठ. रोमनकालीन युरोपात मीठ हे इतकं मौल्यवान होतं की, रोमन सैनिकांना काही वेळा पगार म्हणून रोख रकमेऐवजी मीठ दिलं जात असे. त्यावरून ‘सॅलरी’ हा शब्द निघाला आणि तोच रुढ झाला.
 


 
भारतात पश्चिम किनार्‍यावर गुजरात आणि महाराष्ट्र, तर पूर्व किनार्‍यावर तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये समुद्राच्या पाण्यापासून मीठ बनवलं जातं. भारतातल्या मिठाच्या उत्पादनात गुजरातचं मीठ हे सर्वोत्कृष्ट असतं. ‘करकच’, ‘बरगरा’, ‘कप्पा’, ‘क्यार’, ‘पॅन’, ‘रेस्ता’ आणि ‘वजनी’ या भारतात बनणार्‍या मिठाच्या वेगवेगळ्या जाती किंवा प्रकार आहेत.गुजरात आणि महाराष्ट्रात ‘खरवा’ किंवा ‘खारवी’ या नावाचा एक ज्ञातिसमाज मुख्यतः या मीठ उत्पादनाच्या क्षेत्रात काम करताना आढळतो. पूर्वी हे लोक स्वतः मिठागरं बांधून त्यातून मीठ उत्पादन करीत असत. आता मीठ उत्पादन क्षेत्रातही मोठ्या-मोठ्या कंपन्या उतरल्यामुळे हे लोक शेतमजुरांप्रमाणेच कंत्राटी किंवा रोजंदारी पद्धतीने काम करतात. या लोकांना एकेकाळी ‘खारपाटील’ अशी पदवी होती. ती नेमकी कुणी दिली होती, हे माहीत नाही. परंतु, मुसलमानी सल्तनतींच्या पूर्वी गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर यादव, शिलाहार, चालुक्य या राजवटींचा अंमल होता, तेव्हा रयतेच्या अत्यंत आवश्यक अशा मीठ नावाच्या वस्तूचं पीक काढणार्‍या या जमातीला या हिंदू राजवटींपैकीच कुणीतरी ही मानाची पदवी दिली असावी.




 
मीठ पिकवण्याचा हाच परंपरागत धंदा करणार्‍या माणसाला इंग्लंडमध्ये म्हणतात, ‘ड्रायसॉल्टर.’ जसा ‘ब्लॅकस्मिथ’ म्हणजे लोहार किंवा ‘गोल्डस्मिथ’ म्हणजे सोनार; तसा मीठ वाळवून ते बाजारात आणून विकणारा तो ‘ड्रायसॉल्टर.’ इंग्लडमध्ये मीठ समुद्राच्या पाण्याला आगारात घेऊन त्यांच बाष्पीभवन घडूवन बनवण्याची पद्धत नाही. इंग्लंडमध्ये मिठाच्या म्हणजे खार्‍या पाण्याच्या विहिरी आहेत. ते पाणी बाहेर काढायचं, वाळवून त्याचं मीठ बनवायचं. हा डॅनियल सॉल्ट या माणसाचा धंदा होता. पिढ्यान्पिढ्या हा व्यवसाय करीत असल्यामुळे त्यांच्या कुळाचं आडनावच पडलं होतं ‘सॉल्ट.’परंतु, डॅनियल सॉल्ट हा मोठा उद्योगी इसम होता. तो फक्त विकून थांबला नव्हता. तो शेतीसुद्धा करायचा, मेंढ्या पाळून त्यांच्या लोकरीचे कपडे बनावायचा. इतरही अनेक बारीकसारीक उद्योग करायचा. कल्पक डोकं असणार्‍या प्रत्येक उत्पादकाची, प्रत्येक व्यापार्‍याची एक महत्त्वाकांक्षा असते. आपण अशी काहीतरी वस्तू बनवायची किंवा विकायची की, जी अन्य कुणाकडेही उपलब्ध असणार नाही. डॅनियल सॉल्ट नेहमी असं काहीतरी ‘एक्सक्लुझिव्ह’ करण्याच्या खटपटीत असायचा. हुबेहूब त्याने लोकरीचं सूत बनवण्याची स्वत:ची कंपनीच काढली. १८२० मध्ये त्याचा पोरगा टायटस हा त्याच्या हाताशी आला. टायटस हा बापापेक्षाही अधिक कल्पक, धडपड्या आणि लटपट्या होता. मेंढ्यांच्या लोकरीचे विविध प्रकार, रेशीम आणि साधं सूत यांची विविध प्रकारे गुंफण करून उत्कृष्ट कपडा बनवण्याचे प्रयोग तो सतत करीत असायचा. विशेष म्हणजे, अशी वेगवेगळी कापड विणण्यासाठी हातमाग किंवा यंत्रमागांमध्ये वेगवेगळ्या सुधारणाही त्याला सुचायच्या.





आपल्या महाराष्ट्रात १९ व्या शतकापर्यंत पुरुषांचा पोषाख धोतर, बाराबंदी अंगरखा, डोक्याला पगडी, पागोटं किंवा मुंडासं आणि गळ्याभोवती उपरणं असा असायचा. २० व्या शतकाच्या पूर्वार्धात हा पोषाख थोडा बदलला. खास मराठी पद्धतीची करवत काठी, रुईफुल्ली काठी किंवा बाजीरावी धोतरजाऊन त्यांची जागा ‘मँचेस्टर’च्या अधिक तलम धोतरांनी घेतली. अंगातला बाराबंदी अंगरखा जाऊन तिथे छातीवर गुंड्या म्हणजे बटणं आणि पोटापासून बंद असा सदरा आला आणि या सदर्‍यावर इंग्रजी पद्धतीचा कोट घालण्याची ‘फॅशन’ आली. डोक्यावरही पगडी, पागोटं, फेटा, रुमाल हे प्रकार जाऊन गोल किंवा कोन असलेली पुठ्ठ्याची टोपी आली. सर्वसाधरणपणे असं म्हणता येईल की, बालगंधर्वांच्या नाटकांच्या अमाप लोकप्रियतेमधून पोषाखाची ही नवी पद्धती रुढ झाली. यातला कोट हा प्रकार पूर्णपणे नवीन होता. तत्कालीन ‘फैनाबाज’ (पक्षी ‘फॅशनेबल’) पुरुषांना धोतर जसं ‘मँचेस्टर’चंच हवं असायचं, तसा कोटदेखील ‘अल्पाका’चाच हवा असायचा. ‘अल्पाका’चा कोट म्हणजे काय? त्याचा थेट संबंध ‘टायटस सॉल्ट’शी आहे.




 
इंग्लंडच्या थंड हवामानामुळे तिथे गरम लोकरी सूट वापरणं, हे अपरिहार्यच असतं. आता हा लोकरी कपडा अधिकाधिक उबदार आणि त्याचबरोबर चमकदार कसा दिसेल, यासाठी तर टायटस सॉल्ट वेगवेगळे प्रयोग करून पाहत होता. सन १८३६ मध्ये एकदा तो लिव्हरपूलला गेला होता. लिव्हरपूल हे इंग्लंडमधील प्रख्यात बंदर आहे. त्यामुळे धंद्याच्या कामासाठी टायटसला वरचेवर लिव्हरपूलला जावं लागायचं. तिथे एका गोदामात त्याने अडगळीत पडलेले बरेच लोकरीचे गुंडे पाहिले. कित्येक वर्षांपूर्वी कुणीतरी व्यापार्‍याने दक्षिण अमेरिकेतल्या पेरू देशातून मागवलेली ती लोकर उठाव नसल्यामुळे अक्षरश: धूळ खात पडली होती. टायटसने चौकशी केली, तेव्हा त्याला असं समजलं की, दक्षिण अमेरिकेत ‘अल्पाका’ या नावाचा प्राणी आहे, तो दिसतो उंटासारखा, पण उंचीला मेंढीसारखा असतो नि मेंढीसारखीच त्याच्या अंगावर लोकर येते.




 
टायटसला काय वाटलं कुणास ठाऊक! त्याने त्यातले काही गुंडे उचलले नि घरी आणले. व्यवस्थित साफ केल्यावर त्याला ती लोकर बर्‍यापैकी हलकी आणि चमकदार वाटली. झालं! लगेच त्याने ती रेशीम आणि साधं सूत यांच्या मिश्रणातून बनवून पाहिली आणि काय आश्चर्य! वजनाला हलका पण चांगला उबदार आणि भलताच चमकदार, आकर्षक कपडा तयार झाला. टायटस धावत लिव्हरपूलला गेला. त्याने ते धूळ खात पडलेले सगळे गुंडे अत्यल्प किमतीत खरेदी करून आणले आणि ‘अल्पाका’ या एका नव्याच लोकरीच्या कपड्याचा जन्म झाला. इंग्लंमधल्या आणि युरोपातल्याही अन्य उत्पादकांनी मेंढपाळांनी मेंढ्यांबरोबर ’अल्पाकां’चेही नवे कळप पाळायला नि त्यांची नवी पैदास करण्यास सुरुवात केली.





टायटस सॉल्ट आता इंग्लंडमधला नामवंत व्यापारी, कारखानदार बनला. पुढे त्याला ‘सर’कीदेखील मिळाली, याच काळात इंग्लंडमध्ये आणि एकंदरीतच पश्चिमी देशांमध्ये असंख्य वैज्ञानिक शोध लावूनविविध प्रकारचे कारखाने निघू लागले. त्याचबरोबर त्या कारखान्यांच्या मालकांनी मजुरांना अल्प वेतनावर अमर्याद काळापर्यंत राबवणं वगैरे प्रकारही वाढत चालले. मजुरांच्या या शोषणाबद्दलच पुढे कार्ल मार्क्सने आवाज उठवला. त्यातून समाजवादी-साम्यवादी चळवळी उभ्या राहिल्या वगैरे...






पण, टायटस सॉल्ट या माणसाला कार्ल मार्क्सच्याही आधी आपल्या कारखान्यातल्या मजुरांबद्दल कळवळा निर्माण झाला होता. इंग्लंडमध्ये ब्रॅडफर्ड या शहरापासून जवळच त्याने आपली नवी सूत गिरणी उभी केली. तेव्हाची पद्धत म्हणजे कारखानदाराने आपल्या सोईच्या जागी कारखाना उभा करावा. मजुरांनी तिथे येऊन काम करावं आणि ठरलेला पगार घ्यावा. बाकी मजुरांचा प्रवास, त्याचं आरोग्य, त्यांच्या सुखसोयी अशा गोष्टी कारखानदारांच्या खिजगणतीतहीनसत. टायटस सॉल्टने ‘सॉल्टेसर’ या नावाचीआपली नवी सूत गिरणी उभी करताना फक्त गिरणीच नव्हे, तर अख्खं गावच उभं केलं. गिरणीच्या भव्य आणि हवेशीर इमारतीसह तिथे अडीच हजार कामगारांसाठी घरं, दुकानं, शाळा, ग्रंथालय, चर्च आणि लहान रुग्णालय अशा सर्व सोईंनी सुसज्ज अशी वसाहतच निर्माण झाली.
 





ही गोष्ट १८५३ सालची आहे. दि. २० सप्टेंबर, १८५३ या दिवशी टायटस सॉल्टच्या ५० व्या वाढदिवशी त्याने या गिरणीचं आणि या गावाचं उद्घाटन केलं. अडीच हजार कामगार आणि इंग्लडभरातले नामवंत एक हजार आमंत्रित अशा साडेतीन हजार लोकांना एक जंगी मेजवानी देण्यात आली.आपल्या कारखान्यात काम करणार्‍या मजुरांना किमान माणुसकीने वागवावं असंदेखील जेव्हा इतर मालकांना वाटत नव्हतं. त्या काळात टायटस सॉल्टने आपल्या कामगारांना एवढा सन्मान का दिला? त्याच्या स्वत:च्याच शब्दांत सांगायचं, तर ‘माझ्याकडे काम करणार्‍यांचं भलं व्हावं, असं मला वाटलं.’ टायटस सॉल्ट अतिशय धार्मिक होता. त्यामुळे त्याला अशी प्रेरणा झाली असली आणि नेमकं त्याचवेळी कार्ल मार्क्स म्हणत होता, ‘धर्म ही अफूची गोळी आहे.’


 




@@AUTHORINFO_V1@@