‘पेटीएम’च्या शेअर घसरणीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काहीही परिणाम होऊ शकत नाही. मात्र, मूठभर लोकांचा ज्यांच्याकडे गुंतवणुकीसाठी अतिरिक्त पैसा होता, अशांचे मात्र नुकसान झाले.
‘ई-पेमेंट’मध्ये आघाडीवर असणार्या ‘पेटीएम’च्या ‘वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड’ या कंपनीने ‘आयपीओ’ (इनिशियल पब्लिक ऑफर) भांडवली बाजारपेठेत विक्रीस आणला होता. ‘आयपीओ’ म्हणजे कंपनी आपल्या भागभांडवलाची सार्वजनिक विक्री करुन निधी जमविते. कोणत्याही कंपनीला नूतनीकरणासाठी, विकासासाठी, नवीन उत्पादन बाजारात आणण्यासाठी, नवे युनिट उभारण्यासाठी, उपकंपनी स्थापन करण्यासाठी किंवा खेळत्या भांडवलाची गरज भागविण्यासाठी निधी लागतो.
जर बँकेकडून यासाठी कर्ज घेतले, तर त्यासाठी बरेच सोपस्कार करावे लागतात. काही ठरावीक कालावधीनंतर व्याज भरावे लागते; पण जर भागभांडवल विक्रीस काढले आणि जर कंपनी फायद्यात असेल, तर भागधारकांना लाभांश दिला जातो. लाभांश दिलाच पाहिजे, अशी कंपन्यांवर सक्ती नसते. ज्यांनी समभाग विकत घेतलेले असतात, त्यांनी विकत घेतलेल्या भावापेक्षा शेअरचा भाव जास्त झाला की, विकून फायदा मिळवायचा. त्यामुळे कंपन्या शेअरविक्रीचा मार्ग स्वीकारतात. प्रत्येक शेअर विक्रीस काढणार्या कंपनीला नियंत्रक यंत्रणेची परवानगी घ्यावी लागते. भारताची नियंत्रक यंत्रणा म्हणजे ‘सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया’ अर्थात ‘सेबी.’ ‘पेटीएम’चा ‘आयपीओ’ बाजारात आला म्हणजे त्यांनी ‘सेबी’ची परवानगी घेतलेलीच असणार. म्हणजे ‘सेबी’लाही शेअर विक्री वैध व कायदेशीरमार्गाने होणार असल्याची खात्री पटली, असेच लक्षात येते.
‘पेटीएम’चा एक शेअर खरेदीदारांनी २,१५० रु. इतक्या रकमेस खरेदी केला होता. शेअर विक्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेअर बाजारात ‘लिस्टिंग’ कार्यक्रम होतो. म्हणजे तो शेअर, शेअर बाजारात सूचिबद्ध होतो. ‘लिस्टिंग’लाच या शेअरची १९५ रुपये इतकी घसरण झाली. रुपये २,१५० ला विकत घेतलेला हा शेअर १,९५५ रुपये ‘लिस्ट’ होतो. हा सर्वात मोठा ‘आयपीओ’ होता. लोकांना भव्यदिव्यचे नेहमीच आकर्षण असते.
त्यामुळे हा समभाग सूचिबद्ध झाल्यानंतर आपल्याला भरपूर नफा मिळवून देईल, या आशेवर असणार्या असंख्य गुंतवणूकदारांची हा शेअर गेल्या गुरुवारी व सोमवारी कोसळल्यामुळे प्रचंड निराशा झाली. या शेअरच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे ५१ हजार, १९४ कोटी रुपयांचे नुकसान झाले. या ‘पेटीएम’च्या शेअर घसरणीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काहीही परिणाम होऊ शकत नाही. मात्र, मूठभर लोकांचा ज्यांच्याकडे गुंतवणुकीसाठी अतिरिक्त पैसा होता, अशांचे मात्र नुकसान झाले.
भारताच्या लोकसंख्येपैकी दहा टक्के लोकही शेअरबाजारात ‘ट्रेडिंग’ करीत नाहीत. शेअर बाजार म्हणजे काय? तेथे नेमके चालते तरी काय? याचीही माहिती नसणारे कोट्यधीश लोक भारतात असतील. १,९५५ रुपये मूल्यावर सूचिबद्ध झालेल्या या समभागात गुरुवारी दिवसभरात तब्बल २७.२५ टक्क्यांनी घसरण झाली होती. शेअरचा भाव १,५६४ रुपयांपर्यंत खाली आला होता. राष्ट्रीय शेअर बाजारातही हा शेअर २७.३४ टक्क्यांनी गडगडून, १,५६२ रुपयांवर स्थिरावत होता. ‘पेटीएम’च्या ‘आयपीओ’ला मोठा प्रतिसाद मिळाला होता. पण, फार मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देणारे हेच गुंतवणूकदार चांगलेच तोंडावर आपटले. १८ हजार, ३०० कोटी रुपयांच्या या ‘आयपीओ’साठी १.८९ पटीने अधिक मागणी नोंदवली होती. या ‘आयपीओ’चे ४ कोटी, ८३ लाख शेअर विक्रीस उपलब्ध असताना ९ कोटी, १४ लाख शेअरची मागणी नोंदविण्यात आली होती.
यामुळे ज्यांना शेअरचे वाटप झाले नाही, ते स्वत:ला नशीबवान समजत असावेत. गेल्या शुक्रवारी गुरुनानक जयंतीनिमित्त शेअर बाजार बंद होता. त्यामुळे शेअर बाजाराचे कामकाज गेल्या गुरुवारनंतर एकदम गेल्या सोमवारी झाले. त्या दिवशीही ‘पेटीएम’चा शेअर १६ टक्क्यांनी घसरला. गुरुवार व सोमवार अशा दोन दिवशी गुंतवणूकदारांचे ३९ टक्क्यांपर्यंत नुकसान झाले. सोमवारी बाजार बंद होतेवेळी या शेअरचा भाव १,३६० रुपये होता. म्हणजे २,१५० रुपयांना विकत घेतलेला शेअर आठवड्याभरात ७९० रुपयांनी घसरला. ज्यांना १०० शेअरचे वाटप झाले असेल, त्यांचे तोट्याचे प्रमाण ७९ हजार रुपये इतके झाले. समभागांत घसरण झाल्याने कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा यांच्या संपत्तीत दहा हजार कोटी रुपयांहून अधिक घट झाली आहे. समभागांचे अवमूल्यन होत असल्याने ‘अँकर’ गुंतवणूकदार आर्थिक अडचणीत आले आहेत. कारण, त्यांना ३० दिवसांपर्यंत समभागांची विक्री करता येत नाही. ‘अँकर’ गुंतवणूकदारांची ८ हजार, ३२५ कोटी रुपयांची गुंतवणूक यात आहे.
मूल्य १२ हजारांपर्यंत घसरणार
‘मॅक्वायरी’ या ‘ब्रोकरेज हाऊस’ने दिलेल्या माहितीनुसार, ‘पेटीएम’च्या शेअरमध्ये ४४ टक्क्यांची घसरण होऊन तो १,२०० रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. परिणामी, या पुढेही गुंतवणूकदारांना अधिक नुकसान होऊ शकते. खरेतर कंपनीचे कामकाज, कंपनीला झालेला फायदा आणि तोटा, कंपनी ज्या व्यवसायात आहे, या क्षेत्रातली वाढती स्पर्धा यांसह कंपनीच्या अनिश्चित भविष्याविषयी साशंकता लक्षात घेता, तज्ज्ञांनी ‘पेटीएम’मध्ये पैसे गुंतविणे फायदेशीर ठरणार नाही, असे सांगितले असतानाही, जर गुंतवणूकदार मूर्खपणा करत असतील तर त्याची अद्दल त्यांना घडली, हे एकाअर्थी बरेच झाले. ‘पेटीएम’ला ‘गुगल पे’ची प्रचंड स्पर्धा आहे. या कंपनीने या शेअर विक्रीतून लोकांच्या व अन्यांच्या खिशातून १८ हजार, ३०० कोटी रक्कम जमविली आहे. अर्थात, हा ‘शेअर’ पुन्हा वर जाईलही. डिजिटल अर्थव्यवस्थेचा एक फार मोठा भाग ‘पेटीएम’ आहे, पण सध्यातरी गुंतवणूकदार निराश आहेत. भारतीयांच्या जीवनाचा ‘पेटीएम’ भाग झालेला असल्याने हा ‘शेअर’ घोडदौड करेल, असा जाणकरांचा अंदाज होता. पण, तसे मात्र झाले नाही.
शेअर बाजारात जोखीम प्रचंड असते. शेअर नाही म्हटला, तरी थोडासा जुगारासारखाच प्रकार आहे. गेले एक वर्ष ‘आयपीओ’चे प्रचंड पीक येत आहे. येणारा प्रत्येक ‘आयपीओ’ फायदा करुन देईलच, असा चुकीचा विचार कोणीही करू नये. विकत घेतलेल्या मूल्यापेक्षा ‘लिस्टिंग’ कमी मूल्याला होऊ शकते, हा विचार पक्का हवा. सार्वजनिक शेअरविक्रीला शेअर बाजारात ‘मार्केट’ म्हणतात. ‘प्रायमरी मार्केट’मध्ये गुंतवणूक केल्यास, ‘लिस्टिंग’ कोणत्या रकमेला होईल, हे माहीत नसते. शेअरच्या विक्रीमूल्यापेक्षा जास्त रकमेवरही होऊ शकते, कमी रकमेवरही होऊ शकते. एकदा शेअर ‘लिस्ट’ झाला व त्याचे ‘ट्रेडिंग’ सुरू झाल्यावर त्याला ‘सेकंडरी मार्केट’मध्ये होणारे व्यवहार असे म्हणतात. त्यामुळे ‘प्रायमरी मार्केट’मध्ये गुंतवणूक न करता, जर ‘सेकंडरी मार्केट’मध्ये केली, तर तुम्हाला शेअरचे मूल्य असते.
यापुढे ‘आयपीओ’च्या जाहिरातीत जोखीमेचा उल्लेख स्पष्टपणे यायला हवा, असे ‘सेबी’चे म्हणणे आहे. कामकाजात, व्यवहारात किती जोखीम आहे, याचा स्पष्ट उल्लेख असावयास हवा. प्रत्येक गुंतवणूकदाराला हे माहीत हवे की, ‘आयपीओ’ ही शेअर बाजारातून पैसे कमविण्याची एकमेव सुवर्णसंधी नाही. अनेक जाणकार असे सांगतात की, तुम्ही ‘सेकंडरी मार्केट’मधून चांगले शेअर खरेदी करा व ही गुंतवणूक दीर्घमुदतीची करा, यातून तुम्हाला चांगला परतावा मिळेल. ‘आयपीओ’पासून दर राहा. शेअरमध्ये गुंतवणूक करणार्यांनी कंपनीची प्राथमिक माहिती जाणून घ्यायला हवी. कंपनीचा ‘ट्रॅक रेकॉर्ड’ व भविष्यातील ‘प्रोजेक्शन्स’ जाणून घ्यायला हवे.
काही जणांचे असे म्हणणे आहे की, या कंपनीने जो रु. २,१५० या रकमेस शेअर विक्रीस काढला, ती रक्कम जास्त होती. सर्वसाधारणपणे प्रत्येक शेअरचे दर्शनी मूल्य १० रुपये असते, पण दहाच रुपये असते असेही नाही. ते कमीही असू शकते, जास्तही असू शकते. कंपनीच्या गेल्या काही वर्षांच्या आर्थिक कामगिरीचा अभ्यास करून या शेअर विक्रीसाठी नेमण्यात आलेल्या ‘मर्चंट बँकर’ व ‘लिड मॅनेजर’ कंपन्या किती किमतीस शेअर विक्रीस काढावयाचे, हे ठरवितात. कोणतीही कंपनी स्वत: हा निर्णय घेऊ शकत नाही. शेअरचे विक्रीमूल्य कोणत्या आधारे काढले आहे, याचा तपशील मात्र ‘मर्चंट बँकर’, ‘लिड मॅनेजर’ कंपन्या, कंपनीच्या व्यवस्थापकांना देतात आणि ‘सेबी’ जेव्हा शेअर विक्रीस मान्यता देते, त्यात शेअरच्या विक्रीमूल्यासही मान्यता देते.
‘सेबी’च्या शेअर विक्रीस परवानगी देण्याच्या प्रक्रियेत, शेअर विक्रीच्या मूल्याची ते योग्य आहे की नाही, याची छाननी येते. हा शेअर रु. २,१५० मूल्याचा होता, यापूर्वी याहून अधिक मूल्याचे शेअरही विक्रीस आले आहे. त्यामुळे हा शेअर ‘ओव्हरव्हॅल्यूड’ होता, या म्हणण्यात तसा काही आधार नाही. केंद्र शासनाने शेअरचे विक्री मूल्य ठरविण्यासाठी आणखी एखादी यंत्रणा निर्माण केली, तरी त्याने काहीही फरक पडणार नाही. यामुळे काही लोकांना रोजगार मिळतील, पण शेअरविक्रीची परवानगी मिळण्यापूर्वी सध्यापेक्षा जास्त कालावधी लागेल.
शेअर का चढतो? का उतरतो? याचे समर्पक उत्तर कोणीही देऊ शकत नाही. शेअरमध्ये चढउतार म्हणजे २ + २ = ४ असे अंकगणित नाही. स्वत:ला ‘अॅनालिस्ट’ म्हणविणारेही कोणता शेअर चढेल किंवा कोणता उतरेल, हे निश्चितपणे सांगू शकत नाहीत. ते केवळ ठोकताळे मांडतात. एक-दोन ठोकताळे योगायोगाने खरे ठरले, तर ते स्वत:ला ‘शेअर अॅनालिस्ट’ असे म्हणायला लागतात. कृषी कायदे मागे घेतले म्हणून शेअर बाजार पडला, असे कारण देण्यात आले होते. केंद्र सरकारला चीनला लडाखमध्ये रोखण्यात असमर्थ ठरते आहे, म्हणूनही म्हणे शेअरबाजार खाली आला, असेही कारण काही दिवसांपूर्वी देण्यात आले होते.
शेअर बाजार का वर जातो किंवा का खाली जातो किंवा एखाद्या कंपनीचा शेअर का चढतो? का घसरतो? याची तार्किक कारणे कोणीही देऊ शकत नाहीत. सगळे अंदाज व्यक्त केलेले असतात. शेअर बाजारात असे गमतीने म्हणतात की, ‘अमेरिकेचा अध्यक्ष शिंकला, तरी भारतात शेअर बाजार खाली येऊ शकतो.’ शेअर बाजार म्हणजे अनिश्चितता! शेअर बाजार म्हणजे पूर्ण जोखीम, हे नेहमी लक्षात ठेवा. गुंतवणूकदारांच्या ‘सेंटिमेंटल’ना व्यवहारात महत्त्व असते. त्यांच्या ‘सेंटिमेंटल’वर सर्व ‘ट्रेडिंग’ होतात.
‘पेटीएम’च्या ‘आयपीओ’त सामान्य किरकोळ गुंतवणूकदारांनी एकूण २,०८१ कोटी रूपयांची गुंतवणूक केली व ५६७ कोटींचा तोटा सोसला. गुंतवणूक हा पैसे कमविण्याचा एकप्रकारचा व्यवसायच आहे. व्यवसायात कधी तोटा होणार, कधी नफा होणार. तेव्हा व्यवसाय करताना दोन्ही स्वीकारण्याची तयारी ठेवावी. शेअर वर गेला की जसा नफा कमवता, तसा खाली गेला की तोटा त्याच उमेदीने स्वीकारायला पाहिजे.
गुंतवणूकही बर्याच पर्यायांमध्ये करावी. त्यापैकी एक पर्याय ‘आयपीओ’ असावा. सर्व गुंतवणूक ‘आयपीओ’त टाकू नये. ‘आयपीओ’ निवडताना कंपनीचा ‘ट्रॅक रेकॉर्ड’ पाहावा. आता ‘एलआयसी’चा ‘आयपीओ’ येणार आहे, अशा ‘आयपीओ’त बिनदिक्कत गुंतवणूक करावी. सर्वांच्या ‘सेंकडरी मार्केट’मध्ये ‘ट्रेडिंग’ करणे शक्य नाही, अशांनी म्युच्युअल फंडांच्या पर्यायातून शेअर बाजारात गुंतवणूक करावी.