शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा व माझा प्रथम जवळून संबंध आला तो सन २००५ साली, ‘शिवसृष्टी’ प्रकल्पाच्या निमित्ताने. निमित्त होते ‘शिवसृष्टी’ प्रकल्पाच्या तांत्रिक टीमची निवड. पुण्यातील विश्रामबागवाडा येथे मुलाखतीच्या निमित्ताने प्रथमचं जाण्याचा योग आला. मुलाखतीदरम्यान ‘शिवसृष्टी’ प्रकल्पाविषयी माहिती सांगितली. शिवचरित्राचा प्रचार आणि प्रसार यासाठी आंबेगाव बु. येथे ‘शिवसृष्टी’ उभी करत आहोत. मुलाखती दरम्यान मी किती पाण्यात आहे, हे जोखण्यासाठी मुलाखतकारांनी मला माझ्या विषयातलं ज्ञान तपासून पाहणारे काही प्रश्न विचारले. आणि मी बरोबर उत्तरं दिल्यावर माझी मुलाखत संपली. मुलाखत झाल्यावर मला थोडे थांबायला सांगितले होते. ‘शिवसृष्टी’ प्रकल्प बांधणीच्या व शिवचरित्राचे प्रसार व प्रचाराच्या कार्यात आपलाही खारीचा वाटा असावा, असे त्यावेळी मनोमन वाटून गेले होते. मी बाहेरच्या दालनामध्ये बसलो होतो. बाकीच्या मुलाखती संपल्यानंतर मला आत बोलावण्यात आले व हातावर पेढा ठेवला. तोंड गोड झाले आणि सांगितले, “तुमची निवड झाली आहे.”
मुलाखत घेतेवेळी आतल्या दालनामध्ये लोडला टेकून एक विलक्षण बोलके डोळे असणारी, कोरलेली दाढी, गोरापान रंग, पूर्ण चंदेरी झालेले केस, तीक्ष्ण नजर आणि जाकीटामुळे ऋषिमुनींसारखा दिसणारा अंधुकशा प्रकाशात बसलेल्या व्यक्तीचे माझ्याकडे बारकाईने लक्ष होते. पण, ही व्यक्ती कोण हे मला माहित नव्हतं.
आत बसलेली व्यक्ती म्हणजे साक्षात शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब होते. ते बाहेर आले आणि मी लगबगीने उठून त्यांचे दर्शन घेतले. मी गोंधळून गेलो आहे हे त्यांनी ओळखलं असावं. एवढा शिकलेला ज्ञानवृद्ध माणूस. माझ्यासारख्या पामराला भेटला आणि मी त्यांच्याशी नीट बोलू शकेन का? या विचाराने माझ्या अंगाला घाम फुटला होता. पाय लटपटत होते. छाती धडधडत होती. त्यांनी मजेशीर बोलून माझी चिंता एकदम दूर पळवून लावली. त्यावेळी त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवून माझे नाव विचारले व आपुलकीने चौकशी केली. मी नाव सांगितले विलास भिमराव कोळी. लगेच मला नावानिशी म्हणजे ‘विलासराव’ म्हणूनच संबोधायचे.
विलासराव एवढ्या लांबून आलात जेवणाचे काय, घरी कोण कोण असतं वगैरे इकडची तिकडची जुजबी माहिती विचारून, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनापासून स्फूर्ती व प्रेरणा मिळावी, या उद्देशाने त्यांच्या जीवनावर कायमस्वरूपी ‘शिवसृष्टी’ बांधण्याची योजना आपल्या प्रतिष्ठानने आखली आहे. पुण्याजवळ आंबेगाव बुद्रुक येथे महाराष्ट्र शासनाकडून या प्रकल्पासाठी २० एकर जागा खरेदी केलेली आहे. शिवचरित्रांचे व शिवकालीन जीवनाचे जीवंत दर्शन घडवणारे एक नगरच आपण तिथे तयार करणार आहोत. या नगरामध्ये प्रवेश केल्यावर आपण १७व्या शतकातील शिवकालातच वावरत आहोत असे वाटावे, अशी योजना केलेली आहे.” त्यावेळी त्यांनी काही फोटो व स्केचेसही मला दाखवले. “या प्रकल्पाची प्राथमिक तयारी पूर्ण झाली आहे. आदिशक्ती तुळजाभवानी यश देईलच अशी आशा आहे,” असे त्यावेळी बाबासाहेब म्हणाले होते, हे आजही जसेच्या तसे मला आठवते.
मी प्रथमच विश्रामबागवाडा पाहिला होता. विश्रामबाग वाड्यात दगडकाम, लाकूडकाम, शस्त्रागार, तेथील उच्च प्रतीचे सागवानी लाकडावर कोरलेली नक्षी, चकचकीत लावलेले तेल. छताला लटकवलेली हंड्या झुंबरं, दगडकाम पाहून मी भारावून गेलो. माझे जीवन खेडेगावात गेले असल्यामुळे शहरी झगमगाट नाही, डामडौल नाही, मोठी ज्ञानवृद्ध माणसं नाहीत, या एवढ्या सजवलेल्या वाड्यात काय काम चालत असेल म्हणून उत्सुकताही होती. ही वास्तू एवढी सुशोभित आणि देखणी व स्वच्छ कशी अशा अनेक प्रकारच्या प्रश्नांचे काहूर माझ्या मनात होतेच.
अत्यंत साधी राहणी, विनम्र स्वभाव आणि अतिशय लाघवी शब्द. आपण कोणा जवळच्या नातेवाईकांच्या किंवा मित्राच्या घरात असल्यासारखा भाव मनात येत होता. तेवढ्यात बाबासाहेबच म्हणाले, “या सदरच्या वास्तूचा काही भाग हा आपल्या ‘महाराजा शिवछत्रपति प्रतिष्ठान’ या संस्थेला पुणे महापालिकेने शिवचरित्र प्रसार व प्रचार करण्याच्या कार्यासाठी दिला आहे.” याच वास्तूत ‘जाणता राजा’ या महानाट्याची रंगीत तालीम चालते, ही माहितीही त्यांनी त्यावेळी दिली होती. पहिल्याच भेटीत त्यांनी मला आपलसं करून टाकलं होतं.
शाळेत असल्यापासून बाबासाहेबांची व्याख्याने ऐकत होतो. आता प्रत्यक्ष त्यांची भेट झाली होती आणि माझ्यासारख्या पामराला ते भरभरून माहिती सांगत होते. त्यांच्या छत्रछायेखाली वावरण्यास मिळत होते, हे माझे मोठे भाग्यच होते. अशा भाग्यवंतांचे मार्गदर्शन, सहवास मला व माझ्यासारख्या असंख्य जणांना लाभले. वयाच्या १००व्या वर्षापर्यंत त्यांचा हा यज्ञ चालू होता. बाबासाहेब यांच्यामुळे मी कितीतरी मोठी माणसं दोन हातांवरून पाहिली, अनुभवली, त्यांच्याशी गप्पागोष्टी केल्या.
‘शिवसृष्टी’ प्रकल्पातील बांधकामाचे मूल्य समजावून देताना ते ज्या सहजतेने सांगायचे ते थक्क करणारे असायचे. त्यातील तपशीलाबाबतची जागरुकता खूप जाणवायची आणि बांधकामे निर्दोष करण्याची प्रेरणाही द्यायची. बांधकामातील बारकावे आणि त्याचे महत्त्व ते असे पटवून द्यायचे की त्यामुळे त्यांच्या आणि माझ्या वयात कितीही अंतर असलं तरी त्यांच्याबरोबर काम करण्यास कोणतीही अडचण येत नसे. लोकांच्या अडचणींचे भान, दुसर्याला मदत करण्याची वृत्ती हे त्यांचे आणखी काही विलोभनीय पैलू... त्यांचा जनसंपर्क, लोकसंग्रह उत्तम असल्यामुळे ते वयाच्या शंभरीतही कार्यरत राहिले. नेहमी ‘अपडेट’ राहिल्यामुळे ते कधीही कालबाह्य वाटले नाहीत. ते त्यांच्या वयाच्या माणसांबरोबर न दिसता सतत तरुणांमध्ये दिसतात. जुन्या-नव्या लोकांशी संवाद साधत राहिल्यामुळे चिरतरुण व उत्साही व प्रेरणा देत राहिले.
एक गंमत सांगतो, माझी मुलगी बारावी पास झाली, त्या निमित्ताने जनता सहकारी बँक, बाजीराव रोडच्या तिसर्या मजल्यावरील ऑफिसमध्ये प्रतिष्ठानतर्फे सत्कार ठेवला होता. त्यावेळी प्रतिष्ठानचे सर्व विश्वस्त, इतिहासकार, सल्लागार, आणि प्रकल्पामधील सर्व सेवक वर्ग उपस्थित होता. सत्काराच्या वेळी बाबासाहेबांनी मुलीला किती टक्के मार्क पडले म्हणून विचारले, तिने सांगितले ६८ टक्के. त्यावेळी माझ्याकडे पाहून बाबासाहेब लगेच म्हणाले, “विलासराव, मार्क फार कमी आहेत, तुम्ही घरी अभ्यास घेत नाहीत का? ‘शिवसृष्टी’ प्रकल्पाप्रमाणेच जरा घराकडेही लक्ष देत चला!” अजून काय पाहिजे...
आदरणीय बाबासाहेबांच्या मार्गदर्शनात काम करायला मिळणे हे मोठे भाग्यच! वेळेचे विलक्षण भान, कामांतील काटेकोरपणा, नीटनेटकेपणा, शिस्त यावर अतिशय बारकाईने देखरेख ठेवणे हा बाबासाहेबांचा हातखंडा होता. प्रत्येक गोष्टीवर त्यांची बारीक नजर असायची. कुठलीही गोष्ट त्यांच्या नजरेतून सुटत नसायची. ‘शिवसृष्टी’त आल्यावर बांधकामातील काही त्रुटी सांगितली आणि ती पुढील भेटीत जर सुधारलेली नसेल, तर बाबासाहेब लगेच म्हणत, “विलासराव, आपले परवा त्या संबंधात बोलणे झाले होते, अजून ते काम झालेलं दिसत नाही.” ते काम का झाले नाही, म्हणून लगेच जाब विचारायचे. कामात त्यांना हलगर्जीपणा अजिबात आवडायचा नाही. त्यांच्याकडे वेळेला फार महत्त्व होते. ते वेळेच्या नंतर गेलेले मी पाहिले नाहीत. किंबहुना, अगोदर ५-१०-१५ मिनिटे कार्यक्रमाच्या जागी हजर असायचे. वेळेबाबत ते नेहमी सांगत की, “छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना वेळेवर अचूक नियोजन करून अनेक लढाया केल्या त्या जिंकल्यादेखील!”
“ ‘शिवसृष्टी’ प्रकल्पाचे काम कुण्या एकट्याचे नाही, तर ते तुम्हांआम्हां सर्वांचे आहे,” हे ते आवर्जून सांगायचे. एवढ्या दिवसांच्या तपस्यांनंतर स्वप्नातील ‘शिवसृष्टी’ साकारात आहे, म्हटल्यावर बाबासाहेब सरकारवाड्याचे काम चालू असताना अनेकवेळा आले. चाललेले काम बरोबर चालले आहे ना ते वरचेवर पाहायचे. ते कुठपर्यंत आले, त्यात आपणाला काय पाहिजे, याबाबतीत स्वतः बाबासाहेब ‘शिवसृष्टी’तील सेवक, तांत्रिक टीम, स्थपती, वास्तुविशारद, ठेकेदार, गवंडी, सुतार, पाथरवट, बेलदार, रंगारी, चितारी अशा हरहुन्नरी माणसांबरोबर चर्चा करत. ते करत असलेल्या कामाचे कौतुक करत. दाखला वजा एखादे उदाहरण देत. एखादे चांगले काम करायचे असेल तर त्यांनी लहान असो वा थोर, अज्ञानी असो वा ज्ञानी, बाबासाहेबांनी त्याविषयीची माहिती सांगताना कुठलीही आडकाठी ठेवली नाही. म्हणून प्रकल्पातील कामे अचूकपणे झाली. बाबासाहेब नेहमी सांगायचे, “तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात, त्या क्षेत्रात तुम्ही स्वत:ला झोकून दिले पाहिजे.” एवढेच नव्हे, तर त्यांच्या अनंत कामातील वेळात वेळ काढून अगदी कितीही घाई गडबड असेल तरी ‘शिवसृष्टी’ प्रकल्पावर येऊन चाललेले काम स्वतः डोळ्याखाली घातलेले पाहून आमचाही काम करण्याचा उत्साह द्विगुणित करत. एवढेच नव्हे, तर जिज्ञासापूर्वक बारीकसारीक माहितीही ते आम्हाला सांगत असत.

बाबासाहेबांमुळे कितीतरी लोक इतिहास संशोधक, अभ्यासक, वाचक, किल्लेप्रेमी, नाटक, सिनेमा, मालिका, ट्रेकर्सप्रेमी यांचे ते प्रेरणा बनले. यातून अभ्यासक तयार झाले, लेखक लिहिते झाले, लोकं वाचायला लागली, लोकांमध्ये आस्था निर्माण झाली. ते गडकिल्ल्यांवर जाऊ लागले आणि आता ‘शिवसृष्टी’ प्रकल्पामुळे हा प्रवाह पुढे किती वळणं घेईल माहित नाही. बाबासाहेब पुरंदरे अशा व्यक्तिमत्वाला भेटता आलं, जवळून पाहता आलं, त्यांना अनुभवता आलं, हे मी माझ भाग्यच म्हणेन! ‘शिवसृष्टी’ प्रकल्पात आल्यावर ते माझ्या खांद्यावर हात ठेवत व म्हणत, “विलासराव, तुम्ही फार मोठं काम करतायं हे लक्षात असू द्या! ही कामगिरी ईश्वराने तुमच्या हातून करून घेतलेली आहे.” त्यावेळी शंभर हत्तींचे बळ अंगात येत असे. असे प्रसन्न वदनी, मातृवत्सल, प्रेमळ स्वभावाचे बाबासाहेब आज आपल्यात नाहीत, ही खंत मनाला खाते. शिवचरित्राला ब्रह्मांडापार नेऊन ठेवणार्या आणि इतिहासाच्या प्रत्येक पानासाठी आपलं आयुष्य चंदनाप्रमाणे झिजवणार्या शिवतपस्वी भास्कराचा अस्त... शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही अर्पण करतो. आता तो मायेचा हात खांद्यावर नसणार.
- विलास कोळी
(लेखक ‘शिवसृष्टी’चे बांधकाम पर्यवेक्षक आहेत.) ९७६३०८४४९९