एसटी कर्मचारी उपाशीपोटी काम करी; अन् आदित्य ठाकरेंची ‘स्कॉटलंड वारी’

मुंबई भाजप प्रभारी आ. अतुल भातखळकर यांचे टीकास्त्र

    19-Nov-2021
Total Views |

ST _1  H x W: 0

मुंबई : स्कॉटलंड देशातील ग्लासगो येथे आयोजित पर्यावरण बदल परिषदेस (कॉप-26) कोणतेही अधिकृत निमंत्रण नसतानासुद्धा राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणाच्या नावाखाली निकटच्या अधिकार्‍यांना सोबत घेत पर्यटन करण्याचे काम चालविले आहे.
 
त्यामुळे इकडे ‘एसटी कर्मचारी उपाशीपोटी काम करी अन् आदित्य ठाकरेंची पर्यावरणाच्या नावाखाली विनानिमंत्रण जनतेच्या पैशांवर स्कॉटलंड वारी’ अशी टीका मुंबई भाजपचे प्रभारी आणि कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.“या परिषदेस केवळ देशाच्या प्रमुखांनाच परवानगी असतानासुद्धा आदित्य ठाकरे हे कोणत्या अधिकारात ग्लासगोला गेले होते? त्याचे त्यांना निमंत्रण होते का?
 
राज्यात मागील तीन आठवड्यांपासून एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरू असताना परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार यांना सहकुटुंब सोबत घेऊन जाण्याचे कारण काय? पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अधिकार्‍यांचा खर्च जनतेच्या पैशांतून का करण्यात आला? एवढा लवाजमा सोबत नेत आदित्य ठाकरे यांनी त्या परिषदेतून महाराष्ट्रासाठी काय आणले?
 
या सर्व प्रश्नांची आता मुख्यमंत्र्यांनीच उत्तरे द्यावी व या संपूर्ण पर्यटन दौर्‍याचा खर्च हा आदित्य ठाकरे यांच्याकडूनच वसूल करावा,” अशी आग्रही मागणीसुद्धा आ. अतुल भातखळकर यांनी यावेळी केली आहे.“मुंबईसह राज्यातील आठ शहरांना वायुप्रदूषणाचा विळखा पडलेला असताना व अतिविषारी प्रदूषणामुळे दिवसागणिक शेकडो नागरिक आजारी पडत असताना राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे केवळ पर्यटनात मग्न आहेत,” अशी टीकासुद्धा आ. भातखळकर यांनी यावेळी केली आहे.