आजच्या वैकुंठ चतुर्दशी आणि त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त महाभारतातील शिव-विष्णुसहस्रनाम तथा श्रीशंकर नि श्रीनारायणाचे ऐक्य कथन करणारा लेख...
आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनंत देवता आणि त्यांच्या असंख्य पूजापद्धती रूढ आहेत. पूजनासमवेत स्तोत्रांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे नि धार्मिक वाङ्मयातला अत्यंत
लोकप्रिय स्तवन प्रकार आहे. त्यामध्ये वेदसूक्तापासून ते प्राचीन-अर्वाचीन संत-महापुरुषांनी केलेल्या रचनांचा एकत्र समावेश
करायचा म्हटला, तर लक्षावधी पाने खर्ची होतील.
सहस्रनाम
हे नामावली प्रकारचे स्तोत्र आहे.सहस्रनामाचे प्रयोजन असे
की, त्या त्या देवतेप्रति भक्तांच्या मनात अतीव श्रद्धा,
निष्ठा, प्रेम आणि भक्ती अधिकाधिक दृढ व्हावी,
हे होय. महाभारतकाळापासून देवाधिदेव श्रीशंकर आणि
पुरुषोत्तम श्रीमहाविष्णू या दोन देवतांची लोकप्रियता आणि प्रस्थ संपूर्ण भरतवर्षात
मान्य झालेले. याचा पुरावा म्हणून या दोन्ही देवतांची सहस्रनामस्तोत्रे
याच महाभारतात यावी यानेच सिद्ध होते. यानिमित्ताने परमात्म्याची
दिव्य गुणविभूती लोकाभिमुख करण्याच्या महान कार्यासाठी कृष्णद्वौपायन महर्षी श्रीव्यास
यांच्या चरणांशी कितीही वेळा साष्टांग प्रणिपात केला, तरी तो
पुरे पडणार नाही. श्रीशिव आणि श्रीविष्णू हे निर्विवाद परब्रह्म
स्वरूपच आहे. ‘कठोपनिषदां’त विष्णूचे वर्णन
‘तद्विष्णोः परमंपदम्।1:3:9’ असे त्याचे स्वरुप
परमात्म्याशी जोडले आहे. शंकराचे वर्णन श्वेताश्वतरोपनिषदामध्ये
‘एको हि रुद्र न द्वितीयाय तस्थुः।’ असे केले आहे.
तथापि महाभारतात शिव-विष्णू या दोनही देवांची सारखीच
स्तुती केली, किंबहुना कधी माधवाने महेश्वराची आराधना करावी,
तर कधी त्र्यंबकाने त्रिविक्रमाची! असा समन्वय
प्रत्यक्ष भगवंतानेच केलेला दिसेल. गीतेमध्येही भगवान श्रीकृष्ण
म्हणतात - रुद्राणां शङ्करश्चास्मि। (गीता
10:23) रूद्रामध्ये शंकर मी आहे, तर हरिवंशात कृष्णाची
स्तुती करताना शंकराचा मुखी संहारे रुद्रनामासि। संहारकाळी रुद्र ही संज्ञा धारण करणारा
तो विष्णू होय, असे दुजोरा देणारे वचन आहे.
महाभारतातील
शिव आणि विष्णुसहस्रनामस्तोत्र यातील साम्य, तथा वैकुंठ चतुर्दशी आणि
त्रिपुरारी पौर्णिमेच्या उत्सवाच्या अनुषंगाने शिव-विष्णू ऐक्य
महात्म्य आपल्या समोर सादर आहे.
पूर्वार्ध : पहिले सहस्रनाम श्रीशंकराचे-
शांतिपर्वातील ‘मोक्षधर्मपर्वा’मधल्या 284व्या अध्यायांत दक्ष प्रजापती कृत शिवाची अष्टोत्तरसहस्र नामांनी स्तुती आली आहे.त्याची कथा अशी-
दक्षाने अश्वमेध यज्ञ आरंभिला. महादेवाला जाणीवपूर्वक न बोलावून त्यात भर म्हणून दक्षाने त्याचा अपमानास्पद उच्चार करणे हे दधीचि ऋषींना न रुचून शंकराचा कोप मात्र दक्षाने ओढवून घेतला, असे उद्विग्न होऊन म्हटले. देवी सतीने यज्ञस्थळी केलेल्या देह विसर्जनाने क्रोधित झालेल्या महादेवाच्या मुखामधून एक अक्राळविक्राळ भूत निर्माण झाले तो वीरभद्र. त्याला शिवाची आज्ञा मिळताच दक्षाच्या यज्ञाचा पूर्ण विध्वंस करून टाकला. नंतर शंकर तिथे प्रगत होऊन दक्षाने क्षमा मागून त्याने महादेवाची 1008 नामांनी स्तुती गायली. ती युधिष्ठिराने भीष्मांना निवेदन करण्यास सांगितली. तो भाग या अध्यायांत आला आहे. याची रचना पाहता, यजुर्वेदातल्या रुद्राध्यायाची सहज आठवण येते. शब्दांची रचना, काही नामे जशीच्या तशी रुद्राध्यायातून घेतलेली दिसतात. उदाहरणादाखल काही देतो-
नमो भवाय शर्वाय रुद्राय वरदाय च।
पशूनां पतये नित्यं
नमोऽस्त्वन्धकघातिने ॥
नमः स्तुताय स्तुत्याय
स्तूयमानाय वै नमः।
सर्वाय सर्वभक्षाय सर्वभूतान्तरात्मने॥
या सहस्रनामांत
काही ठिकाणी ‘नमः’ आणि चकाराच्या प्रयोग असल्याने
रुद्राध्याय म्हटल्याचा भास होतो. हे झाले शांतिपर्वातल्या महादेवाचे
अष्टोत्तरसहस्रनाम स्तोत्र.
दुसरे सहस्रनाम
पशुपतिनाथ
श्रीशंकराचे ‘अनुशासनपर्वा’तील ‘दानधर्मपर्वा’त 17व्या अध्यायांत
शिव अष्टोत्तरसहस्रनाम स्तोत्र आहे. हे महादेवाचे नाममाहात्म्य
उपमन्यु ऋषींनी श्रीकृष्णास सांगितले, ते कृष्णानेच युधिष्ठिरास
पुढे निवेदन केले. या स्तोत्राच्या प्रयोजनाची कथा याच पर्वातल्या
14, 15, आणि 16व्या अध्यायापर्यंत येऊन पुढे मूळ
स्तोत्र आहे. युधिष्ठिर महाराज भीष्माचार्यांना महादेवाची नावे
कथन करण्यास सांगतात. तेव्हा भीष्म शंकराचे अचिंत्य, व्यापकरूपाचे गुण वर्णन करणे, त्यांना अशक्य असून,
मात्र एक भगवान नारायणाला ते शक्य आहे, असे म्हणतात.
एष शक्ते महाबाहुर्वक्तु भागवतो गुणान्। विभूतिं चैव कार्त्स्नेन सत्यां
माहेश्वरीं नृप॥ (अनु. 14:16) भीष्मांच्या
प्रेमळ आग्रहामुळें श्रीकृष्ण शिव सहस्रनामाचा महिमा सांगतो. ती कथा-
कृष्णाची
पत्नी जाम्बवती हिने पुत्रप्राप्तीची इच्छा पतिराजाजवळ प्रकट केली आणि ज्या प्रकारे 12 वर्षे तपाचरण करून रुक्मिणीदेवीला उत्तम पुत्र दिले, तसेच आपणांसही व्हावे, अशी इच्छा प्रकट केली.
पत्नी जाम्बवतीची इच्छा तत्काळ पूर्ण करण्यासाठी वासुदेव हिमालयात वास्तव्य
असलेल्या उपमन्यु ऋषींच्या आश्रमात आले. तिथे वासुदेवाचे काम्यव्रत
समजून घेऊन ऋषींनी त्यांस धर्मदण्डासह शिवाच्या मंत्राची दीक्षा दिली. अधोक्षज वासुदेवाने आशुतोष महादेवाची अत्यंत कठीण उपासना करून प्रसन्न करून
घेतले. भगवान शंकर आणि देवी पार्वतीने कृष्णांस उत्तम वर देऊन
तृप्त केले. हा सगुण साक्षात्काराचा प्रसाद कृष्णाने उपमन्यु
ऋषींना कथन केला, तेव्हा ऋषिवरांनी तंडिकृत रुद्रस्तव सांगितले.
भगवान महादेवाची कृपा संपादण्याकरिता तंडिऋषींनी उग्र तप केलेले.
शंकर प्रसन्न होऊन तंडिऋषींना आशीर्वाद दिला. ब्रह्मदेवाने
पूर्वी देवांना शंकराची दहा सहस्र नावे सांगितली, पण शास्त्रांत
जी सहस्रनामे आली ती ब्रह्मदेवाने तंडिला सांगितली. ती तंडिपासून
उपमन्यु ऋषींना प्राप्त झाली.उपमन्युकडून कृष्णाला आणि मग कृष्णाने
युधिष्ठिरास ती नामे दिली.
दशनामसहस्रणि यान्याह प्रपितामहः। तानि निर्मथ्य मनसा दघ्नो घृतमिवोद्धृतम्॥
पितामह ब्रह्मदेवाने शंकराची दहा सहस्र नामे उच्चारली, त्याचे मी माझ्या मनांत मंथन करून, दह्यांतून जसे लोणी काढावे, तसे त्यांतून सार काढले आहे, असे उपमन्युने कृष्णाला सांगितलेले. हे सहस्रनाम सुरू होण्याआधी हे स्तोत्र कुणाला द्यावे, महादेवाचे माहात्म्य इत्यादी पूर्वांग कथन करून उपमन्यु मुनी कृष्णांस या स्तोत्राने मनोवांच्छित पूर्ण होईल, असे विश्वासाने सांगतात-
अष्टोत्तरसहस्रं तु नाम्नां शर्वस्य मे शृणु।
यच्छुत्वा मनुजव्याघ्र सर्वान् कामानवाप्यसि॥
तद्नंतर मुख्य स्तोत्राला प्रारंभ केला आहे. ही नामावलीही प्रासादिक आहे आणि रचना विष्णुसहस्रासारखीच आहे.
काही श्लोक
नन्दीश्वरश्च नन्दी च नन्दनो नन्दिवर्धनः।
भगहारी निहन्ता च
कालो ब्रह्मा पितामहः॥
सहस्रबाहुः सर्वाङ्गः शरण्यः सर्वलोककृत्।
पवित्रं त्रिककुन्मन्त्रः
कनिष्ठः कृष्णपिङ्गलः॥।
अशा प्रकारचे हे शिवसहस्रनामस्तोत्र आहे.
याची
फलश्रुती खूप मोठी असून या पाठचा महिमा कथन करून, त्याचा उपसंहार व ऋषींचा
भगवान शंकराच्या कृपेचा अनुभव 18व्या अध्यायांत दिला आहे.
विष्णुसहस्रनामाची पूर्वपीठिका
‘अनुशासनपर्वा’त 149व्या अध्यायांत श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्राची महान रचना आली आहे. या स्तोत्राची लोकप्रियता जगन्मान्य आहे, हे निराळे सांगण्याची आवश्यकता नाही. यांचे महत्त्व द्विगणित होण्यास मुख्य कारण की, ते भगवान श्रीकृष्णाच्या समक्ष, त्याच्याच अनुमोदनाने साकार झाले. शरपंजरी पडलेल्या भीष्मांच्या शेवटच्या क्षणी अष्टसात्विक भाव दाटून आले तथा परमात्म्याशी तादात्म्य पावलेल्या अवस्थेत हे स्तोत्र कथन केले.
युधिष्ठिर महाराज भीष्मांना विचारतो-
किमेकं दैवतं लोके किं वाप्येकं परायणम्।
स्तुवन्तः कं कमर्चन्तः
प्राप्नुयुर्मानवाः शुभम् ॥
को धर्मः सर्वधर्माणां भवतः परमो मतः ।
किं जपन्मुच्यते
जन्तुर्जन्मसंसारबन्धनात् ॥
अर्थ- लोकांत कोणते एक दैवत श्रेष्ठ आहे, जे प्राप्त होऊन नि ज्याच्या आश्रयाला जावे? असे एक स्थान कोणते? कोणाचे स्तवन व पूजन केल्याने मनुष्याचे कल्याण होते? सर्व धर्मात (तुम्हाला) मान्य असलेला धर्म कुठला आणि कोणता जप केल्याने मानव जन्ममरणाच्या फेर्यातून मुक्त होतो? या सहा प्रश्नांचे उत्तर विष्णू हे दैवत,सहस्रनामाचा नित्य जप हे उत्तर भीष्माचार्य प्रतिज्ञापूर्वक सांगून, त्या परमात्म स्वरूप महाविष्णूचे गुणसंकीर्तनास सुरुवात केली.
व्यक्त-अव्यक्तस्वरूप, अवताररूप असे विश्वात्मक श्रीविष्णूची सहस्रनामे वर्णिली आहे. यामध्ये सगुणावतार आणि निर्गुण परस्वरूप ईश्वरतत्त्व तथा दृश्यादृश्य वस्तुमात्रांत भगवंताचे अधिष्ठान भरून राहिले आहे, याची गुंफण केली आहे.
योगो योगविदां नेता प्रधानपुरुषेश्वरः।
नारसिंहवपुः श्रीमान्केशवः पुरुषोत्तमः॥
अप्रमेयो हृषीकेशः पद्मनाभोऽमरप्रभुः।
विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्थविष्ठः
स्थविरो ध्रुवः॥
या विष्णुसहस्रनामाला युधिष्ठिराने, तर धारण केले, तसेच असंख्य आचार्य, संतांनी याची नित्य परायणे केली. ती परंपरा पाच सहस्र वर्षे होऊनही आजतागायत अविरत गंगौघासारखी वाहत आहे आणि कोट्यवधी लोकांच्या नित्य उपासनेचे साधन म्हणून प्रचलित आहे. याच्या फलश्रुतीत ऐहिक तसेच आध्यात्मिक अशा दोन्ही स्तरावर मानवाचे कल्याण होईल याचे आश्वासन कृष्णासमक्ष भीष्म देत आहेत.
इमं स्तवं भगवतो विष्णोर्व्यासेन
कीर्तितम् ।
पठेद्य इच्छेत्पुरुषः श्रेयः
प्राप्तुं सुखानि च ॥
(अधिक विस्तारास्तव इथे पूर्ण भाग देणे शक्य नाही.)
उत्तरार्ध
परी शांताद्भुत
बरवे। जे डोळियांच्या अंजुळीं घ्यावे। जैसा हरिहर प्रेमभावें। आले खेवा॥ ज्ञाने
11:4
वैकुंठ
चतुर्दशी आणि त्रिपुरारी पौर्णिमा हा अत्यंत अलौकिक उत्सव संगम म्हणावा लागेल. ‘आमचा विष्णूच तो श्रेष्ठ ,आमचा विश्वनाथच सर्वश्रेष्ठ’
असे वादात न पडता ‘एकोऽहं बहुस्याम्’चा अनुभव देणारा सोहळा आहे. अकारण भेदाभेदामुळे होणार्या तंट्यास छेद देणारा प्रयोग भारताग्रंथातच झाल्याने त्यांस अधिक महत्त्व
प्राप्त झाले. या दोनही सहस्रनामांत अनेक एकसारखी नामे आली आहेत,
जी शंकरालाही उद्देशून आहेत आणि नारायणालाही. तसे
म्हणाल तर तीनही स्तोत्राचा मूळ गाभा परतत्त्वाशीच जाऊन मिळतो. तथापि, चिकित्सक पद्धतीने पाहायचे झाल्यास नामांत साम्य,
सूक्ष्म भेद वा अभेद, सारखेपणा याचा अपूर्व मेळ
दिसेल.
अशा दोन्ही सहस्रनामांत ९० हून अधिक नामे अगदी जशीच्या तशी आली आहेत. काही ठिकाणी दोन वा तीन अधिक अक्षरांच्या विशेषणांमुळे नामांत निराळेपण आढळते. उदा. शिवसहस्रामध्ये बल, कृष्णवर्ण, वृद्ध आहे, तर विष्णुसहस्रामध्ये महाबल, कृष्ण, वृद्धात्मन् तरी अर्थ सारखाच आहे. काहींमध्ये त्या त्या देवतांच्या अवतारांचा उल्लेख असल्याने अर्थातच तिथे त्या देवतेशीच निगडित नामे असणार. उदा. शंकराचे नीलकंठ, पशुपती, कैलासगिरीनिवासिन. तेच नारायणाचे - मधुसूदन, गोविंद, राम, वैकुंठ. अशी अनेक उदाहरणं आहेत. पण, परमात्म्य तत्त्वाचा जिथे संबंध आला तिथे भेद आपोआपच गळून पडतो आणि मग आमचे नाथ महाराज म्हणतात तसें-
एका वेलांटीची आढी।
मूर्ख नेणती बापुडी॥
श्रीकेशव
आणि श्रीकेदारेश्वराचे सख्य सांगणारे दोन कथा प्रसिद्ध आहेत.
त्रिपुरासुरवध कथा
त्रिपुरासुरवधसमयी
महादेवाच्या बाणाच्या अग्रावर श्री विष्णूची स्थापना केली. म्हणजेच विष्णूच्या सामर्थ्याचे ते प्रतीक होय. जेव्हा
युद्धात महादेवाचा रथ भूमीवर पडून उभा रोवला गेलेला, त्याप्रसंगी
भगवान विष्णूने महावृषभाचे रूप घेऊन आपल्या बलाढ्य शिंगांनी तो रथ वर काढला.
त्यामुळेही विष्णुला ‘शृङ्गिन्’ (विष्णुसहस्र 797) या नामाने ओळखतात. अडचणीत सापडलेल्या सख्यासाठी तत्क्षणी मदतीस धावून जाणे, हा केवढा मोठा आशय या कथेतून पाहावयास मिळतो! शिवशंकराचा
हा महापराक्रम ज्या दिवशी झाला तो आजचा कार्तिक पौर्णिमा, अर्थात
त्रिपुरारी पौर्णिमा दिवस होय.
वैकुंठ चतुर्दशी कथा
भगवान नारायण श्रीशंकराचा कृपाप्रसाद प्राप्त करण्यासाठी सहस्र कमळाने अर्चन करीत होते. शंकराने नारायणाची निष्ठा पाहण्याकरिता आपल्या लीलेने त्या तबकातले एक कमळ गुप्त केले. एक पुष्प कमी भासल्याने त्या पुण्डरिकाक्ष विष्णूने आपला एक नेत्र शंकराच्या चरणी अर्पण केला. विष्णूची अपार भक्ती पाहून शंकर प्रसन्न होऊन त्यांनी आपले सुदर्शन(शि.स 515) चक्र विष्णूला दिले. तेव्हापासून चक्र हे विष्णूचे शस्त्र झाले नि म्हणून ‘चक्रिन्’ (वि.स 908,995) असे संबोधिले. तो हा आजचा वैकुंठ चतुर्दशीचा दिवस. या कथेचे श्लोकरूप श्रीशिवमहिम्नात आले आहे ते असे-
हरिस्ते साहस्रं कमलबलिमाधाय पदयो-
र्यदेकोने तस्मिन्निजमुदहरन्नेत्रकमलम्॥
गतो भक्तयुद्रेकः परिणतिमसौ चक्रवपुषा।
त्रयाणां
रक्षायै त्रिपुरहर जागर्ति जगताम्॥
हरि-हर उत्सव
या दिवशी
विष्णूची बेलपत्राने आणि शंकराची तुळशीपत्राने पूजा करण्याचे महत्त्व आहे. रमापती जगन्नथ आणि उमापती नागनाथ यांच्या ऐक्याचे प्रतीक नाशिकच्या पंचवटीत
गोदाघाटावर कार्तिकी पौर्णिमेच्या रात्री मोठा सोहळा केला जातो. गंगाघाटावरचे श्रीकपालेश्वर महादेव देवालय आणि श्रीसुंदरनारायण मंदिरातून देवांचे
मुखवटे, उत्सवमूर्ती, पादुका पालखीतून मिरवत
रामकुंडावर आणून पूजा केली जाते. नंतर शिवावर वाहिलेले बिल्वपत्र
विष्णूला वाहिले जातात नि विष्णूला घातलेल्या तुळशीच्या माळा शंकरास अर्पण करतात.
हा अपूर्व देवदुर्लभ सोहळा म्हणजे हरि-हर भेट होय.
अखिल हिंदूंचे हृदयतीर्थक्षेत्र काशी येथेही हरि-हर भेटीचा उत्सव होतो.श्रीविश्वनाथाच्यावरचे बेल बिंदुमाधवला वाहून तेथील तुळशीपत्र महादेवाच्या ज्योतिर्लिंगावर वाहिल्या जातात. त्रिपुरासुर वधाचा दिवस म्हणून गंगेच्या घाटावर सहस्रावधी दिवे लावून देवदिवाळी साजरी करतात. एकता, समानता, बंधुभाव वगैरे गप्पा आपण नित्य ऐकत असतो. पण, प्रत्यक्ष देवांच्या अतर्क्य कार्याचा साधा सरळ अर्थ आपण ध्यानांत घेत नाही. कृती तर लांबच! पाश्चात्यांच्या ‘फ्रेंडशिप-डे’ पेक्षा कितीतरी उदात्त भावना या उत्सवाच्या माध्यमातून मला दिसते. त्याचे कारण-
‘हराचे चिंतन हरीचे हृदयीं।
हरीचें चिंतन हराचे हृदयीं॥’ - हे वचन प्रमाण आहे. याहून हिंदू धर्माची अपूर्वाई ती काय! हिंदुस्थानात अनेक
देवालये आहेत, ज्यामध्ये शंकर आणि विष्णूच्या एकत्रित मूर्ती
कोरल्या आहेत. याहून निराळे ऐक्याचे प्रतीक काय असू शकते!
वैकुंठ चतुर्दशी तथा त्रिपुरारी पौर्णिमेच्या मंगलदिनी श्रीशिवसहस्रनाम आणि श्रीविष्णुसहस्रनामाद्वारे सर्वांभूती एक परमात्मा या उक्तीप्रमाणे सांगड किंवा अभेद केवळ नजरेस आणून द्यावा या हेतूने काही लिहिता झालो. विविधता जपत त्यातही ऐक्य हे राष्ट्रासाठीही तेवढेच महत्त्वाचे नाही का!
या हरि-हर भेटीच्या लेखन रूपी सोहळ्याची सांगता श्रीतुकोबांच्या अभंगाने करणे म्हणजे कळसाचे दर्शन घेण्यासारखेच होय-
हरिहरां भेद। नाहीं करूं नये वाद॥
एक एकाचे हृदयीं।
गोडी साखरेच्या ठायीं॥
भेदकासी नाड। एक वेलांटी च आड॥
उजवें
वामांग। तुका म्हणे एक चि अंग॥
अनिकेत घिवलीकर
9769681999